तभा वृत्तसेवा
चंद्रपूर,
Mahakali Yatra : चंद्रपूर शहरात माता महाकाली यात्रेस 27 मार्चपासून सुरवात होत आहे. अनेक वर्षांची परंपरा लाभलेल्या या यात्रेची राज्यभरातील भाविक आतूरतेने वाट पाहत असतात. राज्याच्या विविध भागातून येणार्या भाविकांच्या सुविधेच्यादृष्टीने चंद्रपूर मनपा प्रशासनद्वारे तयारी करण्यात आली असून, 90 अधिकारी, कर्मचारी व्यवस्थेत सज्ज आहेत.
मनपातर्फे झरपट नदी पात्रातील इकोर्निया वनस्पती काढून पात्र स्वच्छ करण्याचे काम सुरु आहे. बैलबाजार भागात पटांगणाची पूर्णतः सफाई करण्यात आली असून, याच भागात भक्तांकरिता मांडव टाकले जात आहे. भाविकांना पिण्यासाठी विविध चौकात 1000 लिटरची क्षमता असलेल्या 15 पिण्याच्या पाण्याच्या टाक्या उभारण्यात येत असून, भूमिगत वाहिनी टाकून पाण्याचे नळ उभारण्यात येत आहे. तसेच पाण्याचे टँकरसुद्धा सज्ज ठेवण्यात येणार आहे.
भाविकांना आंघोळीसाठी स्वच्छ पाणी उपलब्ध व्हावे, या दृष्टीने ‘शॉवर’द्वारे आंघोळीची व्यवस्था करण्यात येत आहे. भाविकांकरिता यात्रा (Mahakali Yatra) परिसरात मंडप तसेच बैल बाजार परिसर, पंजाबी वाडी व संपूर्ण यात्रा परीसरात विद्युत व्यवस्था उभारली जात आहे. निःशुल्क प्रथोमपचार वैद्यकीय सेवा तसेच 24 तास रुग्णवाहिका उपलब्ध ठेवण्यात येणार असून, वेळप्रसंगी नैसर्गिक आपत्ती ओढावल्यास नागरिकांना स्थलांतरीत करण्याकरिता मनपाच्या 7 शाळा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. या काळात मंदिर परिसरात मोठी गर्दी असल्याने खाद्यपदार्थांचे विविध स्टॉल्स लावण्यात येतात, या स्टॉल्सला परवानगी देणे व त्यांची बैठक व्यवस्थाही करण्यात येत आहे. ही यात्रा 6 एप्रिलपर्यंत सुरु राहणार असून, या उत्सवादरम्यान नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन मनपा प्रशासनाने केले आहे.
जिल्हाधिकार्यांकडून मंदिर परिसराची पाहणी
महाकाली माता (Mahakali Yatra) यात्रा महोत्सव 27 मार्चपासून सुरू होत आहे. या पृष्ठभूमीवर जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी मंदिर परिसराची पाहणी करून संबंधित यंत्रणांना आवश्यक सूचना दिल्या. विविध विभागांचे प्रमुख व मंदिराचे विश्वस्त यांच्यासोबत महाकाली मंदिर येथे घेतलेल्या बैठकीत गौडा म्हणाले, या यात्रेकरिता केवळ जिल्ह्यातीलच नव्हे, तर बाहेर राज्यातूनही भाविक मोठ्या प्रमाणात येतात. त्यामुळे यात्रा महोत्सव सुरळीत पार पडेल, यादृष्टीने सर्व संबंधित विभागाने नियोजन करावे. मंदिर परिसराची व झरपट नदीची स्वच्छता त्वरित करून घ्यावी. भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय उत्तम असली पाहिजे, याबाबत योग्य नियोजन करावे, असे ते म्हणाले.