आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

    08-Feb-2023
Total Views |
तभा वृत्तसेवा
मुंबई,
ज्येष्ठ समाजसेवक आणि निरुपणकार (Appasaheb Dharmadhikari) आप्पासाहेब धर्माधिकारी यांना 2022 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार आज बुधवारी जाहीर करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबतची घोषणा केली. महाराष्ट्र भूषण निवड समितीने केलेल्या शिफारशीवर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी शिक्कामोर्तब केले. पुरस्कार जाहीर होण्याच्या काही वेळापूर्वी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या रेवदंडा येथील निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली.
 
Appasaheb Dharmadhikari
 
अध्यात्म, (Appasaheb Dharmadhikari) समाज प्रबोधन, सामाजिक कार्य, अंधश्रद्धा निर्मूलन यासाठी केलेल्या कार्याची दखल घेत राज्य सरकारने पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर केला आहे. 14 मे 1946 रोजी जन्म झालेले पद्मश्री डॉ. दत्तात्रेय उपाख्य आप्पासाहेब धर्माधिकारी गेली 30 वर्षे निरुपण करीत असून, बालमनावर संस्कार करण्यासाठी त्यांनी विशेष बालसंस्कार बैठक सुरू केल्या आणि आदिवासी वाडी व वस्त्यांवर व्यसनमुक्तीचे मोठे कार्यही केले.
 
 
डॉ. नानासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) प्रतिष्ठानतर्फे अनेक प्रकारचे सामाजिक उपक‘म राबविले जातात. अलिकडच्या काळात संस्थेने सर्वाधिक प्रमाणात वृक्षारोपण केले. याशिवाय वृक्षसंवर्धन, तलाव व स्वच्छता अभियान, रक्तदान शिबिराचे आयोजनही नियमित करण्यात येते. गणेशोत्सव व नवरात्रौत्सवनंतर निर्माल्यातून खतनिर्मिती करून एक पर्यावरणपूरक संदेशही त्यांनी समाजाला दिला आहे. आप्पासाहेब धर्माधिकारी स्वच्छतादूत म्हणूनही ओळखले जातात.
 
 
रायगड जिल्ह्यातील रेवदंडामध्ये (Appasaheb Dharmadhikari) आप्पासाहेबांचे प्राथमिक ते माध्यमिक शिक्षण झाले. बालपणापासून त्यांना कीर्तन, भजन, आध्यात्मिक वाचन याची आवड होती. याशिवाय त्यांना मैदानी खेळ व पोहणेही आवडायचे. तळागाळातील प्रत्येक मनुष्यासाठी, समाजाच्या सेवेसाठी आप्पासाहेबांनी आपले पूर्ण आयुष्य वेचले आहे. या कार्याची सुरुवात त्यांचे वडील डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांनी 1943 पासून केली होती आणि आज तेच काम तेवढ्याच जोमाने, तत्परतेने जगभर पोहोचविण्याचे कार्य आप्पासाहेब करीत आहेत.
 
नानासाहेबांनाही मिळाला होता पुरस्कार
वडील नानासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांनी रुजवलेल्या रोपट्याचे वटवृक्ष करण्याचे कार्य आप्पासाहेबांनी केले आहे. त्यांचे हेच कार्य त्यांचे चिरंजीव सचिन धर्माधिकारी करीत आहेत. 2008 मध्ये शासनातर्फे ज्येष्ठ निरुपणकार दिवंगत नानासाहेब धर्माधिकारी यांना मरणोत्तर ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने गौरविण्यात आले होते. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी हा पुरस्कार स्वीकारला होता. या पुरस्कार वितरण सोहळ्यात खारघर येथील 510 एकर परिसरात 40 लाखांवर लोक जमा झाले होते. या विक्रमी गर्दीची लिम्का बुकात नोंद झाली होती. राज्यात पिता-पुत्राला महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळण्याचा योगायोगही या घोषणेमुळे जुळून आला आहे.