36 पानांच्या लग्नपत्रिकेत वैचारिक श्रीमंती!

    दिनांक :22-Apr-2023
Total Views |
वेध
- विजय निचकवडे
मुक्तहस्ताने पैशाची उधळण आणि त्या माध्यमातून श्रीमंतीचे दर्शन घडविण्याची एक चांगली संधी म्हणजे Shivshahi marriage card लग्न सोहळा! ज्यांच्याकडे रग्गड पैसा आहे, अशांकडील लग्न म्हणजे नेहमीच चर्चेचा विषय होतो. असेच एक लग्न येत्या 23 एप्रिल रोजी होऊ घातले आहे. हेही लग्न श्रीमंतीचे दर्शन घडविण्यात मागे राहिले नाही; मात्र ही श्रीमंती आहे वैचारिकतेची! चक्क 36 पानांच्या पत्रिकेतून या महानुभावांनी सामाजिक उत्थानासाठी कार्य करणार्‍या थोर दाम्पत्याच्या वैवाहिक गाथांसोबतच पुरोगामी, ऐतिहासिक आणि सामाजिक विषयांवर भाष्य केले आहे. नवदाम्पत्याचे 36 गुण जुळले की नाही माहीत नाही, पण 36 पानांची ही पत्रिका लग्नाआधीच डंका पिटून गेली.
 
 
vivah-patrika
 
लग्न जुळविण्याचा विषय आला की, सर्वात आधी घोडं अडतं ते, 36 गुण जुळतात की नाही यावर! मग तडजोड होते आणि दोन्ही कुटुंबांचे समाधान होईल, असे गुण जुळले की, वरात पुढे सरकते. लग्न जुळले की, ते कोणत्या दिमाखात उरकले जाते, यावरही बरेच काही अवलंबून असते. लग्नाचा बडेजाव, थाट दिसावा म्हणून अमाप पैसा खर्च करून श्रीमंतीचे दर्शन घडविण्याची स्पर्धाच सध्या शाही विवाह सोहळ्यांच्या निमित्ताने सुरू झाली आहे. मग त्या हजारो लोकांच्या उठलेल्या जेवणाच्या पंगती असो किंवा अगदी शिवशाही थाटात लग्न सोहळे आटोपण्याच्या इच्छेने आणलेले मावळे, बग्गी आणि अन्य दिखाव्याचे साधन असो. आज लग्न सोहळ्यांमध्ये याचेच लोन अधिक पसरत आहे. मात्र, सामाजिक जाणीव ठेवून होणारे सोहळे क्वचितच पाहायला मिळतात. सध्या एक विवाह सोहळा होण्याआधीच चर्चेत आला आहे, तो त्याच्या Shivshahi marriage card लग्नपत्रिकेमुळे! होय, जोडप्याचे 36 गुण जुळले की नाही माहीत नाही, पण 36 पानांची ही लग्नपत्रिका महाराष्ट्रातील लोकांना अप्रत्यक्षरीत्या 23 एप्रिल रोजी होणार्‍या शिखरे व डोंगरे कुटुंबीयांच्या विवाहाशी मात्र जोडत आहे. बुलढाणा येथील सेवानिवृत्त अभियंता असलेल्या शिखरे कुटुंबात असलेल्या लग्नाची पत्रिका चक्क 36 पानांची आहे. एरवी 1, 2, 4 फार तर 5 पानांची लग्नपत्रिका आपण पाहिली असेल.
 
 
 
मग 36 पानांच्या पत्रिकेत नेमके काय असेल, हा प्रश्न पडणे साहजिकच आहे. या 36 पानांमधून चक्क सामाजिक जाणीव जपण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. Shivshahi marriage card ‘शिवशाही लग्न पत्रिका’ या नावाने छापलेल्या पत्रिकेत नेहमीप्रमाणे नातेवाईकांच्या नावाचा भरणा नाही. केवळ नवरा मुलगा आणि मुलीची माहिती व त्यांचे फोटो आहेत. मात्र, त्यानंतर जे काही आहे, ते कमाल आहे. पुरोगामी, ऐतिहासिक, सामाजिक विषयांवर भाष्य करणारी माहिती आहे. संत, महात्मे, महापुरुषांचे बोधामृत यात मुद्रित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील ज्या थोर दाम्पत्यांनी सामाजिक उत्थानासाठी कार्य केले त्यांच्या विवाहाची गाथा यात आहे. आवळी-संत तुकाराम, शिव-पार्वती, सावित्रीबाई-जोतिबा फुले, कॅप्टन लीला-सेनापती उत्तम पाटील, जिजाऊ-शहाजी राजे, सोयराबाई-शिवाजी महाराज, महाराणी देवी-सम्राट अशोक अशा अनेकांचे चरित्र यात आहे. सोबतच संत चोखामेळा, बहिणाबाई चौधरी, जनाबाई, मुक्ताबाई आणि अन्य संतांचे अभंग यात पाहायला मिळतात. सरोजिनी नायडू, रुपाली गायकवाड यांच्यासारख्या आजच्या विभूतींचा उल्लेख आवर्जून करण्यात आला आहे.
 
 
एकूणच ही लग्नपत्रिका केवळ आवतन देण्यापुरतीच राहिली नसून कसे वागावे, कसे जगावे याचा संदेश देणारीही ठरली आहे. आज लग्नपत्रिका म्हणजे मोठेपणा दाखविण्याचे साधन झाले असता, शिखरे कुटुंबीयांची ही पत्रिका मात्र पैशाच्या श्रीमंतीपेक्षा साहित्याची श्रीमंती दाखविणारी आहे. लग्न होताच कचर्‍याच्या टोपलीत जाणार्‍या पत्रिकांच्या रांगेत ही पत्रिका जाणार नाही, हे मात्र नक्की! एक संग्रहित दस्तावेज म्हणून याकडे पाहिले गेल्यास ते अतिशयोक्ती होणार नाही. लग्नाआधीच चर्चेत आलेले हे लग्न पत्रिकेच्या निमित्ताने समाजप्रबोधनाच्या कामाला आणि उधळपट्टीची मानसिकता ठेवणार्‍यांना जराही दिशा बदलण्यास भाग पाडणारे ठरले तरीही हा सर्व खटाटोप सार्थकी लागेल, असे म्हणता येईल. 
 
- 9763713417