तभा वृत्तसेवा
धारणी,
Wild Animal : मेळघाटचे राखीव वन आणि संग्रामपूर तालुक्याच्या सीमेपासून केवळ 25 कि. मी. अंतरावरील खापरखेडा (ता. खकनार, मप्र) गावात एका घरावर पोलिस आणि वन विभागाने धाड टाकून 7 आरोपींना वन्यप्राणी ससा आणि राष्ट्रीय प्राणी मोराच्या अवैध शिकारीच्या आरोपाखाली अटक केली आहे. तीन बंदुका, एअरगन, अवजारे, शिजलेल्या मटनासह मृत ससा पण जप्त करण्यात आलेला आहे. गेल्या वर्षी मेळघाटच्या हिवरखेड येथे सुद्धा मध्यप्रदेशातील शिकार्यांना मुद्देमाल व बंदुकांसह पकडण्यात आले होते, म्हणून आरोपी शिकारीसाठी महाराष्ट्रात आले असल्याची शक्यता आहे.
धारणी आणि संग्रामपूर तालुक्याच्या सीमेवर असलेल्या खापरखेडा ता. खकनार, जिल्हा बर्हाणपूर या गावातील एका घरात शिकार करून वन्य जीवाचे (Wild Animal) मटन खात असल्याची माहिती खकनारचे ठाणेदार संजय पाठक यांना प्राप्त होताच वनविभागासह पोलिस पथकाने धाडसी कारवाई केली. या कारवाईत सात आरोपी पकडण्यात आले असून 1 आरोपी मुमताज गुल मोहम्मद रा. खापरखेडा हा फरार झाला. बर्हाणपूरचे पोलिस अधीक्षक राहुलकुमार लोढा यांनी दिलेल्या माहितीनुसार, खापरखेडा गावात वन्यजीव संरक्षण अधिनियमांतर्गत ज्या सात आरोपींना मुद्देमालासह अटक करण्यात आली त्यामध्ये शराफत शहादत नूर (29), हिफाजत उर्फ कल्पु शहादत (42), सद्दाम शफी मोहम्मद सर्व रा. खापरखेडा, आदिल शेख महबुब शेख (21), रा. खजराना, इन्दोर, नईम शेख मोहम्मद (54), रा. खापरखेडा, शहादत करीम बख्श (70), गुल मोहम्मद सत्तार मोहम्मद रा. खापरखेडा यांचा समावेश आहे.
आठवा आरोपी मुमताज घटनास्थळावरून अंधाराचा लाभ घेत पळून गेला. घरातून (Wild Animal) शिजलेले मटन, सश्याचा मृतदेह, तीन बंदुका, एक एअरगन, जिवंत काडतुसे, बंदुकात एफ 22 रायफल व एक 12 बोर बंदुकीचा समावेश आहे. या कारवाईत ठाणेदार संजय पाठक, पोलिस अधिकारी मेवालाल मौर्य, सचिन केरकेटा, निखिलेश जगताप, वंदना मुजाल्दे, आर. मंगल, दिपांश, विजय यांनी भाग घेतला. मागील वर्षी बर्हाणपूर येथील शिकार्यांना हिवरखेड पोलिसांनी मेळघाट सीमेवर शिकार केलेल्या मृत वन्यजीव व बंदुकांसह पकडलेले होते. खंडवा व इन्दौर येथून फक्त शिकारीसाठी आलेले आरोपी जवळच्या महाराष्ट्राच्या जंगलात पण गेल्याची शक्यता आहे.