आंबे खा, वृक्ष लावा, मोक्ष मिळवा!

    दिनांक :13-May-2023
Total Views |
वेध
- अनिल फेकरीकर
उन्हाळा येताच Mango tree आंब्याचा रस घरोघरी केला जातो. बाजारातून चांगल्या प्रतीचा आंबा आणून त्याचा रस काढून पाहुणचार होतो. आंब्यातून निघालेल्या कोयी मात्र फेकून दिल्या जातात. त्या कोयी आता अकोला शहरात राहणार्‍यांना मोक्ष मिळवून देणार आहेत. हो, हे अगदी खरे असून, असा अभिनव प्रकल्प अकोला मनपा आयुक्त कविता द्विवेदी यांनी जाहीर केला आहे. असा उपक्रम पाण्याची भीषण समस्या असलेल्या अकोला शहरात सुरू करावा, याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन करायलाच हवे. कारण सावली, फुले आणि फळे प्रदान करणार्‍या झाडांना लावणारा जो माणूस आहे, त्याला पुण्यश्लोक प्राप्त होतो. तो सर्वांसाठी पूजनीय ठरत असतो. एवढे महत्त्व वृक्ष लावण्याचे आहे. वृक्ष चिरंजीव आहेत. जोपर्यंत अवकाशात सूर्य आहे, तोपर्यंत वृक्ष जगणार आहेत. वृक्षराजी ही वाढत्या लक्षावधी लोकसंख्येची चरितार्थ चालविणारी अविनाशी ठेव आहे. आपली कामधेनू आहे. म्हणूनच पृथ्वीतलावर राहणार्‍यांनो, वेळीच जागे व्हा अन् वृक्षांची हत्या थांबवा. अशीही जनजागृती सुरू करावी लागेल. पण केवळ जनजागृती करून आता भागणार नाही, तर कृतीची जोड त्याला द्यावी लागेल.
 
 
Mango tree

 
अशीच कृती मनपा आयुक्त कविता द्विवेदी यांनी सुरू करावी, हे निश्चितच कौतुकास्पद म्हणावे लागेल. आंब्यातील कोयी बाहेर फेकल्यावर त्यातून छोटेसे रोपटे तयार होते. त्याला एकत्र करून नियोजनात्मक पद्धतीने खुल्या जागेवर लागवड केली तर पुढील पाच वर्षांनंतर अकोला नगरीत राहणार्‍यांना निश्चितच आंबे चाखायला मिळतील. पण त्याआधी अकोलावासीयांना कोयी गोळा करून लावलेल्या रोपट्यांचे संवर्धन मनापासून करावे लागेल. केवळ मनपा आयुक्तांच्या पुढाकाराने हा उपक्रम यशस्वी होणार नाही. त्यांनी दिशा दाखवली. Mango tree कृती करण्याची वेळ अकोलावासीयांची आहे. माझ्या मते, हा उपक्रम केवळ अकोला शहरापुरता मर्यादित न राहता महाराष्ट्रातील गावागावांत सुरू व्हायला हवा. आंब्याची लागवड करणे म्हणजे पुण्यकर्माचा प्रारंभ म्हणावा. या वृक्षांमुळे केवळ फळच नाही तर सावलीही मिळेल. शिवाय जमिनीची धूप थांबेल. भूगर्भातील पाण्याची पातळी वाढेल. गाईंना आंब्याची पाने खायला आवडतात. त्यांचेही पोट यामुळे भरेल. म्हणजे काय तर आंबा या बहुगुणी फळझाडाच्या लागवडीने अकोल्याचे चित्र बदलू शकते. मग तसेच चित्र विविध स्वरूपातील फळझाडांची लागवड केल्याने महाराष्ट्राचेही बदलू शकेल. रामटेक तालुक्यात असा प्रयोग पर्यटक महर्षी चंद्रपाल चौकसे यांनी स्वबळावर यशस्वी करून दाखविला आहे. याचीच दखल घेत त्यांना महाराष्ट्र शासनाने 1 मे 2023 रोजी वनश्री पुरस्कार प्रदान केला.
 
 
 
चौकसे यांनी शासकीय खुल्या पडीक जमिनीचा खर्‍या अर्थाने सदुपयोग केला. त्यांनी रामटेक तालुक्यातील खिंडसी तसेच मनसरच्या रामधाम येथे मिळेल त्या जागेवर 7 ते 8 हजार वृक्षांचे रोपण केले. मनापासून त्याचे संवर्धन केले. आज त्या Mango tree वृक्षलागवडीने खिंडसी आणि रामधाममध्ये चौकसेनिर्मित जंगल तयार झाले आहे. आता मनपा आयुक्त कविता द्विवेदी यांनी कोयी गोळा करण्याचा हाती घेतलेला उपक्रम तसा हटकेच म्हणावा लागेल. कारण घरोघरी आंबे एकसारखे आणले जात नाहीत. प्रत्येक जण आपापल्या परीने विविध जातींचे आंबे विकत आणून रसाचा आनंद घेतो. समजा त्या सर्वच प्रकारच्या आंब्यांच्या कोयी स्वच्छ करून मनपा कार्यालयात जमा केल्या की, त्यापासून रोपे तयार केली जातील. त्या रोपांना अकोला भागातील खुल्या जागेवर लावले जाईल. यामुळे अकोला शहर पुढील काळात आंबानगरी म्हणूनही उदयास येईल. काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही नागपुरात घरोघरी एक संत्रा झाड लावण्याचे आवाहन केले आहे, हे विशेष. एक सांगतो, जंगलातील बहुतांश प्राणी अन्न मिळत नसल्याने गावांकडे धाव घेतात. कारण काय तर वन विभागाने फळांऐवजी भलत्याच झाडांची लागवड केली आहे. ती फार मोठी चूक झाली आहे. या अवस्थेत अकोला पॅटर्नप्रमाणे जंगलात, गावांत आणि प्रत्येक रस्त्याच्या दुतर्फा फळझाडांची लागवड करावी. जेव्हा अधिक प्रमाणात फळझाडे लावली जातील तेव्हा त्यापासून पोषक अन्न वन्यप्राण्यांना आणि माणसांनाही मिळेल. कदाचित हाच फॉर्म्युला माणूस आणि वन्यप्राण्यांमध्ये उद्भवलेल्या संघर्षावर रामबाण उपाय ठरू शकेल. 
 
- 9881717859