अलिबाग,
राज्याचे उद्योगमंत्री आणि रायगडचे पालकमंत्री (Uday Samant) उदय सामंत सोमवारी बोट अपघातातून बचावले. त्यांच्या बोटीला अपघात झाला तेव्हा, त्यांच्यासोबत माजी खासदार छत्रपती संभाजीराजे देखील होते. आज सकाळी अलिबाग येथे येत असताना स्पीडबोटीच्या कप्तानाचे नियंत्रण सुटले आणि बोट जेटीच्या खांबांना धडकली. उदय सामंत हे दुसर्यांदा अपघातात बचावले आहेत. याआधी भर समुद्रात त्यांची बोट बंद पडली होती.
किल्ले रायगडावर 350 वा राज्याभिषेक सोहळा पार पडत आहे. त्यानिमित्ताने करण्यात येणार्या तयारीचा आढावा पालकमंत्री उदय सामंत, आमदार महेंद्र दळवी, रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष छत्रपती संभाजी राजे, कोकण आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत अलिबागच्या जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आला. या बैठकीसाठी (Uday Samant) उदय सामंत आणि छत्रपती संभाजीराजे सकाळी स्पीडबोटीने अलिबागला यायला निघाले होते. त्यावेळी हा अपघात झाला.
असा झाला अपघात
समुद्रात बोटीचा वेग कमी होता. मात्र मांडवा जेटीजवळ बोट आली असता कप्तानाने बोटीचा वेग वाढवला. मात्र, त्याचे बोटीवरील नियंत्रण सुटले आणि बोट वेगाने जेटीकडे निघाली. सुदैवाने ही बोट जेटीच्या खालील भागात शिरली आणि खांबांना आदळली आणि (Uday Samant) उदय सामंत आणि संभाजीराजे अगदी थोडक्यात बचावले. गियरमध्ये बिघाड झाल्याने हा प्रकार झाल्याचे म्हटले जाते.