वेध
- संजय रामगिरवार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कपाळावर नेहमी टिळा असतो. असाच टिळा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झालेल्या Appasaheb Dharmadhikari आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या कपाळावरदेखील असतो. गर्दीतही अशाप्रकारचा टिळा लावलेली व्यक्ती चटकन ओळखता येते आणि ती ओळख असते ‘बैठकांची’! महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये बैठकांचे प्रस्थ आहे. बैठकांना जाणार्या लोकांना ‘श्री सदस्य’ म्हणून ओळखले जाते. एकनाथ शिंदे यांची ओळख देखील ‘श्री सदस्य’ अशीच आहे. एकनाथरावांची दोन्ही मुले त्यांच्या डोळ्यादेखत बोट अपघातात मृत्युमुखी पडली. त्यावेळी शिंदे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगरच कोसळला होता. अशावेळी त्यांच्या कुटुंबीयांना आधार दिला या ‘बैठकांनी’! नानासाहेबांनी सुरू केलेल्या बैठकांना एकनाथरावांच्या पत्नी लताताई जाऊ लागल्या. पुढे एकनाथरावांनीही या बैठकांमध्ये भाग घेतला. त्यांना मन:शांती लाभली. या बैठकांमुळे आपले कुटुंब त्या भयावह आठवणीतून सावरले. अन्यथा आम्ही खचून गेलो असतो, असे मत एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले आहे.
Appasaheb Dharmadhikari आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या घरी जाऊन त्यांचा सत्कार करताना हाच भाव त्यांच्या मनात आला असावा. धर्माधिकारी घराणे हे रायगड जिल्ह्यातील रेवदंडा गावचे. 400 वर्षांपूर्वी या घराण्यातील गोविंद चिंतामणी शांडिल्य यांनी धर्मजागृतीचे काम सुरू केले. कान्होजी आंग्रे यांनी त्यांना ‘धर्माधिकारी’ ही उपाधी दिली. पुढे हीच उपाधी त्यांचे आडनाव झाले. त्यानंतर या घराण्याच्या अनेक पिढ्या धर्मजागृती करीत राहिल्या. त्या कामाला समाजप्रबोधनाची जोड देण्याचे काम डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांनी केले. 1922 साली जन्मलेल्या नानासाहेबांनी ‘मानवता हा धर्म आणि मनुष्य हीच जात’ हा विचार अंगीकारला आणि तो समाजासमोर मांडला. श्री. समर्थ दासबोधाचे निरूपण करायला त्यांनी सुरुवात केली. 1943 साली श्री समर्थ आध्यात्मिक प्रासादिक सेवा समितीची स्थापना केली गेली. 8 ऑक्टोबर साली गोरेगावला पहिल्यांदा ‘बैठकी’चे आयोजन करण्यात आले. त्यानंतर गावोगावी बैठका होऊ लागल्या. या बैठकांमधून धर्म, दासबोध, व्यसनमुक्ती असे समाजप्रबोधन होत होते. या बैठकांना येणार्या लोकांची वेगळी ओळख तयार झाली. त्यांना ‘श्री सदस्य’ नावाने ओळखले जाऊ लागले आणि पुढे तो एक संप्रदायच झाला.
डॉ. दत्तात्रेय उपाख्य Appasaheb Dharmadhikari आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी या कार्याला आणखी वेगळ्या उंचीवर नेले. ते देखील निरूपण करू लागले. सोबतच आरोग्य, वृक्षलागवडीचे उपक्रम राबवायला त्यांनी सुरुवात केली. देशाने आपल्याला काय दिले यापेक्षा आपण देशाचे काय देणे लागतो, हा विचार त्यांनी पुढे आणला आणि समाजप्रबोधन केले. व्यसन, अंधश्रद्धा आणि प्रौढ साक्षरता तसेच बालसंस्काराचे वर्गही आयोजित करायला सुरुवात केली. दासबोध घराघरात नेला. पुण्याच्या डी. वाय. पाटील विद्यापीठाने त्यांना ‘डी. लिट्.’ पदवी देऊन सन्मानित केले. तर भारत सरकारने पद्श्री देऊन त्यांचा गौरव केला आणि आता राज्य सरकारने त्यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने सन्मानित केले आहे. तत्पूर्वी, त्यांना महाराष्ट्राचे स्वच्छतादूत म्हणूनही संबोधिले गेले होते. धर्माधिकारी घराण्यातील हा दुसरा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार आहे. 2008 साली नानासाहेबांना हा सन्मान मरणोत्तर प्राप्त झाला आणि तो आप्पासाहेबांनीच स्वीकारला होता. राज्यात पिता-पुत्राला महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळण्याचे हे पहिलेच उदाहरण होय. खारघर येथील 504 एकराच्या विस्तीर्ण परिसरात झालेल्या त्या पुरस्कार वितरण सोहळ्याला तब्बल 40 लाखावर ‘श्री सदस्य’ जमा झाले होते. या विक्रमी गर्दीची नोंद लिम्का बुकमध्ये झाली. एवढ्या मोठ्या प्रमाणात लोटलेल्या गर्दीतून काही अनुचित प्रकार तर घडणार नाही ना, अशी शंका तेव्हा आली. मात्र, कार्यक्रम आटोपल्यानंतर याच लोकांनी अख्खे मैदान स्वच्छ केले. हे नानासाहेब आणि आप्पासाहेबांच्या निरूपणाचेच संस्कार आहे. याच संस्कारांची मांदियाळी आप्पासाहेबांचे पुत्र सचिन धर्माधिकारी हेसुद्धा पुढे नेत आहेत. अशी माणसं समाज घडवतात. समाजमन संस्कारित करीत असतात.
- 9881717832