वाशीम,
वाशीम जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने वाशीम ते जालना ह्या नवीन रेल्वे मार्गाचे (Railway Line) करुन या मार्गाला मंजूरात मिळावी, अशी मागणी भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजू पाटील राजे यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे निवेदनातून केली आहे. ना. दानवे हे १० मार्च रोजी वाशीम जिल्ह्याच्या दौर्यावर आले असता त्यांचा राजू पाटील राजे यांच्या निवासस्थानी भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्ह्यातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
![Railway Line Railway Line](https://www.tarunbharat.net/Encyc/2023/3/11/Railway-Line_202303111755105031_H@@IGHT_360_W@@IDTH_600.jpg)
वाशीम जिल्ह्याच्या विकाससाठी ह्या जिल्ह्याचा संपर्क पुणे, मुंबई सारख्या मोठ्या शहराशी जोडणे आवश्यक आहे.शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी व इतर प्रवाशांना थेट मुंबईला जाण्यासाठी रेल्वे नाही. त्यामुळे वाशीम ते जालना हा नवीन रेल्वे मार्ग अस्तीत्वात येणे गरजेचे आहे. जेणेकरुन जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र पोहरादेवी, लोणी व बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर तसेच राष्ट्रमाता जिजाऊ जन्मस्थान सिंदखेड राजा ही स्थळे या मार्गाला जोडल्या जातील व पर्यटन क्षेत्राला चालना मिळेल. तसेच बडनेरा - वाशीम ह्या रेल्वे मार्गाचे दोनवेळा सर्वेक्षण झाले. परंतु, या मार्गाच्या निर्मितीसाठी कुठलीही तरतूर अर्थसंकल्पात करण्यात आली नाही. बडनेरा-वाशीम रेल्वे मार्गाच्या निर्मितीसाठी अनेकवेळा आंदोलने झाली. रेल्वे प्रशासनाकडून सर्वेक्षणही झाले. मात्र, हा रेल्वे मार्गाचा प्रश्न अद्यापही प्रलंबित आहे. उपरोक्त दोन्ही रेल्वे मार्गाच्या निर्मितीसाठी आपल्यास्तरावरुन प्रयत्व व्हावे त्यासाठी निधी उपलब्ध करुन द्यावा, असेही निवेदनात भाजपा नेते राजू पाटील राजे यांनी नमूद केले आहे.