रिसोड,
civil line main road शहरातील नुकतेच बांधकाम पूर्ण झालेल्या सिव्हिल लाईन या मुख्य रस्त्याची रिलायन्स कंपनीव्दारे तोडफोड करण्यात आली आहे. मात्र नगरपरिषद तसेच बांधकाम विभागाची कुठलीही परवानगी घेतली नसल्याची माहिती आहे. रस्त्याची तोडफोड केल्यामुळे व्यापारी व नागरिकांमध्ये मध्ये संतापाची लाट उसळली आहे. मागील चार ते पाच वर्षापासून या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली होती. नागरिकांनी हा रस्ता व्हावा याकरिता आंदोलन उभारले होते. त्यानंतर मागील वर्षापासून या रस्त्याचे काम सुरू करण्यात आले असून हा रस्ता पूर्णत्वास जात असतानाच रस्त्याच्या बाजूला असलेले पेव्हर ब्लॉक तोडून अचानकच रिलायन्स कंपनीने केबल टाकण्यासाठी या रस्त्याची तोडफोड केली आहे.

याबाबत नगरपरिषद व सार्वजनिक बांधकाम विभागाशी संपर्क साधला असता त्यांनी केबल टाकण्यासाठी रस्ता फोडण्याची कुठली ही परवानगी दिली नसल्याचे सांगितले. जर या कंपनीला या रस्त्यावर केबल टाकायचा होता तर रस्त्याचे काम होण्याआधी किंवा रस्त्याचे काम सुरू असतानाच केबल टाकायला पाहिजे होता. civil line main road मात्र रस्त्याचे काम पूर्ण झाल्यावर केबल टाकण्यासाठी रस्त्याची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली आहे. त्यामुळे नुकताच पूर्णत्वास गेलेला रस्ता पुन्हा उखडल्या गेला आहे. विशेष म्हणजे याबाबत शहरातील कोणताही प्रतिनिधी व पदाधिकारी यांनी याबाबत आवाज उठविला नाही. रस्त्याची तोडफोड केल्यामुळे शहरातील व्यापारी वर्ग तसेच नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. याबाबत नगरपरिषद व सार्वजनिक बांधकाम विभाग संबंधित कंपनीवर काय कारवाई करते याकडे व्यापार्यासह शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.