अमरावती बसस्थानकाची अशीही दुर्दशा

- जळमटांनी माखलेले छत, प्रवेद्वारावर कचरा
- हिंदू जनजागृती समितीचे निवेदन

    दिनांक :17-Apr-2023
Total Views |
तभा वृत्तसेवा 
अमरावती, 
एकीकडे बसस्थानक (Amravati bus station) स्वच्छता मोहीम चालू आहे आणि दुसरीकडे महिनोंमहिने छताला झाडूही न लावल्यामुळे अमरावती मध्यवर्ती बसस्थानकाचे छत जळमटांनी आच्छादले आहे. प्रवेशद्वारातच कचर्‍याचा ढीग, तेथेच कचरा जाळल्याची राख, भूमीगत नाल्याचे बसस्थानकाच्या परिसरात पसरत असलेले घाणीचे पाणी आदींमुळे स्वच्छता मोहिमेचे या स्थानकावर तीनतेरा वाजले आहेत. त्यामुळे याबाबत त्वरित व्यवस्था करण्याच्या मागणीचे निवेदन हिंदू जनजागृती समितीच्या सुराज्य अभियानतर्फे एसटी महामंडळाच्या अधिकार्‍यांना देण्यात आले आहे.
 
Amravati bus station
 
या बसस्थानकाच्या (Amravati bus station) आवारात नाल्यातून बाहेर आलेल्या अस्वच्छ पाण्यातूनच प्रवाशांना चालावे लागते. अनेक दिवसांपासून ही समस्या असूनही नाल्यातून बाहेर येणार्‍या पाण्याचा अटकाव करण्यात आलेला नाही. छताच्या काही भागाचे प्लास्टर निखळून आतील लोखंडी सळ्या दिसत आहेत. वेळीच डागडुजी केली नाही, तर छताचे प्लास्टर आणखीही निखळण्याची शक्यता आहे. स्थानकात बाकड्यांच्या बाजूलाच प्रवासी पान, गुटखा खाऊन थुंकतात. हे रोखण्यासाठी सूचना लावणे आणि त्यानंतरही पालट न झाल्यास दंडात्मक कारवाई करणे आवश्यक आहे; मात्र याकडे दुर्लक्ष केले जात आहे. पान, गुटखा खाऊन बसस्थानकाच्या परिसरात पिचकार्‍या उडवण्यात येत असल्यामुळे बसस्थानक अस्वच्छ झाले आहे.
 
 
अशा दुर्गंधीत आणि अस्वच्छतेत प्रवाशांना बसची (Amravati bus station) वाट पहावी लागते. एकूणच जळमटांचे आच्छादन, छताला गेलेले तडे, कचर्‍याचे ढीग, भूमीगत नालीतून बाहेर येणारे पाणी आदी अमरावती बसस्थानकाच्या अस्वच्छतेला कारण ठरत आहेत. राज्यात बसस्थानक स्वच्छता मोहीम चालू असल्यामुळे अमरावती बसस्थानकाच्या प्रमुखांकडून याविषयी उपाययोजना करणे आवश्यक आहे. मात्र, सुकृतदर्शनी तसे होतांना सध्यातरी दिसत नाही. या समस्यांवर उपाययोजना करण्याबाबत हिंदु जनजागृती समितीच्या सुराज्य अभियानतर्फे आगार व्यवस्थापक सुहास पांडे, विभाग नियंत्रक नीलेश बेलसरे व पालकमंत्री यांना निवेदन देण्यात आले असल्याचे समितीचे नीलेश टवलारे यांनी कळविले आहे.