मुंबई,
केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) हे राजकीय क्षेत्रातील एक प्रभावशाली व्यक्तिमत्व असल्याने त्यांना महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात 2021 मध्ये केलेल्या वक्तव्याच्या परिणामांची जाणीव होती. मात्र, त्यांनी कोणत्याही समुदायाला लक्ष्य केले नसल्याने त्यांचे वक्तव्य कायद्यातील तरतुदीनुसार कोणतीही वैरभावना वाढवणारे नव्हते, असे येथील न्यायादंडाधिकारी न्यायालयाने म्हटले आहे.
रायगड येथील न्यायालयाने शनिवारी या खटल्यातून राणे यांची निर्दोष मुक्तता करताना स्पष्ट केले की, रेकॉर्डवरील साहित्य आणि कागदपत्रे त्यांच्यावरील गुन्ह्यातील सर्व घटक असल्याचे उघड करीत नाहीत. त्यामुळे त्यांच्या विरोधात करण्यात आलेले आरोप हे तथ्यहीन असल्याचे न्यायालयाने म्हटले. आरोपीने केलेले वक्तव्य बादग्रस्त आणि राजकीयदृष्ट्या असंवेदनशील असल्याचे म्हटले जाऊ शकते. हे केंद्रीय मंत्रिपदावर असलेल्या व्यक्तिकडून अपेक्षित नाही, असे निरीक्षण रायगड-अलिबागचे मुख्य न्यायदंडाधिकारी एस. डब्ल्यू, उगले यांनी उद्धव ठाकरे यांच्याविरोधात केलेल्या वादग‘स्त वक्तव्यप्रकरणी नारायण राणे (Narayan Rane) यांची निर्दोष मुक्तता करताना नोंदवले. या निर्णयाची तपशीलवार प्रत रविवारी उपलब्ध झाली.
या प्रकरणी नारायण राणे यांच्याविरोधात 2021 मध्ये खटला दाखल करण्यात आला होता. देशाला स्वातंत्र्य कोणत्या साली मिळाले हे मुख्यमंत्री ठाकरे यांना माहीत नाही, ही लाजीरवाणी बाब असल्याची टीका नारायएण राणे यांनी केली होती. भाषण करताना, स्वातंत्र्य कधी मिळाले, हे विचारण्यासाठी मागे झुकले. मी तिथे असतो तर, एक कानाखाली वाजवली असती, असे वक्तव्य (Narayan Rane) नारायण राणे यांनी केले होते.