तभा वृत्तसेवा
गोंदिया,
शहरातून जाणार्या रेल्वे मार्गावरील रेल्वे फाटकांवर भूमिगत मार्ग किंवा उड्डाणपुलाची (Flyover) निर्मिती करा, अशी मागणी सशक्त नारी संघटनेने निवेदनातून सल्लागार समिती सदस्यांना केली आहे.
गोंदिया शहर व परिसरातील रेल्वे चौकीवर रेल्वे गाडीचे आवागमन होत असताना दोन्ही बाजुचे दरवाजे बंद राहतात. त्यामुळे नागरिकांना बराच वेळ ताटकळत राहावे लागते. अनेक महत्वाचा परीक्षा, बैठका, दवाखाना यासह दैनंदिन कामांचा वेळ लागतो. विशेषतः मुरी परिसर, हड्डीटोली, ढाकणी, भीमनगर, रामनगर, मरारटोली, सिंगलटोली येथील रेल्वेफाटक तासन्तास बंद राहत असल्याने या परिसरातून आवागमन करताना नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागते. त्यामुळे या रेल्वे फाटकांवर भूमिगत मार्ग किंवा उड्डाणपुलाची निर्मिती करण्यात यावी. अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन विभागीय रेल्वे व्यवस्थापक, खासदार सुनील मेंढे यांनाही पाठविण्यात आले आहे. निवेदन देताना शिखा पिपलेवार, कुंती कावळे, साक्षी फुंडे, कल्पना शहारे, शीतल भांडारकर आदी उपस्थित होते.