भाजप खासदार गिरीश बापट यांचे निधन

29 Mar 2023 12:56:51
पुणे,
भारतीय जनता पक्षाचे खासदार गिरीश बापट (Girish Bapat passed away) यांचे आज पुण्यातील दीनानाथ रुग्णालयामध्ये निधन झाले. वयाच्या 73 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गेल्या दीड वर्षांपासून ते रुग्णालयात दाखल होते. गिरीश बापट यांचा अंत्यविधी 7 वाजता वैकुंठ स्मशान भूमीत होणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्यांना श्वसनाच्या आजार जडला. त्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरु होते. प्रकृती खालावल्याने मागील काही महिन्यांपासून त्यांच्यावर डायलिसिस सुरु होते.
 
 
bapata
 
गिरीश बापट यांचे कसबा पेठ मतदारसंघात एकहाती वर्चस्व होते. बापट हे मूळचे स्वयंसेवक होते. नगरसेवक ते खासदार अशी चढत्या क्रमाची कारकीर्द राहिली. (Girish Bapat passed away) 1995 पासून 5 वेळा आमदार म्हणून कसब्यातून निवडून आले. तर 2019 मध्ये खासदारपदी निवड झाली. पुणे महापालिकेत नगरसेवक ते खासदार असा त्यांचा प्रवास राहिला आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच अनेक मान्यवरांनी तीव्र दु:ख व्यक्त केले. त्यांच्या जाण्याने भाजपचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या निधनानंतर आता लोकसभेची पोटनिवडणूक लागण्याची शक्यता आहे. 
 

गिरीषजी बापट यांच्या निधनाचे वृत्त ऐकून अतिशय दु:ख झाले. जनसंघाच्या काळापासून पुणे शहरात गेली पाच दशके सक्रिय राजकारणात असणारे, पूर्वीपासून विधिमंडळात व आता लोकसभेतील माझे जीवलग सहकारी, पुण्यामध्ये भाजपच्या जडणघडणीतील एक प्रमुख व क्रियाशील नेतृत्व असणाऱ्या गिरीषजींना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. एक मृदुभाषी, संवेदनशील आणि लोकांसाठी झटणारा सुसंस्कृत लोकप्रतिनिधी म्हणून गिरीषजी कायम स्मरणात राहतील. 
- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
 
भारतीय जनता पक्षाचे पुण्यातील खासदार आणि ज्येष्ठ नेते गिरीश बापट यांच्या निधनामुळे राजकारणातील एक सर्व समावेशक नेतृत्व हरपले आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. दुर्धर आजाराशी झुंजत असताना देखील गिरीश बापट हे आपल्या पक्षाला ऊर्जा देण्याचे काम करत होते. त्यांच्याशी भेट व्हायची तेव्हा राजकारणातलेच नव्हे तर अनेक विषयांवर त्यांना असलेली माहिती पाहून चकित व्हायचो. नुकतीच पुण्यात त्यांची विचारपूस करण्यासाठी भेटही झाली होती. त्यांनी त्यांची राजकीय कारकीर्द अगदी नगरसेवकापासून सुरू केली होती. 
-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
 
राज्याचे माजी मंत्री, विद्यमान खासदार सन्माननीय गिरीश बापट यांचे निधन हे पुणे जिल्ह्यातल्या आम्हा सर्वपक्षीय राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांसाठी मोठा धक्का आहे. महाराष्ट्राचं सर्वसमावेशक, सुसंस्कृत राजकारणाचा चेहरा म्हणून गिरीशभाऊंकडे पाह्यलं जायचं. चार दशकांच्या प्रदीर्घ राजकीय वाटचालीत गिरीशभाऊंना पुणेकरांचं अलोट प्रेम मिळालं. 1995 पासून 2014 पर्यंत सलग पाच वेळा ते आमदार झाले.
- विरोधी पक्षनेते अजित पवार
 
Powered By Sangraha 9.0