विठुरायाच्या पूजेसाठी 2024 पर्यंतचे बुकिंग फुल्ल

    दिनांक :11-Apr-2023
Total Views |
सोलापूर,
अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या (Vitthal-Rukmini Temple) विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरच्या मंदिरात कायम गर्दी असते. आषाढी वारी आणि इतर महत्त्वाचे प्रसंग, सण सोडले तरी अगदी दररोज विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी भाविक पंढरपूरमध्ये दाखल होत असतात. त्यामुळे विठ्ठलाच्या मंदिरात कायमच भाविकांचा राबता असतो. यापैकी अनेक भाविकांच्या विठुरायाच्या चरणाला स्पर्श करण्याची, त्याची पूजा करण्याची मनोमन इच्छा असते. मात्र, या पूजाअर्चेसाठीही इतके जण इच्छूक आहेत की, पंढरपूरच्या मंदिरातील दैनंदिन पूजेसाठी पुढील वर्षीपर्यंतचे बुकिंग फुल्ल झाले आहे. या उपक्रमातून पंढरपूर (Vitthal-Rukmini Temple) विठ्ठल रुक्मिणी मंदिराची भरघोस कमाई झाली आहे.
 
Vitthal-Rukmini Temple
 
2024 या एका वर्षातील नित्यपूजेसाठी एकूण 300 बुकिंग झाले आहेत. या माध्यमातून विठ्ठल मंदिराला 75 लाख रुपये तर रुक्मिणी मंदिराला 33 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. पंढरपुरात दररोज पहाटे चार ते पाच या वेळेत (Vitthal-Rukmini Temple) विठ्ठल आणि रुक्मिणी मातेची नित्यपूजा करण्यात येते. यात विठ्ठलाच्या नित्येपूजेसाठी 25 हजार तर, रुक्मिणीच्या नित्येपूजेसाठी 11 हजार रुपयांचे शुल्क आकारले जाते. हे शुल्क भरल्यानंतर ठरलेल्या दिवशी संबंधित भाविक आणि त्याच्यासोबतच्या दहाबारा लोकांना नित्यपूजेसाठी मंदिरात प्रवेश देण्यात येतो.
 
 
विठुरायावर असलेल्या श्रद्धेपोटी ही नित्यपूजा करायला मिळावी, अशी प्रत्येक भाविकाची इच्छा असते. कोरोनाच्या काळात विठ्ठल मंदिरातील नित्यपूजा बंद करण्यात आली होती. त्यामुळे नित्यपूजेसाठी बुकिंग असलेल्या भाविकांची संधी हुकली होती. मात्र, जानेवारी महिन्यापासून (Vitthal-Rukmini Temple) विठ्ठल-रखुमाईच्या नित्यपूजेला सुरुवात झाली असून, रोज पाच भाविक कुटुंबांना मंदिरात प्रवेश दिला जातो.