स्त्री शिक्षणाचे प्रणेते - महात्मा ज्योतिबा फुले

11 Apr 2023 08:08:08
महात्मा ज्योतिबा फुले जयंती
 
रणवीरसिंह राजपूत 
 
 
पुरुषप्रधान समाजव्यवस्थेत शतकानुशतके अज्ञानाच्या अंध:कारात पशुसमान जीवन जगणाऱ्या स्त्रियांना सामाजिक गुलामगिरीतून मुक्त करण्याचं महान कार्य (Mahatma Jyotiba Phule) महात्मा ज्योतिबा फुले अन् सावित्रीबाई फुले यांनी केलं,ही अद्वितीय अन् अतुलनीय गोष्ट आहे.स्त्री शिक्षणाचे प्रणेते ज्योतिबा फुलेंना जयंती दिनानिमित्त भावपूर्ण आदरांजली!
 
जोतिबांचा जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी सातारा जिल्ह्याच्या खटाव तालुक्यातील 'कटगुण' या गावी झाला.त्यांच्या आईचे नाव चिमणाबाई तर,वडिलांचे गोविंदराव फुले.क्रांतीसुर्य (Mahatma Jyotiba Phule) ज्योतिबा फुले यांनी शिक्षणातून समाज प्रबोधन व जातीभेद निर्मूलन चळवळ राबवून गुलामगिरी, छूत-अछुत,वर्णभेद सारख्या समाजविघातक जातीव्यवस्थेतील अपप्रवृत्तींचा नायनाट केला अन् त्याजागी सामाजिक समता,धार्मिक सहिष्णुता व आर्थिक न्याय प्रस्थापित केला. सर्वात महत्वाचे म्हणजे ज्योतिबांनी रायगड किल्ल्यावरील छ्त्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे जीर्णोद्धार केले.रयतेचे राजा शिव छत्रपतींप्रती ज्योतिबांना नितांत आदर होता.

Mahatma Jyotiba Phule
 
तत्कालिन समाजातील पददलित,शेतकरी,कामगार व विधवा परित्यक्त्या महिला या घटकांना न्याय मिळावा,यासाठी फुलेंनी प्रखर लढा देऊन सामाजिक क्रांती घडवून आणली.तळागाळातील लोकांमध्ये आपल्या हक्कांची जाणीव निर्माण व्हावी,या उद्देशाने त्यांनी 'गुलामगिरी' ही कादंबरी लिहिली.
 
 
'निरक्षरता' हे गुलामगिरीचं मुळ कारण असल्याने त्यांनी मागासवर्गीयांसाठी विविध ठिकाणी शैक्षणिक संस्था स्थापन केल्या.माणूस हा जन्माने वा जातीने नव्हे तर,आपल्या कर्तुत्वाने श्रेष्ठ-कनिष्ठ ठरत असतो,हा विचार त्यांनी रयतेला दिला.सामाजिक व आर्थिक विषमतेवर आधारित समाजव्यवस्थेला झुकारून समतेवर आधारित नवसमाजाची निर्मिती करण्यासाठी फुलेंनी 'सत्यशोधक समाज' ची स्थापना केली. गरीब,निर्धन मुलींचे विवाह कमी खर्चात संपन्न व्हावेत,यासाठी (Mahatma Jyotiba Phule) फुलेंनी सत्यशोधक विवाहाची प्रथा सुरू केली.त्यामुळे हुंडा घेऊन लग्न करण्याच्या अमानवीय पद्धतीवर गदा आली.विधवा मुलींच्या केशवपन पद्धतीविरुद्ध लढा पुकारून त्यांनी ती पद्धती बंद करण्यास भाग पाडले.

Mahatma Jyotiba Phule
 
इतकेच नव्हे तर,अज्ञानाच्या अंधारात बंदिस्त स्त्रियांची मुक्तता करण्यासाठी त्यांनी १ जानेवारी १८४८ रोजी पुणे येथील भिडेंच्या वाड्यात मुलींच्या पहिल्या शाळेची मुहूर्तमेढ करून स्त्री शिक्षणाचे नवं पर्व सुरू केलं.ह्या शाळेच्या पहिल्या शिक्षिका म्हणून ज्योतिषांनी सावित्रीबाई फुले यांची नियुक्ती केली.ही शाळा पारतंत्र्याच्या काळातील पहिली मुलींची शाळा गणली गेली अन् सावित्रीबाई ह्या देशातील पहिल्या शिक्षिका म्हटल्या गेल्या.फुलेंना स्त्रियां विषयी नितांत आदर व आपुलकी होती.ज्योतिबा म्हणत,"स्त्रियांना 'चूल अन् मुल' या चौकटीत बंदिस्त करायला नको.कारण एक स्त्री शिकली तर,एक कुटुंब शिक्षित होते. पण साऱ्या स्त्रिया शिकल्या तर,संपूर्ण देश जागृत होतो".
 
"बारा वर्षाखालील मुला-मुलींना मोफत शिक्षण दिलं पाहिजे",ही त्यांची मागणी होती.त्यांनी 'हंटर कमिशन' पुढे आपली कैफियत मांडताना त्यांनी आपल्या आवेशपूर्ण वक्तव्यात म्हटलं की,केवळ "उच्चवर्णियांसाठीच शैक्षणिक धोरण न मांडता,समानतेच्या आधारावर तळागाळातील लोकांच्या पाल्यांसाठीही शिक्षणाची सोय व्हावी".त्यांच्या मतानुसार समाजातील गरजू उपेक्षित घटकांना शिक्षण दिलं तर,सामाजिक गुलामगिरी संपुष्टात येऊन आर्थिक संपन्नता येईल.महत्वाचे म्हणजे मागासवर्गीयांमध्ये आपल्या मानवी हक्कांची जाणीव निर्माण होईल. (Mahatma Jyotiba Phule) ज्योतिबा हे सामाजिक समतेचे पुरस्कर्ते होते,हे दृष्टोत्पत्तीस येते.
 
ज्योतिबा म्हणत, विद्येविना मती गेली,मतीविना निती गेली,नीतिविना गती गेली,गतिविना वित्त गेले,इतके अनर्थ अविद्येने केले*. स्त्रियांना शिक्षण मिळावे अन् तत्कालिन समाजातील निरक्षरता व गुलामगिरीचं उच्चाटन व्हावं, यासाठी (Mahatma Jyotiba Phule) फुले दांपत्याने सारं आयुष्य पणाला लावलं.आपल्या शाळेकडे प्रस्थान करताना,त्यांना कर्मकांडी समाजाच्या छळाला सामोरे जावे लागायचे.अर्वाच्य शब्दात टोमणे मारणे,अंगावर शेणचिखल फेकणे आदी अमानुष कृत्ये केली जायायची.इतकेच नव्हे तर, ऐकेप्रसंगी तर डोक्यावर दगड लागून सावित्रीबाई अक्षरशः रक्तबंबाळ झाल्या होत्या.तथापि संयमशील राहून फुले दांपत्याने तसूभरही विचलित न होता,आपली ध्येयपूर्ती करण्यासाठी वाटचाल सुरूच ठेवली.त्याचं फलित म्हणजे आज सावित्रीच्या लेकी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून विविध क्षेत्रात आघाडी घेताना दिसताहेत,ही फुले दाम्पत्याचीच पुण्याई म्हणावी.यास्तव त्यांना त्रिवार मानाचा मुजरा!
 
सावित्रीबाईंनी अनाथ मुले-मुली,विधवा,परित्यक्त्या महिलांना आपल्या दारी आश्रय दिला.स्त्री शिक्षणाची मोहीम राबविण्याआधी फुलेंनी सर्वप्रथम सावित्रीबाईंना शिक्षित केलं. 'जिच्या हाती पाळण्याची दोरी,ती राष्ट्राला उद्धारी' या शब्दात (Mahatma Jyotiba Phule) फुलेंनी रयतेला स्त्री महात्म्य विषद केलं.सन १८७७ मध्ये पडलेल्या भीषण दुष्काळाच्या परिस्थितीत फुले दांपत्याने गावोगावी फिरून निधी जमवला.याशिवाय धनकवडी येथे व्हिक्टोरिया बालाश्रम उभारून तेथे सुमारे एक हजार अनाथ-निराधार लहान मुलांची भोजन व्यवस्था केली.प्रतिबंधक गृहातील मुलांना सावित्रीबाईंनी मायेची ऊब देत त्यांना आपलेसे केले.पुण्यात प्लेगची साथ पसरली असता,त्याकडे इंग्रज सरकारने वैद्यकीय साधनसामग्री देण्यास अक्षम्य दुर्लक्ष केलं.त्याचा फुले दांपत्याने जाहीर धिक्कार केला.तथापि,आपला दत्तक पुत्र डॉ.यशवंतराव यांनी प्लेगग्रस्त रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केलेत.अखेर या लढ्यात त्यांचा अन् सावित्रीबाईंचा प्लेगची लागण होऊन दुःखद निधन झाले.अशाप्रकारे त्यांनी लोकांचे जीव वाचविण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली.त्यांच्या महान बलिदानाला आम्ही त्रिवार वंदन करतो.वास्तवात फुले दाम्पत्य हे मानवतावादी धर्माचं मूर्तिमंत प्रतिक होत,हे सिद्धीस येते.

Mahatma Jyotiba Phule
 
ज्योतिबांना (Mahatma Jyotiba Phule) शेतकरी वर्गाविषयी मोठी कणव होती.शेतकऱ्यांचा आर्थिक विकास अन् त्यांच्या पाल्यांना सक्तीचे शिक्षण हा ज्योतिबांच्या समाज प्रबोधनाचा एक प्रमुख भाग होता.शेतकऱ्यांना कृषी उत्पादनविषयी उपयुक्त मार्गदर्शन मिळावे,या उद्देशाने त्यांनी 'आसूड' हे पुस्तक लिहिले.शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञान अवगत व्हावे अन् त्यांच्या पिकाला योग्य तो बाजारभाव मिळावा,या मागण्या त्यांनी इंग्रज प्रशासनासमोर आग्रहीपणे मांडल्या.सावकारी पाशातून शेतकरी बांधव पूर्णपणे मुक्त व्हावा,यासाठी त्यांनी सावकारी पद्धतीविरुद्ध आवाज उठविला. ज्योतिबांनी इंग्रज सरकारला डेक्कन ॲग्रिक्लचर्स रिलीफ ॲक्ट संमत करण्यास भाग पाडले.शेतकऱ्यांचे प्रश्न मानवतावादी दृष्टिकोनातून इंग्रज सरकारने मार्गी लावावेत,यासाठी त्यांनी प्रखर लढा दिला.या पार्श्वभूमीवरच फुलेंना 'शेतकऱ्यांचे कैवारी' म्हटले जायचे.
 
ज्योतिबा (Mahatma Jyotiba Phule) हे कामगारांच्या प्रश्नाबाबतदेखील जागृत होते. 'मार्क्सच्या तत्त्वज्ञानातील वर्गयुद्ध' हे ऐतिहासिक सत्य आहे,असे फुलेंचे ठाम मत होते.या पार्श्वभूमीवर कामगारांना मूठभर भांडवलदारांविरुद्ध लढा देण्यास मानसिकदृष्ट्या तयार केले. 'उठा व लढा' असे आग्रही आवाहन त्यांनी कामगारांना केले.कामगारांमध्ये आपल्या हक्कांविषयी जागृती निर्माण करण्याचे काम ज्योतिबांनी तनमनधनाने केलं.आर्थिक शोषण अन् बौद्धिक गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी फुलेंनी कामगार लढा उभारला.कामगारांना आर्थिक विकास करण्यासाठी उन्नतीचा मार्ग दाखविला.यामुळेच ज्योतिबांना 'कामगारांचा मसिहा' म्हणतात.
 
थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले अन् स्त्री शिक्षणाच्या प्रवर्तक सावित्रीबाई फुले यांनी हातात हात घालून तत्कालिन रुढीप्रिय समाजातल्या जातीभेद,वर्णभेद,केशवपन, बालविवाह या कुप्रथांना कडाडून विरोध केला तर,विधवा पुनर्विवाहास पाठिंबा दिला.ज्योतिबा म्हणतात, सार्वभौम सत्य स्वतः आचरावे,सुखे वागावे पंगू लोका,अशा वर्तनाने सर्वा सुख द्याल अन् स्वतः सुखी व्हाल,ज्योती म्हणे!
 
 
आपल्या उजव्या हाताला अर्धांगवायू झाला असता,त्यांनी डाव्या हाताने लिहून आपला 'सार्वजनिक सत्यधर्म' हा ग्रंथ पूर्ण करून नवसमाजाला समर्पित केला.यावरून हे सिद्ध होते की,त्यांना समाजप्रबोधनाची किती तळमळ होती.सामाजिक समतेचा अखंड लढा देत असताना दुर्दैवाने २८ नोव्हेंबर १८९० रोजी त्यांचं अर्धांगवायूच्या झटक्याने दुःखद निधन झालं.आज (Mahatma Jyotiba Phule) ज्योतिबा जरी आपल्यात नसले तरी,त्यांचे समतेचे विचार आजही आमच्या मनात जिवंत आहेत.त्यांना आमचा दंडवत प्रणाम! महाराष्ट्राला 'शाहू -फुले -आंबेडकर' यांचा समृद्ध सामाजिक वारसा लाभला, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.ज्योतिबा फुले यांच्या पावलावर पाऊल टाकत,राज्य सरकारने १२ वर्षाखालील मुला-मुलींना मोफत सक्तीचं प्राथमिक शिक्षण जाहीर केलं.यापूर्वी बडोद्याचे सयाजीराव गायकवाड आणि साताराचे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी आपापल्या संस्थानांत फुलेंचा प्राथमिक शिक्षणाचा नियम लागू केला.त्याचप्रमाणे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनीही राज्यघटनेच्या ४५ व्या कलमात मुला-मुलींच्या प्राथमिक शिक्षणाची जबाबदारी राज्य व केंद्र सरकारवर टाकली.खरं तर,महाराष्ट्र सरकार हे ज्योतिबा फुले यांचे पाईक आहे.
 
ज्या पुण्यातील भिडेंच्या वाड्यात फुले दांपत्याने भारतातील पहिली मुलींची शाळा काढली होती, त्या शाळेचा पुनर्विकास करण्यासंदर्भात, शिंदे-फडणवीस महायुतीच्या सरकारने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीचा आदर करत कृतज्ञतेच्या भावनेतून महाराष्ट्र सरकारने पुणे विद्यापीठाचे नामांतर करून 'सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ' असे नाव दिले.तसेच राज्यात अनेक ठिकाणी फुले दाम्पत्याच्या नावाने शैक्षणिक संस्था आणि मागास जातींच्या मुला-मुलींसाठी राज्य शासनाकडून वसतिगृहे चालविले जात आहेत.जेणेकरून तळागाळातील लोकांच्या पाल्यांना शिक्षणासह विविध शिष्यवृत्तींची सोय होऊ शकेल.राज्यातील गोरगरीब,गरजू लोकांना आपल्या महागड्या ऑपरेशन्ससाठी वैद्यकीय अर्थसहाय्य उपलब्ध व्हावे,यासाठी राज्य सरकारने 'महात्मा फुले जनआरोग्य योजना' राबविली. त्याचप्रमाणे अनुसूचित जातींच्या उमेदवारांना स्वयंरोजगारासाठी नाममात्र व्याज दरात अर्थसहाय्य देण्यासाठी राज्य सरकारने 'महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळ' स्थापन केलं.सांगण्याचं तात्पर्य म्हणजे क्रांतीसूर्य (Mahatma Jyotiba Phule) महात्मा ज्योतिबा फुले यांच्या संकल्पनेतील पुरोगामी महाराष्ट्राची उभारणी करणं,म्हणजेच त्यांना खरी आदरांजली ठरेल.जय हिंद! जय महाराष्ट्र!
 
सदस्य,महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ,कोंकण विभाग
- ९९२०६७४२१९
Powered By Sangraha 9.0