नवी दिल्ली,
इथेनॉल उत्पादन आणि पोल्ट्री उद्योगासाठी धान्याची वाढती मागणी पाहता देशातील (Maize production) मक्याचे उत्पादन पुढील पाच वर्षांत ४.४ ते ४.५ दशलक्ष टनांपर्यंत वाढवणे आवश्यक आहे. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण सचिव मनोज आहुजा यांनी आज FICCI तर्फे आयोजित नवव्या 'इंडिया मका समिट'मध्ये ही माहिती दिली. संपूर्ण मका मूल्य साखळीतील तोटा पद्धतशीरपणे कमी करण्याच्या गरजेवरही त्यांनी भर दिला.
आहुजा म्हणाले, सध्या देशात मक्याचे उत्पादन (Maize production) ३.३ ते ३.४ दशलक्ष टन आहे. इथेनॉल आणि पोल्ट्री उद्योगातील वाढत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी आम्हाला पुढील पाच वर्षांत मक्याचे उत्पादन ४.४ ते ४.५ दशलक्ष टनांपर्यंत वाढवण्याची गरज आहे. ते म्हणाले की, हवामान बदलाच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर बियाण्याची उपलब्धता सुधारणे, साठवणूक आणि विपणन संबंध प्रस्थापित करणे, सार्वजनिक आणि खाजगी भागीदारी निर्माण करणे यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. महाराष्ट्राचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी या कार्यक्रमात सांगितले की, महाराष्ट्रात मका मूल्य साखळी आणि इथेनॉल उत्पादनात गुंतवणूक करण्यास इच्छुक असलेल्या खाजगी कंपन्यांना राज्य सरकार मदत करण्यास तयार आहे.