जयतू संभाजीराजे

    दिनांक :14-May-2023
Total Views |
- पांडुरंग बलकवडे
 
ज्येष्ठ इतिहास अभ्यासक
 
Chhatrapati Sambhaji Maharaj छत्रपती संभाजी महाराजांची जयंती साजरी करताना या इतिहासपुरुषाचे स्मरण होतेच; खेरीज त्यांच्या जीवनचरित्रातून स्वराज्य आणि धर्मरक्षणाच्या विचारांची नव्याने रुजवणही होते. आज इतकी वर्षे उलटूनही संभाजीराजांसारखा राजा आपल्याला अभिमानाने-स्वाभिमानाने जगण्याचा धर्म शिकवून जातो.
 
 
sambhaji1-copy
 
छत्रपती शिवाजी महाराजांच्या या ज्येष्ठ पुत्राला स्वराज्यरक्षक-धर्मवीर या विशेषणांनिशी संबोधले जाते. त्यांच्या जीवनात अनेक वावटळी आल्या, कसोटीचे अनेक क्षण आले. थोडक्यात, त्यांचे जीवन असंख्य वादळी प्रसंगांनी भरलेले आहे. 14 मे 1657 रोजी पुरंदरवर त्यांचा जन्म झाला. दुर्दैवाने त्यांना अधिक काळ मातृसुख लाभले नाही. लहान असतानाच मातोश्री सईबाई बाळांतक्षयाच्या आजाराने निवर्तल्यामुळे धारावू या दुधाआईने मायेने त्यांची काळजी घेतली. आजी राजमाता जिजाऊ यांनी संभाजीराजांच्या संगोपनात जातीने लक्ष पुरवले. शिवाजीराजांनी आपल्या या राजपुत्राला घडवण्यासाठी चोख व्यवस्था लावून दिली होतीच. त्यामुळेच ते शस्त्रविद्या, विविध भाषा, न्यायशास्त्र, अर्थशास्त्र, गणित आदींमध्ये तरबेज होते. विद्वान पंडितांकडून त्यांना मार्गदर्शन आणि शिक्षण मिळाले.
 
 
अवघे साडेसात वर्षांचे वय असतानाच औरंगजेबाचे सेनापती मिर्झाराजे जयसिंह आणि दुलेरखानाच्या रूपाने स्वराज्यावर मोठे संकट आले होते. त्यामुळे होणारे स्वराज्याचे नुकसान टाळण्यासाठी शिवाजीराजांनी त्यांच्याशी संघर्ष केला, पण त्यांच्या प्रचंड सामर्थ्यापुढे राजांना क्षणिक माघार घ्यावी लागली. पुरंदरचा तह करावा लागला. या तहानुसारच लहानग्या संभाजीराजांना मुघलांची मनसबदारी स्वीकारावी लागली आणि शिवरायांना औरंगजेबाच्या 50 व्या वाढदिवसासाठी आग्रा इथे जाणे भाग पडले. साहजिकच मुघलांचा मनसबदार म्हणून सात वर्षांचे संभाजी महाराज आपल्या पित्यासह आग्य्राकडे निघाले. तिथेच हे दोघे औरंगजेबाच्या कैदेत अडकले. मात्र, राजांनी शिताफीने सुटका करून घेतली तरी संभाजीराजांना आग्य्रापासून स्वराज्यापर्यंतचा जीवघेणा प्रवास त्या लहान वयात करावा लागला. घरापासून शेकडो योजने दूर एका कुटुंबामध्ये त्यांना काही काळ घालवावा लागला. हा त्यांच्या जीवनातील अत्यंत परीक्षेचा काळ होता. मात्र, त्याच विद्वान पंडितांच्या घरात वास्तव्याला असताना संभाजीराजांना संस्कृत भाषेचे उत्तम ज्ञान प्राप्त झाले. त्यांना ब्रिजभाषाही शिकता आली. संभाजीराजांच्या जडणघडणीतला हा एक महत्त्वाचा टप्पा म्हणावा लागेल. अवघ्या नवव्या वर्षी त्यांनी दाखवलेली समज या टप्प्यामध्ये स्पष्ट दिसते. पुढे युवराज संभाजी म्हणून Chhatrapati Sambhaji Maharaj संभाजीराजांचे आयुष्य सुरू झाले. शिवाजी महाराजांनी त्यांना राज्य कारभाराचे धडे देण्याची व्यवस्था केली आणि त्यासाठीच कोकणात पाठवले.
 
 
इथे त्यांच्या आयुष्यातील दोन प्रसंगांची नोंद घ्यायलाच हवी. एक म्हणजे एकदा इंग्रज वकील राजगडावर आला होता. त्यावेळी शिवाजीराजे उपस्थित नसल्याने Chhatrapati Sambhaji Maharaj संभाजीराजांनी त्यांचे स्वागत केले. पुढे या वकिलाने लिहून ठेवले आहे की, संभाजीराजांकडून रायगडाची सगळी गोपनीय माहिती मिळविण्याचा माझा प्रयत्न होता. त्याच हेतूने मी युवराजांना विविध प्रश्न विचारले आणि रायगडाची सुरक्षा व्यवस्था वा मराठी राज्याविषयीची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पण या चाणाक्ष युवराजाने कोणतीही माहिती दिली नाहीच. उलटपक्षी, माझ्याकडूनच इंग्रज आणि इंग्लंडशी संबंधित अनेक प्रश्न विचारून माहिती घेतली. एका इंग्रज वकिलाने लिहून ठेवलेल्या या तपशिलावरूनही संभाजीराजांच्या चाणाक्षपणाचे दर्शन घडते. पुढे संभाजी महाराज आणि त्यांच्या सावत्र मातोश्री सोयराबाई यांच्यात काही काळ संघर्ष झाला तर त्याच काळात काही कारभार्‍यांशीही त्यांचा झगडा झाला. काळ पुढे सरकताना तो संघर्ष आणखी तीव्र होत गेला. या संघर्षाच्या परिणामस्वरूपच संभाजीराजांना दिलेरखानाकडे जावे लागले. हा राजकारणाचा एक भाग असल्याचे काही अभ्यासकांचे मत आहे. शिवाजीराजांच्या पश्चात संभाजी महाराजांवर स्वराज्य जतनाची फार मोठी जबाबदारी आली. ती त्यांनी अत्यंत यशस्वीरीत्या पेलली. हा देखील त्यांच्या जीवनातील महत्त्वाचा टप्पा होता.
 
 
Chhatrapati Sambhaji Maharaj संभाजीराजांनी एकाच वेळी स्वराज्याच्या अनेक शत्रूंशी यशस्वी मुकाबला केला. त्यांचा सर्वात मोठा संघर्ष औरंगजेबाच्या प्रचंड मोठ्या साम्राज्याशी होता. शिवाजी महाराजांच्या निधनाची बातमी ऐकल्यानंतर औरंगजेबाच्या मनात हिंदवी स्वराज्य जिंकण्याची महत्त्वाकांक्षा उफाळून आली. त्याच भूमिकेतून तो सर्व सामर्थ्यानिशी हिंदवी स्वराज्यावर चालून आला. हे करत असताना त्याने स्वराज्याच्या सर्व शत्रूंना राजांविरुद्ध भडकवले आणि उठाव करण्यास भाग पाडले. पण अशा अत्यंत बिकट समयीदेखील संभाजीराजांनी पराक्रम, चातुर्य, मुत्सद्देगिरी आणि कर्तृत्वाचे दर्शन घडवत हिंदवी स्वराज्याचे रक्षण केले. तब्बल नऊ वर्षे त्यांनी निकराचा संघर्ष केला. औरंगजेबाच्या चिथावणीवरूनच इंग्रजांनी मराठी राज्यांमध्ये काही कागाळ्या केल्या. परिणामी इंग्रजांनीही स्वराज्यावर आक्रमण केले, पण राजांनी त्यांनाही धडा शिकवला आणि मैत्रीचा हात पुढे करण्यास भाग पाडले. यामागेही संभाजी महाराजांची दूरदृष्टी दिसून येते. पोर्तुगीज, जंजिरेकर सिद्धी आणि मुगलांसारख्या ताकदवान शत्रूंशी संघर्ष करीत असताना आपल्याला इंग्रजांसारख्या पाश्चात्त्य शत्रूकडून मदत मिळेल, हे त्यांनी जाणले होते. त्या काळी आपण पाश्चात्त्य युरोपियन सत्तांवर दारूगोळा, तोफा, बंदुका आणि धातू यासाठी अवलंबून होतो. ही रसद सतत मिळत राहावी यासाठी संभाजी महाराजांनी शरण आलेल्या इंग्रजांशी तह केला आणि त्याचा परिणाम म्हणून इंग्रजांकडून राजांना सर्व प्रकारची रसद मिळण्याचा मार्ग खुला झाला. यातूनही संभाजीराजांचे चातुर्य दिसून येते.
 
 
औरंगजेबाच्या चिथावणीवरून जंजिरेकर सिद्धीने कोकणातील मराठी मुलखात शिरून जाळपोळ, लुटालूट, अत्याचार सुरू केले होते. हे बघून त्याला धडा शिकवण्यासाठी संभाजीराजे त्या मोहिमेवर गेले आणि राजपुरीपर्यंत धडक मारली. राजपुरी जिंकल्यानंतर जंजिर्‍याचा किल्ला जिंकण्यासाठी आवश्यक त्या क्षमतेचे आरमार नसल्यामुळे संभाजी महाराजांनी जमिनीवरचा सेतू बांधण्याचा प्रयत्न केला. ही आगळीवेगळी कल्पना होती. मात्र, त्याच वेळी मुघलांची स्वारी कल्याण-भिवंडीपर्यंत आल्यामुळे त्यांना ही मोहीम नाईलाजाने अर्धवट सोडून तिकडे जावे लागले. पण या स्वारीमुळे जंजिरेकर सिद्धीला मोठा धडा मिळाला आणि पुढे संभाजीराजांच्या हयातीपर्यंत तो पुन्हा स्वराज्याच्या वाट्याला गेला नाही.
 
 
Chhatrapati Sambhaji Maharaj संभाजीराजांनी विजापूरकर आणि गोवळकोंड्याच्या कुतूबशाहीशी तह केला. औरंगजेबाने विजापूर आणि गोवळकोंड्यावर स्वारी केली तेव्हा या दोन्ही सत्तांच्या रक्षणासाठी मराठ्यांचे सैन्य पाठवले. याद्वारे त्यांनी संघटितरीत्या औरंगजेबाशी संघर्ष करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते. त्यानंतर औरंगजेबाला कायमचा धडा शिकवण्यासाठी संभाजीराजांनी हिंदुस्थानात फार मोठे राजकारण करण्याचे ठरवले. त्यांनी औरंगजेबाचा पुत्र अकबर याला हाताशी धरून औरंगजेबाला मुघल सत्तेवरून खाली खेचण्याचा प्रयत्न केला. उत्तरेतून राजपूत आणि इकडून मराठे यांनी एकाच वेळी औरंगजेबावर आक्रमण केले आणि त्याच्या जागी अकबराला गादीवर बसवले तर हिंदुस्तानची औरंगजेबाच्या धार्मिक अत्याचारापासून आणि आक्रमणापासून सुटका होऊ शकेल, हे त्यांचे धोरण होते. पण दुर्दैवाने त्यांना रामसिंगांकडून हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. हे राजकारण यशस्वी झाले असते तर औरंगजेबाचे अस्तित्वच संपुष्टात आले असते, यात शंका नाही.
 
 
अशा प्रकारे स्वराज्य जिंकणे सहजशक्य नाही, हे समजल्यानंतर औरंगजेबने स्वराज्यावरील मोहीम स्थगित केली आणि विजापूरला गेला. तिथे त्याने शेकडो वर्षांची आदिलशाही सल्तनत केवळ दीड वर्षांमध्ये तर शेकडो वर्षांची कुतूबशाही सल्तनत केवळ सहा महिन्यात जिंकून घेतली. अशा पद्धतीने त्याने दक्षिण भारतातील दोन इस्लामिक सत्ता आपल्या साम्राज्यात विलीन करून घेतल्या. पण याच औरंगजेबाला संभाजीराजांकडून हिंदवी स्वराज्य मात्र जिंकून घेता आले नाही. थोडक्यात, आपण युद्धभूमीवर Chhatrapati Sambhaji Maharaj संभाजीराजांना जिंकू शकत नाही, हे लक्षात आल्यामुळेच औरंगजेबाने कपटनीतीचा अवलंब करून विश्वासघाताने त्यांना कैद केले. अखेरच्या काळात औरंगजेबाने राजांना प्रचंड त्रास दिला. एकूण 42 दिवस महाराजांनी शत्रूविरुद्ध केलेला तो आगळावेगळा संघर्ष म्हणावा लागेल. अटक केल्यानंतर अभय देण्याच्या बदल्यात औरंगजेबाने चार मागण्या केल्या होत्या. मुघल फौजेतील फितूर झालेल्यांची नावे सांगणे, मराठी राज्याचा खजिना कोठे आहे ते सांगणे, छत्रपती म्हणून स्वराज्यातील सर्व किल्लेदारांना आपले किल्ले मुघलांच्या ताब्यात देण्याविषयी पत्र पाठवणे आणि इस्लाम धर्माचा स्वीकार करणे या त्या चार मागण्या होत्या. मात्र, महाराजांनी त्या फेटाळल्या आणि जीवाची बाजी लावत प्रतिकार केला. एका पर्वाची अखेर झाली. मात्र, संभाजीराजांच्या हत्येने मराठे शरण येतील, हा औरंगजेबाचा कयास फोल ठरला. उलट, त्यांच्या बलिदानाने पेटून उठलेल्या मराठ्यांनी औरंगजेबाशी कडवा संघर्ष केला. 27 वर्षांच्या संघर्षानंतरही आपण मराठ्यांना जिंकू शकलो नाही, या पराभूत भावनेने निराश झालेला औरंगजेब 1707 मध्ये मृत्यू पावला. यातूनच संभाजीराजांच्या बलिदानाचे महत्त्व दिसून येते.