- प्रकाशनप्रसंगी जिल्हाधिकारी अमोल येडगे
यवतमाळ,
स्वातंत्र्याच्या चळवळीत यवतमाळ जिल्ह्याचे अपूर्व योगदान राहिले आहे. या चळवळीत ज्या सानथोर नेत्यांनी स्वत:ला झोकून दिले त्यांच्या कर्तृत्वाची गाथा म्हणजे ‘तेथे कर माझे जुळती’ हा ग्रंथ आहे. हा ग्रंथ अपूर्व आत्मबळ देईल आणि ‘संस्पर्श’ हा ग्रंथ आपल्याला निरामय आरोग्य जपण्यासाठी लाभदायी ठरेल, असे प्रतिपादन यवतमाळचे जिल्हाधिकारी Amol Yedge अमोल येडगे यांनी केले. येथील सत्यसाई क्रीडारंजन सभागृहात पद्माकर मलकापुरे लिखित ‘तेथे कर माझे जुळती’ आणि डॉ. आसावरी राणे लिखित ‘संस्पर्श’ या दोन्ही ग्रंथ प्रकाशन प्रसंगी अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी मान्यवर म्हणून डॉ. रमाकांत कोलते, नगर प्रशासन सहआयुक्त माधुरी मडावी, डॉ. प्रकाश नंदुरकर, सामाजिक कार्यकर्ते लेखक संतोष अरसोड उपस्थित होते.
स्वातंत्र्यलढ्यात पुरुषांसोबत अनेक महिलांनी वैशिष्ट्यपूर्ण योगदान दिले. अनेक महिला व पुरुष स्वातंत्र्यसैनिकांची नावे तथा त्यांचे कर्तृत्व लोकांना ज्ञात नव्हते. काळाच्या पडद्याआड गेलेल्या अशा अनेक स्वातंत्र्यवीरांची ओळख तेथे कर माझे जुळती या ग्रंथाने नवीन पिढीस घडवून दिली, असे मत डॉ. रमाकांत कोेलते यांनी व्यक्त केले. मानवाला निरामय आरोग्यदायी जीवन लाभण्यासाठी डॉ. आसावरी राणे यांनी लिहिलेला ‘संस्पर्श’ हा ग्रंथ सर्वांचे हित जोपासणारा आहे. हा घरी ठेवल्यास होमिओपॅथीचे उपचार आपण घरच्याघरीच सहजपणे करू शकू. त्यामुळे हा ग्रंथ सर्वांनी वाचावा आणि कौटुंबिक स्वास्थ चांगले राखावे, असे आवाहन डॉ. प्रकाश नंदुरकर यांनी केले.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात जे कार्य मी संकल्प म्हणून प्रारंभ केले त्याचा शेवटही माझ्या पुढाकाराने पूर्ण होईल अशी अपेक्षा माधुरी मडावी यांनी व्यक्त केली. संतोष अरसोड यांनी, हा ग्रंथ नवीन पिढीला स्वातंत्र्याची महती आणि आयुष्य पणाला लावणार्या तमाम स्वातंत्र्यसैनिकांच्या कष्टांची जाणीव करून देणारा ठरेल असे सांगितले. तन-मन-धन खर्ची घालून व जीव ओतून लेखकाने हा ग्रंथ वाचकांना उपलब्ध करून दिला आहे, असे ते म्हणाले. सोहळ्यात लेखकद्वय पद्माकर मलकापुरे व डॉ. आसावरी राणे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. डॉ. कलापिनी राणे यांच्या नेतृत्वात चंद्रशेखर मिश्रा, यश सावर्डेकर, प्रसाद भोंगे, विनीत देसाई, धनराज कळसकर, सचिन वाघमारे, कार्तिक पाटील, मेघराज घाटगे यांनी पालखीतून वैशिष्ट्यपूर्ण मिरवणूक काढून दिंडीसह वाजतगाजत दोन्ही ग्रंथ अतिथींना सोपविले.
यवतमाळ आकाशवाणीद्वारा प्रस्तुत ‘तेथे कर माझी जुळती’ मालिकेतील निवेदक प्रमोद बावीस्कर, प्रज्ञा निळेकर, मनोज उप्रतकर, चंद्रशेखर वडगिरे तथा प्रख्यात गायक अजय हेडाऊ या कलावंताचे शाल, श्रीफळ व चरखा स्मृतिचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले. या सोहळ्यात जिल्हाधिकारी Amol Yedge अमोल येडगे यांच्या हस्ते शहरातील स्वातंत्र्यसैनिक परिवार प्रमुखांचा ‘तेथे कर माझे जुळती’ हा ग्रंथ देऊन सन्मान करण्यात आला. सुरवातीला विशेष स्वरवंदना सविता दिनेश गवई यांनी सादर केली. संचालन नंदू बुटे व आभारप्रदर्शन विद्या खडसे यांनी केले.