पलटूमारचे विरोधी ऐक्यांचे तुणतुणे

13 May 2023 06:00:00
अग्रलेख...
जनता दल संयुक्तचे सर्वेसर्वा आणि बिहारचे मुख्यमंत्री Nitish Kumar नितीशकुमार यांना पंतप्रधान होण्याची स्वप्ने पडू लागली आहेत आणि त्यासाठी त्यांनी विरोधी पक्षांना एकत्र आणण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. आतापर्यंत नितीशकुमार यांनी स्वत:ला बिहारपुरते मर्यादित करून ठेवले होते. आता मात्र राष्ट्रीय राजकारणात पदार्पण करण्याच्या दृष्टीने त्यांनी हातपाय हलवायला सुरुवात केलेली दिसत आहे. स्वत:ला राष्ट्रीय म्हणवणार्‍या काँग्रेस पक्षासह देशातील अन्य कोणताही राष्ट्रीय वा प्रादेशिक पक्ष आपल्या बळावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भाजपाचा लोकसभा निवडणुकीत पराभव करू शकत नाही, ही काळ्या दगडावरची रेष आहे. त्यामुळे भाजपाचा पराभव करायचा असेल तर सर्व विरोधकांना एकत्र आणण्याचे प्रयत्न गेल्या काही महिन्यात काही नेत्यांनी सुरू केले आहेत.
 
 
Nitish Kumar
 
कधी यासाठी Nitish Kumar नितीशकुमार पुढाकार घेतात, तर कधी तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी. या दोघांनाही आता पंतप्रधानपदाचे स्वप्न पडू लागले आहे. यात आता भर पडली ती म्हणजे आपचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची. आम आदमी पक्षाला नुकताच राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला आहे. त्यामुळे केजरीवाल यांचे विमान हवेत उडू लागले आहे. पंतप्रधानपदासाठी आपण एकमेव पात्र उमेदवार आहोत, असे त्यांना वाटू लागले आहे. मात्र, असे करताना आपले सरकार मद्य घोटाळ्यात अडकले, आपले दोन मंत्री गेल्या काही महिन्यांपासून तुरुंगात आहेत, याचा कोणतेही मद्य न घेताही केजरीवाल यांना विसर पडला आहे. राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला असला, तरी सध्या आपचा एकही खासदार लोकसभेत नाही. मात्र, त्यामुळे आपण केजरीवाल यांना पंतप्रधानपदाचे स्वप्न पाहण्यापासून रोखू तर शकत नाही. नशा फक्त मद्याचीच नसते, तर पंतप्रधानपदाचीही असू शकते. तर असो; आपला मुद्दा हा नितीशकुमारांचा आहे. नितीशकुमार यांनी दिल्लीत केजरीवाल यांचीही भेट घेतली. ही भेट म्हणजे पंतप्रधानपदाच्या दोन दावेदारांची भेट म्हटली पाहिजे. एकाजवळ लोकसभेत एकही खासदार नाही तर दुसर्‍याजवळ फक्त हाताच्या बोटावर मोजता येतील इतके खासदार आहेत.
 
 
कधीकाळी जदयुचे राष्ट्रीय अध्यक्ष राहिलेले माजी केंद्रीय मंत्री रामचंद्रप्रसाद सिंह म्हणजे आरसीपी सिंह यांनी गुरुवारी भाजपात प्रवेश केला. जदयुत असताना मी Nitish Kumar नितीशकुमार यांना पीएम म्हणत होतो. पीएम म्हणजे पंतप्रधान असे त्यांना वाटत असावे, पण मला मात्र पीएम म्हणजे पलटूमार असे म्हणायचे असायचे, असा खुलासाही त्यांनी केला. आरसीपी सिंह नितीशकुमार यांना जेवढे जवळून ओळखू शकतात, तेवढे अन्य कोणी नाही, त्यामुळे त्यांनी नितीशकुमार यांच्यासाठी अतिशय योग्य शब्द वापरला आहे, यात शंका नाही. नितीशकुमार यांनी आतापर्यंतच्या आपल्या राजकीय जीवनात जेवढ्या कोलांटउड्या मारल्या, तेवढ्या एखाद्या माकडानेही आपल्या आयुष्यात मारल्या नसतील.
 
 
Nitish Kumar नितीशकुमार कधीकाळी भाजपासोबत होते. भाजपासोबत असल्यामुळेच ते बिहारचे मुख्यमंत्री होऊ शकले. कारण बिहारचे मुख्यमंत्री होऊ शकतील एवढी नितीशकुमार आणि जदयुचीही राजकीय ताकद कधी नव्हती आणि आजही नाही. नितीशकुमार जेव्हा जेव्हा बिहारचे मुख्यमंत्री झाले, तेव्हा तेव्हा त्यांच्या पक्षाचे जदयुचे विधानसभेत फक्त 50 ते 60 आमदार होते. त्यामुळे भाजपाने पाठिंबा दिला नसता तर ते एकदाही बिहारचे मुख्यमंत्री होऊ शकले नसते. पण भाजपाबद्दल कृतज्ञ राहायचे सोडून नितीशकुमार कृतघ्न झाले. त्यांनी कोणतेही ठोस कारण नसताना भाजपाची साथ सोडून लालूप्रसाद यादवांच्या राष्ट्रीय जनता दलाशी हातमिळवणी केली. काही दिवस राजदसोबत संसार केल्यानंतर नितीशकुमार यांनी पुन्हा राजदशी घटस्फोट घेतला आणि पुन्हा भाजपाच्या गळ्यात गळा घातला. पण भाजपासोबतचा नितीशकुमार यांचा हा नवा मधुचंद्रही फार दिवस चालला नाही. भाजपाशी पुन्हा एकदा फारकत घेत नितीशकुमार यांनी पुन्हा एकदा त्याच लालूप्रसाद यादवांच्या राजदसोबत घरठाव केला. नितीशकुमार यांचे हे वर्तन एखाद्या चवताल महिलेसारखे म्हणावे लागेल. नितीशकुमार यांचे राजकीय वर्तन आधी एखाद्या महिलेशी विवाह करायचा, नंतर तिला घटस्फोट द्यायचा, पुन्हा तिच्याशी विवाह करायचा, नंतर तिला पुन्हा घटस्फोट द्यायचा असे राहिले आहे. त्यामुळेच आरसीपी सिंह यांनी पलटूमार म्हणून त्यांचा उल्लेख केला. नितीशकुमार यांनी आपल्या राजकीय जीवनात किती वेळा विवाह करायचा आणि किती वेळा घटस्फोट घ्यायचा, हा त्यांचा अधिकार आहे. पण असे करून त्यांनी आपली राजकीय विश्वसनीयता गमावली आहे. आता त्यांना बिहारच्या जंगली राजकारणातून राष्ट्रीय राजकारणात यायचे आहे. त्यामुळे राजदचे तेजस्वी यादव यांना बिहारचे मुख्यमंत्री होण्यासाठी नितीशकुमार पाठिंबा देत आहेत, तर पंतप्रधान होण्यासाठी तेजस्वी यादव यांच्या पक्षाने आपल्याला पाठिंबा द्यावा, अशी त्यांची अपेक्षा आहे. असा अघोषित करारही त्या दोन पक्षात झाला आहे. एकवेळ तेजस्वी यादव बिहारचे मुख्यमंत्री होऊनही जातील, पण नितीशकुमार पंतप्रधान होणे म्हणजे राहुल गांधींना राजकीय शहाणपण येण्यासारखे आहे. बिहारमध्ये मुख्यमंत्री होण्यासाठी ज्यांना कधी भाजपाचा तर कधी राजदचा पाठिंबा घ्यावा लागत आहे, त्या नितीशकुमार यांना पंतप्रधान होण्यासाठी किमान डझन-दोन डझन पक्षांचा पाठिंबा घ्यावा लागणार आहे. त्यासाठी त्यांनी आता भारतभ्रमण सुरू केले आहे.
 
 
Nitish Kumar नितीशकुमार यांनी महाराष्ट्रात आपला पूर्ण पक्ष गमावलेल्या मामू उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. राजकीय प्रगल्भतेत उद्धव ठाकरे यांची बरोबरी देशात फक्त राहुल गांधी यांच्याशीच होऊ शकते. ज्या उद्धव ठाकरेंना आपले मुख्यमंत्रिपद टिकवता आले नाही, पक्षातील आमदार आणि खासदार आपल्यासोबत कायम ठेवता आले नाही; एवढेच नाही तर पक्ष आणि पक्षाचे निवडणूक चिन्ह सांभाळता आले नाही, त्यांच्याशी नितीशकुमार यांनी चर्चा केली. नितीशकुमार यांनी मुंबईत आपला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गमावलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांचीही भेट घेतली. आपण सत्ताधारी भाजपासोबत आहे की विरोधी पक्षांसोबत हे शरद पवार यांनाही नक्की माहिती नाही. मात्र, नितीशकुमार या दोघांना भेटतात, विरोधी पक्षांच्या ऐक्याबाबत त्यांच्याशी चर्चा करतात हा लॉफ्टर चॅलेंजपेक्षाही मोठा विनोद म्हटला पाहिजे.
 
 
Nitish Kumar नितीशकुमार यांनी ओडिशाचे मुख्यमंत्री आणि बिजू जनता दलाचे सर्वेसर्वा नवीन पटनायक यांचीही भेट घेतली. नवीन पटनायक यांचे संपूर्ण राजकारण तटस्थतेचे राहिले, ना ते कधी काँग्रेसच्या जवळ गेले ना भाजपाच्या जवळ आले. मात्र, ओडिशातील आपल्या सरकारची राजकीय गैरसोय होऊ नये म्हणून त्यांनी नेहमीच केंद्र सरकार कोणतेही असो त्यांच्याशी जुळवून घेतले. विरोधी पक्षांच्या ऐक्याच्या फालतू भानगडीतही ते कधी पडले नाही. अशा पटनायक यांनी नितीशकुमार यांचे ओडिशात स्वागत करताना विरोधी पक्षांच्या तथाकथित ऐक्यांची चप्पल बाहेर काढून या, तर तुमचे स्वागत आहे, असे सांगितले. त्यामुळे नितीशकुमार आणि नवीन पटनायक यांच्या भेटीत विरोधी पक्षांचा ऐक्याचा ‘ए’ही निघाला नाही. त्यामुळे नितीशकुमार यांनी विरोधी पक्षांच्या ऐक्याचा फुगा कितीही फुगवला तरी तो एक दिवस फुटणारच आहे. 
Powered By Sangraha 9.0