तभा वृत्तसेवा
उमरखेड,
येथील औदुंबर वृक्ष संवर्धन समितीला (Audumbar Tree Conservation Committee) छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. औदुंबर नगरीत सातत्यपूर्ण विविध उपक्रम राबवून वृक्ष लावगड व संवर्धनाचे कार्य उमरखेड येथील औदुंबर वृक्ष संवर्धन समिती करीत आहे. याची दखल घेत महाराष्ट्र शासनाने सेवाभावी संस्था या गटातून विभागीय स्तरावरील छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार (द्वितीय) जाहीर केला होता.
या (Audumbar Tree Conservation Committee) पुरस्काराचे वितरण यवतमाळ येथील वनभवन येथे वनसंरक्षक वसंत घुले यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह, सन्मानपत्र व 30 हजार रुपयाचे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. उपवनसंरक्षक धनंजय वायभासे यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक‘माचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी सामाजिक वनीकरण विभागाचे सर्व अधिकारी औदुंबर समितीचे सर्व सदस्य व कर्मचारी तसेच विविध सामाजिक संघटना, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
मागील सात वर्षापासून औदुंबर वृक्ष संवर्धन समिती वृक्ष संवर्धनाचे (Audumbar Tree Conservation Committee) अविरत कार्य करीत आहे. समितीने देणगीदात्याच्या सहकार्यातून 6 हजार 500 झाडे लावून वाढविली आहेत. त्याचीच फलश्रुती म्हणून समितीची महाराष्ट्र शासनाचा छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कारासाठी निवड करण्यात येऊन समितीला गौरविण्यात आले. त्यापासून प्रेरणा घेऊन यापुढेही समिती वृक्षारोपणाचे कार्य जोमाने करेल, असे औदुंबर वृक्ष संवर्धन समिती उमरखेडचे अध्यक्ष दिलीप भंडारे यांनी सांगितले.