कार रेडिएटरपासून साकारला पोर्टेबल एसी कुलर

अभियांत्रिकीच्या दीपकुमार यादवचा शोध

    दिनांक :30-Mar-2023
Total Views |
तभा वृत्तसेवा
अमरावती, 
सध्याचे परीक्षेचे आणि उन्हाळ्याचे दिवस. अनेकांची परीक्षा सुरू आहे तर अनेकांच्या परीक्षा आटोपल्या आहेत. उन्हाळ्याची सुटी म्हणजे अभ्यासाच्या कटकटीपासून सुटका. या सुट्यांमध्ये मनमुराद आनंद लुटण्यावर विद्यार्थ्यांचा भर असतो. मात्र काहींसाठी हाच वेळ आपल्या कला-गुणांना साकारण्याची सुवर्ण संधी असते. असाच तंत्र आविष्कार खापर्डे बगिचास्थित Deepkumar Yadav दीपकुमार अजय यादव या अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याने साकारला. टाकाऊ वस्तूंपासून दीपकुमारने पोर्टेबल एसी-कुलर तयार केला असून पाहणार्‍यांकडून कौतुक होत आहे.
 
Deepkumar Yadav
 
बाल वैज्ञानिक यादव बंधू नावाने प्रसिद्ध Deepkumar Yadav दीपकुमार यादव सध्या मुंबई येथील व्हीजेआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयात मेकॅनिकल अभ्यासक्रमाच्या तिसर्‍या वर्षााला शिकत आहे. सध्या उन्हाळ्याच्या सुटीत तो अमरावतीत आपल्या घरी आला आहे. दीपने सर्वप्रथम घरात असलेल्या जुन्या व निकामी झालेल्या कार रेडिएटरला दुरूस्त केले. त्यानंतर घरातील जुन्या मोठ्या पीव्हीसी पाईपला गॅस शेगडीच्या माध्यामातून गरम करून कुलरची बॉडी तयार केली. त्यानंतर त्यामध्ये 12 व्होल्टची 555 डिसी मोटर, कुलर वॉटर पंप, एडेन्टर एसी टू डिसी कन्व्हर्टर, स्पीड कंट्रोलर आणि त्यावर एलईडी लाईट लावून पोर्टेबल एसी-कुलरचा आविष्कार केला. सध्या हा अनोखा एसी कुलर परिसरात आकर्षणाची वस्तू ठरला असून दीपकुमारच्या आविष्काराने निश्चितपणे विद्यार्थी वर्गाला एक नवप्रेरणा मिळेल.
 
 
केवळ 1500 रूपयामध्ये घरातील टाकाऊ वस्तूंपासून दीपकुमारने साकारलेल्या दोन फुटाच्या पोर्टेबल एसी-कुलरचे फायदे सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहेत. एक तर या कुलरद्वारे पाण्याची मोठी बचत होते. केवळ एका बादली पाण्यामध्ये रात्रभर थंड हवा राहते. पाण्याचे बाष्पीकरण होत नाही. विजेची वापर एकदम कमी होत असल्याने वाढीव बिलाची चिंता नाही. Deepkumar Yadav या एसी कुलरमध्ये कारमधील टाकाऊ रेडिएटरचा वापर असल्याने कमी पॉवरमध्ये एसी तर पंख्याचा पॉवर वाढविण्यास कुलरसारखी थंड हवा मिळते. विशेष म्हणजे, जुलै व ऑगस्ट महिन्यामध्ये दमट वातावरणात कुलर काम करीत नाही, मात्र, हा एसी- कुलर या दमट वातावरणावर अचुक थंड उपाय असल्याची माहिती दीपने बोलतांना दिली.