सचिन तेंडुलकर : देदीप्यमान यशामागील अथक परिश्रम

23 Apr 2023 05:55:00
- किशोर उ. इंगळे
लहानपणी त्याची आवड टेनिस या खेळाची होती आणि त्याचा आदर्श अमेरिकन टेनिसपटू जॉन मॅकेन्रो होता. त्याच्यासारखेच कुरळे केस व हेअरबँड लावण्यापर्यंत त्याची तयारी झाली होती. दरम्यान, बालसुलभ मस्तीमुळे तो व त्याचा मित्र एकदा घराजवळच्या झाडावर चढले व उंचावरून खाली पडले. सुदैवाने इजा झाली नाही, पण आता याला कुठेतरी योग्य दिशेने वळवावे या उद्देशाने त्याच्या भावाने त्याला एका क्रिकेट प्रशिक्षण शिबिरात दाखल केले आणि टेनिस वा क्रिकेट यापैकी कोणताही एक पर्याय निवडायला सांगितले. काही दिवसांतच तो त्या शिबिरात रुळला. आवड निर्माण झाली आणि सरांबद्दलही जवळीक व आदर निर्माण होऊन त्याने क्रिकेट हा पर्याय निवडला. अथक परिश्रम घेतले. आजच्या घडीला त्याच्याकडे यश, प्रसिद्धी, पैसा, प्रतिष्ठा, नावलौकिक, पुरस्कार सर्वकाही आहे. घराला घरपण देणारी डॉक्टर पत्नी व दोन मुले आहेत. फक्त एकच गोष्ट नाही, ती म्हणजे मनमोकळं व स्वच्छंदी जीवन जगणे. त्याचे चाहतेही इतके आहेत की, साधी भेळपुरी खायला तो चौपाटीवर जाऊ शकत नाही. फिरण्यासाठी किंवा सिद्धीविनायकाच्या दर्शनाला जाण्यासाठी त्याला निशाचर व्हावे लागते, याची जाणीव त्यालाही आहे; पण त्याचा नाईलाज आहे. तो आहे भारताचा मास्टर ब्लास्टर ‘भारतरत्न’ Sachin Tendulkar सचिन रमेश तेंडुलकर आणि ते सर आहेत रमाकांत आचरेकर.
 
 
sachin2
 
Sachin Tendulkar सचिन तेंडुलकर या व्यक्तिमत्त्वाचा आवाका फार मोठा आहे. तो एक ईश्वरी संकेत आहे. म्हणूनच ज्येष्ठ क्रीडा समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांनी म्हटल्याप्रमाणे, देवाने सचिनची निर्मिती केल्यानंतर तो ढाचा मोडून टाकला. ‘दुसरा बालगंधर्व होणे नाही’ तसा ‘दुसरा सचिन होणे नाही’ असं म्हटल्यास अतिशयोक्ती होऊ नये. सामान्यत: सर्व लहान मुलांवर आईवडिलांचा प्रभाव असतो व तेच प्रथम गुरूही असतात. सचिनच्या वडिलांनी त्याला लहानपणी एक गुरुमंत्र वा कानमंत्र दिला होता... ‘‘बेटा सचिन, माणसाचं जीवन हा एक ग्रंथच आहे. त्यात यश व अपयश, सुख व दु:ख अशी अनेक प्रकरणं असतात; ज्यातून मनुष्य शिकत व घडत जातो. तू क्रिकेटपटू आहेस जे त्यातील एक प्रकरणच आहे. माणसाचा सर्वसाधारणपणे जगण्याचा कालावधी 75-80 वर्षे गृहीत धरला तर तू साधारण 20-25 वर्षे क्रिकेट खेळशील. उरलेलं आयुष्य तुला एक माणूस म्हणूनच जगायचं आहे. त्यामुळे ‘तू एक चांगला महान क्रिकेटपटू आहेस’ यापेक्षा ‘सचिन एक चांगला माणूस आहे’ असं लोकांकडून ऐकायला मला जास्त आवडेल. तू जर नम्र राहिलास तर तू खेळातून निवृत्त झाल्यावरही तुला लोकांकडून प्रेम व सन्मान मिळत राहील. तेव्हा आयुष्यात तू यशाने हुरळून जाऊ नकोस आणि अपयशाने खचून नाऊमेद होऊ नकोस...’’ हे शब्द सचिनने आजपर्यंत कानात साठवून ठेवले व तसाच वागला. त्यामुळे आजही तो एक वादातीत गृहस्थ आहे.
 
 
सचिनने आपल्या संपूर्ण क्रिकेट कारकीर्दीत सरावाला खूप महत्त्व दिले; किंबहुना सराव हे त्याच्या जीवनाचे एक अविभाज्य अंग आहे, असेही म्हणता येईल. यात त्याला आचरेकर सरांचे खूप पाठबळ मिळाले. सचिन जर एखाद्या मैदानावर सराव सामना खेळत असेल तर तो संपला की, आचरेकर सर Sachin Tendulkar सचिनला स्वत:च्या स्कूटरवर बसवून दुसर्‍या मैदानावर सामना खेळायला घेऊन जात. पुन्हा संध्याकाळचा सराव वेगळाच. त्याच्या सरावाचे एक उदाहरण म्हणजे वर्ष 2007 मधील ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा. दि. 5 ऑक्टोबर 2007, स्थळ हैदराबाद. सचिन फलंदाजी करत 43 धावसंख्येवर असताना ऑसी गोलंदाज ब्रॅड हॉगने त्याला बाद केले. सचिनसारख्या महान फलंदाजाला बाद केल्याच्या आनंदात हॉगने त्या क्षणाचे छायाचित्र मिळविले. ते घेऊन तो सचिनकडे गेला आणि त्यावर स्वाक्षरी देण्याची सचिनला विनंती केली. सचिनने त्या छायाचित्रावर 'This will never happen again, Hoggy' असे लिहून स्वाक्षरी केली. त्या प्रसंगानंतर सचिन व हॉग जवळजवळ 15-20 वेळा आमने-सामने आले, पण हॉग एकदाही सचिनला बाद करू शकला नाही. आपण लिहिलेले शब्द खरे करण्याची मोठी जबाबदारी आता आपली आहे, हे सचिन जाणून होता व हे त्याने सरावाद्वारे सिद्ध केले.
 
 
Sachin Tendulkar सचिन जसा उत्कृष्ट क्रिकेटपटू आहे तसा सहृदयता, मानवता जपणारा एक माणूसही आहे. ज्या समाजात आपण राहतो त्या समाजाचं आपण काही देणं लागतो, याचं त्याला भान आहे. आजही तो मुंबईतील झोपडपट्टीतल्या 200 मुलांना जेवण, पुस्तकं, गणवेश देतो, त्यांच्या शिक्षणाचा खर्च करतो. ज्या मुलांचं आयुष्य फार अल्पकाळ उरलं आहे त्यांना जाऊन भेटतो किंवा घरी घेऊन येतो. माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम हे हैदराबादच्या केअर इस्पितळात संचालक पदावर होते. राष्ट्रपती झाल्यावर त्यांनी त्या पदाचा राजीनामा दिला व त्या जागी सचिन तेंडुलकरचे नाव स्वत: सुचविले. सचिनने पद स्वीकारण्यापूर्वी एकच अट घातली. ती म्हणजे ‘मला पैसे वगैरे काही नकोत. फक्त राज्य पातळीवर खेळलेल्या कोणत्याही खेळाडूला मग तो कॅरम, कबड्डी, अ‍ॅथलेटिक्स कोणताही असो, त्याला हृदयाची बायपास शस्त्रक्रिया विनामूल्य करून मिळावी.’ सचिनची ती अट मान्य झाली. तसेच काही वर्षांपूर्वी नागपूरच्या वसंतराव देशपांडे सभागृहात गुरुदक्षिणेच्या कार्यक्रमात सचिन तेंडुलकर व विनोद कांबळी या शिष्यद्वयांच्या हस्ते आचरेकर सरांचे गुरुपूजन केले होते. कार्यक्रमानंतर सरांना वार्धक्यामुळे पायात जोडे घालणे कठीण जात होते. तेव्हा सचिनने सरांचे जोडे स्वत: उचलून त्यांच्या पायात घालून दिले.
 
 
'an who values privilege more than principal looses both.' याचा अर्थ असा की, जो माणूस तत्त्व वा नीतिनियमांपेक्षा विशेषाधिकाराला जास्त महत्त्व देतो तो नंतर दोन्हींपासून दुरावतो. हे सचिन तेंडुलकरला व्यवस्थितरीत्या उमगले होते. म्हणूनच त्याने आजपर्यंत कोणतेही मद्य किंवा तंबाखूची जाहिरात केली नाही.
आपल्या 24 वर्षांच्या क्रिकेट प्रवासात सचिन अशा अनेक खेळी खेळला. उदा. 22 व 24 एप्रिल 1998 च्या शारजातील 142 व 134 धावांच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दोन खेळी, 2003 च्या विश्वचषक स्पर्धेतील पाकिस्तान विरुद्धची 98 धावांची खेळी. ऑसीविरुद्धच्या त्या दोन खेळीत सचिनने शेन वॉर्नला अक्षरश: पडेल त्या कडावर मारलं होतं. Sachin Tendulkar सचिन तेंडुलकर हा सामन्याच्या पूर्वी ‘मी अमक्या गोलंदाजाला धुवून काढीन’ अशा वल्गना कधीच करत नसे. त्याऐवजी तो सामन्यात प्रत्यक्ष बॅटनेच बोलत असे. क्रिकेट विक्रमादित्य सुनील गावसकरने क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर स्वत: वापरत असलेले हलके पॅड्स सचिन तेंडुलकरला भेट दिले. सचिनबद्दल गौरवोद्गार काढताना सनीभाई म्हणतात, ‘‘सचिनने क्रिकेटमधील आपली उपजत बुद्धी (टॅलेंट) कधीच वाया घालवले नाही. प्रत्येक फलंदाजाने आपला डाव सुरू करताना त्या डावाचे मूल्य ठरवावे, ते 100 असावे व त्यानुसार खेळी करावी. सचिनने ही बाब मनात पक्की ठसवली. त्यामुळेच तो कसोटी व एकदिवसीय सामने मिळून शतकांचे शतक (51+49) करू शकला.’’ फलंदाजीचा बादशहा सर डॉन ब्रॅडमन यांना सचिन तेंडुलकरची फलंदाजी आवडली व त्यांनी आपल्या 90 व्या वाढदिवशी सचिनला भेटीला बोलावले. यात सचिनचा आणि पर्यायाने भारताचा गौरव आहे.
 
 
Sachin Tendulkar सचिन तेंडुलकर आपल्या क्रिकेट कारकीर्दीत 200 कसोटी सामने, 463 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने व एक टी-20 सामना खेळला व त्यात अनुक्रमे 329, 452 व 1 असे 782 डाव खेळला. या सर्व डावांमध्ये तो कसा बाद झाला, गोलंदाज व क्षेेत्ररक्षक कोण होता, हे त्याला डावनिहाय आजही लक्षात आहे. सचिनने 15,921 कसोटी धावा, 18,426 एकदिवसीय धावा व 10 टी-20 धावा केल्या आहेत. कसोटीत 51 व एकदिवसीय सामन्यात 49 शतके असे शतकांचे शतक करणारा तो एकमेव खेळाडू आहे. एकदिवसीय सामन्यात पहिले द्विशतक (नाबाद 200) करणारा सचिन पहिला खेळाडू आहे. एकदिवसीय सामन्यात 10000, 11000, 12000, 13000, 14000, 15000, 16000, 17000 व 18000 धावांचे महत्त्वपूर्ण टप्पे पूर्ण करणारा सचिन हा जगातला पहिला खेळाडू आहे. दूरदर्शनवरील तिसर्‍या पंचाचा पहिला बळी सचिन तेंडुलकर आहे तसेच 10000 धावा, 100 बळी व 100 झेल घेणारा जगातील पहिला खेळाडू सचिनच आहे. सचिनला 1994 मध्ये अर्जुन अवॉर्ड, 1997 मध्ये विस्डेन क्रिकेटीयर ऑफ द इयर, 1997-98 मध्ये राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, 1999 मध्ये पद्मश्री, 2008 मध्ये पद्मभूषण, 2010 मध्ये एनडीटीव्हीतर्फे आयकॉन ऑफ द इयर फॉर 21 इयर्स आणि क्रिकेटमधून निवृत्त झाल्यावर्षी 2013 मध्ये भारताच्या सर्वोच्च भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तसेच भारतीय हवाई दलाने त्याला ऑक्टोबर 2015 मध्ये मानद ग्रुप कॅप्टनचा दर्जा बहाल केला. क्रिकेट रसिकांना शतकांची चटक लावणारा सचिन ऊर्फ सच्चू येत्या 24 एप्रिल 2023 ला आयुष्याचं अर्धशतक पूर्ण करणार आहे. त्याने आपल्या आयुष्याच्या खेळपट्टीवरील शतकही दिमाखात पूर्ण करावं आणि ते पाहण्यास त्याची अर्धांगिनी अंजली दुसर्‍या टोकावर हजर असावी यासाठी अनंत शुभेच्छा. शेवटी एवढेच म्हणतो,
 
‘पहाड चढते वक्त ये सीखना पडता है,
जब उंचा बढना हो तो झुकना पडता है...’
 
- 8888720868 
Powered By Sangraha 9.0