तभा वृत्तसेवा
चांदूर रेल्वे,
Avadhut Maharaj : अवधुती संप्रदायाचे प्रवर्तक श्री संत अवधुत महाराजांच्या समाधीच्या दर्शनासाठी देशभरातून लाखोंचा जनसागर गुढीपाडव्याच्या दिवशी श्रीक्षेत्र सावंगा विठोबा येथे उसळला. लाखोंचा कापूर जाळून भाविकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. दूपारी 4 वाजता देव व भक्तांचे समानतेचे प्रतिक 72 फुटी उंच झेंड्यांना नवीन खोळ चढविण्याचा भव्यदिव्य, नेत्रदीपक सोहळा विधीवत उत्साहात पार पडला.
येथील यात्रेला 21 मार्चपासून सुरूवात झाली. गुढीपाडव्याला पहाटेपासूनच वाहनाच्या रांगा सावंगा विठोबा मार्गावर लागल्या होत्या. भाविक मिळेल त्या वाहनाने सावंग्यात दाखल झाले. दूरचे असंख्य भाविक कुटुंबासह आधीच सावंग्यात दाखल झाले. पहाटेपासून मंदिरासमोर अवधुत महाराजाच्या समाधीच्या दर्शनासाठी भाविकांच्या लांब रांगा लागल्या होत्या. भाविकांना दर्शन मिळण्यासाठी देवस्थानचे विश्वस्त, स्वंयसेवक व ग्रामस्थ सतत झटत होते. मिळेल तिथे भाविक हातावरील विटेवर कापूर जाळुन आपल्या भावना व्यक्त करीत असल्याने कापूराचा सुगंध सर्वत्र पसरला होता.
72 फुटी झेंड्यांना नवीन खोळ
गुढीपाडव्याला दुपारी 4 वाजता 72 फुटी देव व भक्तांच्या दोन झेंड्यांना नवीन खोळ चढविण्याच्या विधीवत सोहळ्याला सुरूवात झाली. हभप चरणदास कांडलकर यांनी आंघोळ करून नवीन शुभ्र वस्त्र परिधान केले. देवस्थानचे अध्यक्ष वामन रामटेके, उपाध्यक्ष कृपासागर राऊत, सचिव गोविंद राठोड, विश्वस्त हरिदास सोनवाल, पुंजाराम नेमाडे, विनायक पाटील, फुलसिंग राठोड, अनिल बेलसरे, दिगांबर राठोड, वैभव मानकर, स्वप्निल चौधरी यांना नमस्कार करून चरणदास कांडलकर यांनी श्री अवधुत महाराज यांच्या समाधी व गादीचे दर्शन घेतले. झेंड्यांचे विधीवत पुजन करून कांडलकर यांनी झेंड्यांना पायाचा स्पर्श न करता दोरखंड्याच्या साह्याने गाठा मारत जुनी खोळ काढत झेंड्याचा टोकावर पोहचले. यावेळी पारंपारिक झांज व मृदंगाच्या सोबत अखंड अवधुती भजनाची मांड सुरू होती. दोन्ही झेंड्यांना नवीन खोळ टाकत हभप कांडलकर खाली उतरले. हा चित्तथरारक सोहळा अडीच तास चालला. यात्रेत विविध वस्तुंची, खेळण्याची दुकाने व उंच आकाश पाळणे सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता.