तभा वृत्तसेवा
मोहाडी,
Traffic Police : शहरातील बसस्थानक चौकात तुमसर, भंडारा, आंधळगाव व मोहाडीचे रस्ते एकमेकाला जुळतात. त्यामुळे अनेकदा वाहनचालक मागेपुढे न पाहता समोर जातांना बाजूने येणारे वाहनाची धडक होऊन अपघात घडतात. होणारे अपघात टाळण्याकरिता येथे वाहतूक पोलिसाची नेमणूक करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
शहरातील बसस्थानक चौकात अत्यंत वर्दळ असते. याशिवाय संत जगनाडे चौक व कुशारी फाटा येथेही चार रस्ते एकमेकांना जोडलेले आहेत. हा राज्यमार्ग असल्याने येथून सतत जडअवजड वाहनांचे आवागमन असते. त्यामुळे सातत्याने या चौकामध्ये अपघात घडत आहेत. येथील चौकात वाहतूक कोंडी होत असते. मात्र या ठिकाणी वाहतूक पोलिस राहत नसल्याने कधी कधी मोठी समस्या उद्भवते. या समस्येवर आळा घालण्याकरिता बस स्टॉप चौक व जगनाडे चौक, कुशारी फाटा येथे वाहतूक पोलिसाची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी नगरसेविका दिशा निमकर, नगरसेवक महेश निमजे, विजय शहारे, दिनेश निमकर, मनोहर हेडाऊ, कृष्णा पराते, सचिन गायधने, दुर्गेश धकाते, जितेंद्र हेडाऊ, गौरव हेडाऊ, प्रणव पात्रे, लकी शेख आदींनी केली आहे.