राकाँ, भाकप, तृणमूलने गमावला राष्ट्रीय दर्जा

आप बनला राष्ट्रीय पक्ष

    दिनांक :10-Apr-2023
Total Views |
तभा वृत्तसेवा
नवी दिल्ली,
निवडणूक आयोगाने सोमवारी एका मोठ्या निर्णयात (Aam Aadmi Party) दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला (आप) राष्ट्रीय पक्षाचा दर्जा बहाल केला तर, भाकप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस या तीन पक्षांचा हा दर्जा काढून घेतला. याशिवाय आयोगाने भारत राष्ट्र समिती आणि राष्ट्रीय लोकदल या दोन पक्षांचा प्रादेशिक पक्षांचा दर्जा काढून घेतला. राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळणे हे 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने आपसाठी मोठी उपलब्धी म्हटली पाहिजे. गुजरात विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या मतांच्या टक्केवारीनंतर आपला (Aam Aadmi Party) राष्ट्रीय पक्षांचा दर्जा मिळेल, अशी चर्चा सुरू होती, ती निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर प्रत्यक्षात आली.
 
Aam Aadmi Party
 
दिल्ली, गोवा, पंजाब आणि गुजरात या चार राज्यांत मिळालेल्या मतांच्या टक्केवारीचा आढावा घेतल्यानंतर आयोगाने आपला (Aam Aadmi Party) राष्ट्रीय पक्षाचा दर्जा दिला. दिल्ली आणि पंजाबमध्ये आपची सत्ता आहे. आपने राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवला तर, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस, ममता बॅनर्जी यांची तृणमूल काँग्रेस तसेच भाकप यांना आपला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गमवावा लागला. यामुळे देशात आता भाजपा, काँग्रेस, बसपा, माकप, नॅशनल पीपल्स पार्टी आणि आप असे सहा राष्ट्रीय पक्ष उरले आहेत.
 
 
के. चंद्रशेखर राव यांची भारत राष्ट्र समिती तसेच उत्तरप्रदेशातील जयंत चौधरी यांचा (Aam Aadmi Party) राष्ट्रीय लोक दल यांना आपला प्रादेशिक पक्षाचा दर्जा गमवावा लागला. भारत राष्ट्र समिती हा पक्ष आता तेलंगणात मान्यताप्राप्त राजकीय पक्ष म्हणून ओळखला जाईल. तेलंगणात सत्तेवर असलेल्या चंद्रशेखर राव यांच्या तेलंगणा राष्ट्र समितीने राष्ट्रीय राजकारणात पदार्पण करण्यासाठी आपल्या पक्षाचे नाव बदलून भारत राष्ट्र समिती असे केले होते. पंतप्रधानपदाचे स्वप्न पाहणार्‍या राव यांना आपल्या पक्षाचा प्रादेशिक पक्ष हा दर्जाही कायम ठेवता न येणे हा त्यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसला आता नागालॅण्ड आणि मेघालयमध्ये अनुक्रमे प्रादेशिक पक्षाचा दर्जा मिळू शकतो.
 
मतांच्या टक्केवारीनुसार मिळतो दर्जा
निवडणूक आयोग लोकसभा तसेच विविध राज्यातील विधानसभा निवडणुकीत (Aam Aadmi Party) राजकीय पक्षांना मिळणार्‍या मतांच्या टक्केवारीनुसार त्यांच्या राष्ट्रीय वा प्रादेशिक पक्ष दर्जाचा आढावा घेत असते. 2019 पासून आयोगाने आतापर्यंत 16 राजकीय पक्षांचा दर्जा उंचावला, तर 9 पक्षाचा दर्जा कमी केला.