तभा वृत्तसेवा
गोंदिया,
Dengue, Malaria : करापोटी लाखो रुपये वसुल करणार्या नगर पालिकेला कर देणार्या नागरिकांच्या आरोग्याची काळजी नसल्याचे दिसते. गेल्या अनेक दिवसापासून डासांचा प्रादुर्भाव असताना नाली स्वच्छतेसह डांस प्रतिबंधात्मक औषध फवारणी देखील केली नाही. त्यामुळे डेंग्यू, मलेरियाची भीती नागरिकांमध्ये आहे.
नगर परिषदेवर प्रशासक नियुक्त आहे. मुख्याधिकारी करण चव्हाण यांच्याकडे प्रशासकाचा कार्यभार आहे. नगर परिषदेत नागरिकांच्या समस्या मांडण्यासाठी व सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधी नाही. त्यामुळे प्रशासनाचा कारभार मनमर्जी होत असल्याची ओरड नागरिक करीत आहेत. आरोग्य, पाणीपुरवठ्याच्या बाबतीत नगर पालिकेने सतर्क असायला हवे. मात्र, तसे होताना दिसत नाही. बर्याच महिन्यापासून वॉर्डावॉर्डातील नाल्यांची स्वच्छता झाली नाही. नाल्यांमध्ये केरकचरा कुजलेला आहे. नाल्या चोख झाल्या आहेत. या कुजलेल्या कचर्यातून दुर्गंधी येत असून डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात झाली आहे. त्यामुळे डेंग्यू, मलेरिया आदी रोगाची भीती नागरिकांमध्ये असून, डांस प्रतिबंधात्मक फवारणी व नाल्यांची स्वच्छतेची मागणी होत आहे. मात्र अद्यापही ठोस पावले उचलली नसल्याने पालिकेप्रती संतापाचे वातावरण आहे.
माजी नगरसेवकांनी घ्यावा पुढाकार
नगर पालिका निवडणुकीचे घोडे वरच्या पातळीवरुन अडल्याची माहिती आहे. असे असले तरी माजी नगरसेवक आपापल्या प्रभागात कामाला लागले आहे. नागरिकांकडूनही त्यांना या समस्येची जाणीव करुन दिली जात आहे. त्यामुळे माजी नगरसेवकांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी नागरिक करीत आहेत.