तभा वृत्तसेवा
हिंगणघाट,
Medical College : वर्धा जिल्ह्याकरिता वैद्यकीय महाविद्यालय मंजूर झाले आहे. ते वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाटला व्हावे यासाठी येथील सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी व कार्यकत्यांनी आज29 रोजी डॉ. आंबेडकर चौक येथून मार्च काढून तहसीलदार सतीश मासाळ यांच्या मार्फत जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांना निवेदन पाठवण्यात आले.
निवेदनात नमुद केल्यानुसार, वर्धा जिल्ह्यात वर्धा येथे जिल्हा रुग्णालय सह खाजगी क्षेत्रातील सेवाग्राम व सावंगी मेघे हे दोन वैद्यकीय विद्यालय आहे. हिंगणघाट हे शहर राष्ट्रीय महामार्गावर असून सतत अपघात होतात. गंभीर रुग्णांना सेवाग्राम अथवा सावंगी मेघे येथे नेताना अनेक रुग्णास प्राणास मुकावे लागते. काहींना नागपूर सुद्धा हलवावे लागते. यात प्राणहानीं सोबत आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. हिंगणघाट शहर आरोग्यसेवेच्या दृष्टीने मागासलेला शहर असल्याने अनेक गर्भवती माता व नवजात शिशू त्यांची प्रकृती गंभीर झाल्यावर ऐनवेळी नागपूरला पाठवावे लागतात. वर्धा येथे उपचाराकरता आलेल्या गर्भवती मातांपेक्षा हिंगणघाटच्या रुग्णांची संख्या अधिक असल्याचे एका सर्वेक्षणाअंती दिसून आलेले आहे. असे सुद्धा निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
हिंगणघाट विधानसभा क्षेत्र यवतमाळ, चंद्रपूर व नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागाशी जोडलेला असून येथील अनेक रुग्ण हिंगणघाट या मध्यवर्ती ठिकाणी येऊन उपचार घेऊन सायंकाळी घरी परत जातात शिवाय तेलंगणा राज्याची सीमा लागून असल्याने व चेन्नई नवी दिल्ली रेल्वे मार्गाने हिंगणघाट शहर जोडले असल्याने परराज्यातील अनेक रुग्ण उपचाराकरता हिंगणघाट शहरात येतात. या महत्त्वाच्या बाबी पाहून हिंगणघाट शहरात वैद्यकीय महाविद्यालय देण्यात यावे अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
मोर्चात उमेश तुळसकर, राजेंद्र खूपसरे, पंढरीनाथ कापसे, राजेश धोटे, अतुल वांदिले, अनिल भोंगाडे, सतीश ढोबे, रुपेश राजूरकर, गोपाल मांडवकर, सुरेंद्र टेंभुर्णे, प्रवीण काळे, प्रा. दिवाकर गुडघे, शंकर झाडे, प्रदीप नागपूरकर, मधुसूदन हरणे, आदी सहभागी झाले होते. शासनाची योग्य भूमिका न झाल्यास आम्हाला पर्यायी मार्ग शोधावा लागेल असे सुद्धा निवेदनकर्त्यांनी सांगितले आहे.