रस्ते खड्ड्याचे; सिग्नल, पार्कींग नाय अन् फक्त हेल्मेट सक्तीच बुआ?

- मुठभर वर्धेची रडकहाणी

    दिनांक :29-Apr-2023
Total Views |
प्रफुल्ल व्यास 
वर्धा, 
Story of Wardha : वर्धेतील राजकारणाने शहराची पार वाट लावली. आजही नगर पालिका अस्तित्वहिन असल्यागत वागत आहे. कोणाचा पायपोस कोणात नाही. सध्या निवडणुका नसल्याने राजकारण्यांना शहरात डोकं घालायला फुरसद नाही. पण, पुढच्या निवडणुकीची मोर्चे बांधणी सुरू झाली असताना वर्धेत मात्र महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर हेल्मेट सक्तीचे बुजगावने उभे होणार आहे. त्यासाठी वाहतूक नियंत्रण विभागाने पुरेसी तयारीही केली आहे. परंतु, पुरेश्या सुविधेअभावी!
 
Story of Wardha
 
वर्धा शहराचा जीव केवढा हाच सर्वात महत्त्वाचा प्रश्‍न आहे. (Story of Wardha) दादाजी धुनिवाले चौकापासुन सुरू झालेले वर्धा बजाज चौकात संपते आणि स्नेहलनगर ते लेप्रसी फाऊंडेशन असा वर्धेचा आवाका आहे. रस्ते म्हटले तर दोनच! एक बॅचलर आणि दुसरा बजाज ते शिवाजी चौक! चौकाचौकात दुकानं असले तरी बाजारपेठ मात्र एकच आहे. एकंदरीत वर्धा शहर चार किमीच्या बाहेर नाही. अमृत योजनेतील भुमिगत गटारच्या कामाने शहर बकाल करून टाकले आहे. ब्रिटीशांच्या काळात असलेल्या वर्धा शहराच्या नियोजनाचा आदर्श आता नाहीसा होऊ पाहतो आहे. आज वर्धा लख्ख लाईटांनी रात्री उजळून निघत असले तरी दिव्याखाली प्रचंड अंधार आहे. शहरातील एकही असा रस्ता नाही जो सहज पार करता येईल! प्रत्येक रस्त्यावर मधोमध खड्डे असे शहर म्हणून वर्धेची नवीन ओळख व्हावी. नगर पालिकेच्या वतीने महिना दोन महिन्यातुन एखादवेळी अतिक्रमण काढण्याची मोहीम निघते आणि बुलडोजरचा पंजा फक्त रस्त्याच्या कडेला बसुन दिवसाला शे-दोनशे कमावणार्‍यांच्या दुकानांवर उगारल्या जातो. बजाज चौक ते हॉटेल रामाकृष्ण, निर्मल बेकरीचा रस्त्यासह शहरात अनेक टोलेजंग इमारती अतिक्रमणात आहेत. परंतु, एकाही मोहीमेत निर्मल बेकरीचा रस्ता किंवा शहरातील अतिक्रमीत इमारतींकडे नपचे लक्ष गेलेच नाही.
 
 
आचार्य विनोबा भावे उड्डाणपुलाचे 8 वर्षांपासुन भीजत घोंगडे आहेच. (Story of Wardha) वाहतूक व्यवस्थेवर तर बोलूच नये! कोणतेही वाहतूक पोलिस निरीक्षक आणा साधा धुनिवाले चौकातील ट्रॅव्हल्स उभ्या करण्याचा प्रश्‍न सोडवू शकत नाहीत. शहरातील सर्व बँका, एलआयसी ऑफीसपुढे अर्ध्या रस्त्यापर्यंत दुचाक्या उभ्या असतात. साधे सराफा बाजारातही कार घेऊन जाता येत नाही. एक फर्लांगवर चार चाकी उभ्या कराव्या लागतात. पोलिसांचा तिसरा डोळा शहरातील काहीच चौकात उघडा आहे बाकी भोकणाच! वाहतूक नियंत्रण करण्याची जबाबदारी पोलिस विभागाच्या वाहतूक नियंत्रण विभागाची असली तरी सिग्नल सुरू करण्याचीसाठी नगर पालिकेकडे बोट दाखवले जाते. सायंकाळी बजाज बालमंदिरकडून रामनगरकडे जाणेही अवघड होते अशी चौपाटी तयार झाली आहे. नाश्ता करणारेही रस्त्यापर्यंत स्टूल मांडून बसलेले असतात, ही शहराची वास्तव परिस्थिती असुन चार किमीच्या अंतरात वाहन चालक कितीदा हेल्मेट घालेल आणि कितीचा काढेल असा प्रश्‍न तत्कालीन वाहतूक पोलिस निरीक्षक गुरव यांनाही विचारण्यात आला होता आणि आजही तोच प्रश्‍न विचाल्या जात आहे. अपघात टाळण्यासाठी हेल्मेट सक्ती जरी आवश्यक असली तरी शहरातील सुविधांकडेही दुर्लक्ष करून चालणार नसल्याने आधी सुविधा द्या नंतरच सक्ती करा! ज्यांना आपल्या जीवाची भीती आहे ते हेल्मेट वापरत आहेत त्यांचे कौतुक करा...