मुंबई,
CM Eknath Shinde : काल रविवारला जळगावमधील पाचोरा येथे आयोजित सभेला संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका करत एकेरी उल्लेख केला. ते म्हणाले की, नरेंद्र मोदी म्हणतात ना, मी फकीर आहे, मग झोळी लटकवून निघून जाशील, पण माझ्या जनतेच्या हातात भिकेचा कटोरा देऊन जाशील त्याचं काय करायचं? पंतप्रधानांवर केलेल्या या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांचं नेतृत्व संपूर्ण जगात सिद्ध केलं आहे. देशाची अर्थव्यवस्था मोठ्या उंचीवर नेली आहे. त्यामुळेच आपल्याला जी २० परिषदेचं अध्यक्षपद देखील मिळालं आहे. उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एकेरी उल्लेख केला त्याचा निषेध करावा तितका कमी आहे. पंतप्रधानांच्या मातोश्रींचं निधन झालं तेव्हादेखील त्यांनी देशाला प्राधान्य दिलं. त्यांनी त्यांची राष्ट्रभक्ती सिद्ध केली आहे. उद्धव ठाकरेंचं हे वक्तव्य वैयक्तिक द्वेशातून आलं आहे. लोकप्रियतेची पोटदुखी निर्माण झाल्यावर अशा प्रकराची वक्तव्य करण्याची पापं काही लोक करत असतात. २५ वर्ष त्यांनी युतीत काम केलं. आता त्याच भाजपा नेत्यांबाबत असं वक्तव्य हे निंदाजनक आहे. त्यांचं या पद्धतीचं वक्तव्य ही बाळासाहेब ठाकरे यांची संस्कृती होऊ शकत नाही. सत्तेसाठी, खुर्चीसाठी, मुख्यमंत्रीपदासाठी ते काय करू शकतात हे आधीच त्यांनी दाखवलं आहे. त्याचीच ते पुनरावृत्ती करत आहेत.