अजित पवार हीच राष्ट्रवादी काँग्रेस, लवकरच तिथी येणार

- गुलाबराव पाटलांचे सूचक वक्तव्य

    दिनांक :16-Apr-2023
Total Views |
जळगाव,
विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) हीच राष्ट्रवादी काँग्रेस आहे. त्यामुळे अजित पवार जे बोलतील, तोच आमदारांचा आकडा त्यांच्यासोबत असेल, असे वक्तव्य (Gulabrao Patal) मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. लग्न व्हायचे असेल तर, तिथीची गरज असते. तो तिथी लवकरच येणार असल्याचे सूचक वक्तव्य पाटील यांनी केले आहे. ते जळगावमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
 
Ajit Pawar
 
अजित पवार (Ajit Pawar) युतीत येणार असल्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान, अजित पवारांसोबत बरेच आमदार असून, कोणतेही लग्न व्हायचे असेल तर, तिथीची गरज असते. मात्र, त्यासाठी अजून कुळ बघावे लागेल, गुण जुळवावे लागतील. नंतरच ते काम करावे लागेल, असे सूचक वक्तव्य (Gulabrao Patal) गुलाबराव पाटलांनी केले. या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.
 
 
अंजली दमानियांचा दावा
मंत्रालयात कामानिमित्त गेले होते, त्यावेळी तिथे एका व्यक्तीने मला गमतीशीर माहिती दिली. त्याच्या मते, 15 आमदार बाद होणार आहेत आणि अजित पवार (Ajit Pawar) भाजपासोबत जाणार आहेत. तेही लवकरच बघू. किती दुर्दशा होतेय् महाराष्ट्राच्या राजकारणाची, असे ट्विट सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केले होते.
 
 
पवार असे काही करणार नाहीत : नाना पटोले
अजित पवार (Ajit Pawar) असे काही करणार नाहीत, अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी व्यक्त केली. भाजपाविरोधी पक्षांना सोबत घेऊन पुढे जाण्याची काँग्रेसची स्पष्ट भूमिका आहे. ही वैचारिक लढाई आहे. सत्यपाल मलिक यांनी पुलवामा हल्ल्यासंदर्भात जी भूमिका मांडली, ती अंगावर काटा आणणारी आहे. देशाची सुरक्षा धोक्यात असल्याचे पटोले म्हणाले.