- मंत्री अतुल सावे यांची माहिती
मुंबई,
राज्यातील भटक्या विमुक्त समाजाचे राहणीमान उंचावण्यासाठी घरकुल योजनेचा लाभ त्यांना राज्यात सर्वदूर दिला जाईल. कुणालाही यापासून वंचित ठेवले जाणार नाही, अशी ग्वाही मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री Atul Save अतुल सावे यांनी विधानसभेत दिली. स्थानिक आमदारांच्या अध्यक्षतेत भटक्या विमुक्त जमातीच्या घरकुलांसाठी निर्माण केलेल्या समितीमार्फत पाठविलेल्या प्रस्तावांना मंजुरी देताना, शासनामार्फत दुजाभाव केला जात असल्याबाबत लक्षवेधी सूचना राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांनी मांडली होती. यावर मंत्री सावे यांनी उत्तर दिले.
24 जानेवारी 2018 च्या परिपत्रकानुसार, भटक्या विमुक्तांसाठी घरकुल योजना शासनाने आणली. 23 फेब्रुवारी 2021 रोजीच्या परिपत्रकानुसार, स्थानिक आमदारांच्या अध्यक्षतेत एक समिती गठित करून पंचायत समितीमार्फत या समितीने प्रस्ताव मंजूर करून ते जिल्हाधिकार्यांकडे पाठवायचे आणि जिल्हाधिकार्यांनी शासनाकडे पाठवावे, अशीं कार्यपद्धती ठरवून दिली. त्यानुसार पाठविलेल्या जिल्ह्यातील प्रस्तावातून केवळ चार तालुक्यांना घरकुल योजना मिळाली. अन्य 11 तालुक्यांवर अन्याय करण्यात आल्याची भावना आ. धोटे यांनी लक्षवेधी मांडताना व्यक्त केली. यावेळी सोलापूरच्या आमदार प्रणिती शिंदे व गडचिरोलीचे आमदार देवराव होळी यांनीही आपल्या जिल्ह्यातील घरकुल मंजुर करण्याची विनंती केली. या खात्याचे माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी देखील दोन महिन्यांत उरलेल्या तालुक्यांनाही मंजुरी देण्याची घोषणा करावी, अशी विनंती मंत्र्यांना केली. यावर उत्तर देताना मंत्री Atul Save सावे यांनी, जिल्हाधिकार्यांमार्फत आलेल्या राज्यातील सर्व प्रस्तावांना निधीच्या उपलब्धतेनुसार टप्प्याटप्प्याने मंजुरी देण्यात येईल, असे आश्वासन दिले.