‘सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती।’

21 May 2023 05:45:00
तुका आकाशाएवढा 
मनुष्य आयुष्यभर सुखाच्या शोधातच फिरत असतो. मनुष्यालाच काय तर कुणालाही दु:ख नको असते. इथं जे काही करीत असतो त्यामागचं कारण केवळ सुख प्राप्त करणे हाच हेतू असतो. म्हणूनच सुखाचीच याचना करताना सर्व द़ृष्टीस पडतात. असे असले, तरी सुखाची संकल्पना ही प्रत्येकाची वेगवेगळी असते. सुख म्हणजे काय? याची स्पष्ट अशी व्याख्या करणे अत्यंत अवघड आहे. वास्तविक पाहता सुख कशात मानायचे, हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. म्हणून एखाद्याला एखादी गोष्ट मिळविताना आनंद होत असेल तर त्याच बाबतीत दुसर्‍याला त्यापासून दु:ख होऊ शकते. म्हणून प्रत्येकाचे ध्येय हे वेगवेगळे असल्याचे निदर्शनास येते. Saint Tukaram Maharaj दुसरे असे की, ही बाब आपल्या संगतीवरसुद्धा अवलंबून असते. ज्या प्रकारची सोबती आयुष्यभर लाभली असेल त्याचप्रमाणे तो ती गोष्ट मिळविण्याच्या प्रयत्नात असतो. योग्य-अयोग्य पारखण्याची द़ृष्टी असावी. अर्थात ज्यावर आपला विश्वास असतो तीच गोष्ट आपण करीत असतो.
 
 
Sant_Tukaram
 
एक प्रकारची त्याची ती श्रद्धा असते. ज्याला जशी संगत लाभली तसे तो व्यवहार करताना दिसतो. हे जरी खरे असले, तरी चुकीच्या गोष्टी जर आपल्या हातून घडत असतील तर त्याचे वाईट परिणाम भोगावेच लागतील. त्यामधून कुणाचीही सुटका मात्र नाही. अर्थात जसे कर्म कराल तसे फळ मिळेल. अनीतीने पैसा कमाविल्यास संसारात दु:ख वाट्यावर येईलच. सुख मिळेल ही अपेक्षाच करता येणार नाही; मग तुमच्या जवळ कितीही संपत्ती असो. म्हणूनच भावना शुद्ध असायला हव्या. मन हे बीजासारखं असतं. म्हणून ते जेवढं शुद्ध ठेवता येईल तेवढं ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. माणसाने मनात जशी भावना जपली तसे त्याचे फलित त्याला मिळत असते. मनासारखे मिळाले म्हणजेच एक प्रकारे त्याला सुख प्राप्त झाले. ही बाब आपल्याला प्रकर्षाने अनेक माध्यमाद्वारे सांगितली जाते. म्हणजेच त्याकरिता आपली श्रद्धा ही निष्ठापूर्वक व प्रामाणिक असावी लागते. जसे एखाद्याचं मन ईश्वरप्राप्तीने जर सुखी होत असेल तर ईश्वरप्राप्तीसाठी बाह्य गोष्टींचा काहीच फायदा होत नाही. Saint Tukaram Maharaj ईश्वरप्राप्तीकरिता आंतरिक भावनाच महत्त्वाची ठरते. हीच बाब तुकोबा सांगतात की, ‘तुका म्हणे केले, मन शुद्ध’ हे चांगले. अर्थात निष्ठापूर्वक व आंतरिक श्रद्धेने कोणतेही कार्य केल्यास सुख मिळाल्याशिवाय राहणार नाही. श्रद्धा म्हणजे सत्याशी जवळीक ठेवणे. चांगल्या गोष्टी आत्मसात करण्यासाठी याच वृत्तीला श्रद्धा असे म्हटले आहे. श्रद्धा या शब्दाचा अर्थ समजावून घेण्यासाठी पुढील उदाहरणावरून अधिक स्पष्ट होईल.
 
 
आजचे युग हे स्पर्धचे युग म्हणून पाहिले जाते. अशा या वर्तमानाचा जर विचार केला तर आयुष्यात स्पर्धेच्या युगात टिकाव धरायचा असेल तर चांगल्या गुणांनी उत्तीर्ण व्हावे लागेल तर कुठे आपल्या मनाप्रमाणे पाहिजे ते मिळवू शकतो. मात्र, याकरिता आपल्याला योग्य शिक्षकाकडे जाऊन धडे घ्यावे लागणार आहे. असे केले तरच आपलं भविष्य उजळून निघाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपल्या मित्रानं सांगितलेल्या नावाजलेल्या शिक्षकाकडे जाऊन त्याकडून मार्गदर्शन घेण्याचे ठरवित असतो. ठरविल्याप्रमाणे नियोजन केले जाते. कारण आपल्या आधी त्यांच्याकडे गेलेल्या मित्राचे भले झाले असल्याकारणाने आपण त्या शिक्षकावर श्रद्धा ठेवून त्यांच्याकडे शिकवणी लावून त्यांनी सांगितलेल्या टिप्स वापरून सांगितलेल्या कृती केल्यानंतरही जर आपल्याला सुरुवातीला पाहिजे ते यश संपादन करता आले नसेल तर एवढ्यावरूनच आपण लगेच त्या शिक्षकाला दोषी ठरवून मोकळे होत नाही किंवा त्याला काही जमत नाही, असा निष्कर्ष काढून तत्काळ बाजूलाही होता येणार नाही. कारण असे करणे चुकीचे ठरू शकते. तर पुन्हा नव्याने तेवढ्याच विश्वासाने, ताकदीने, निष्ठापूर्वक, प्रामाणिकपणे आपण तयारी करून त्यांनी सांगितलेल्या टिप्स वापरण्याचे कौशल्य आत्मसात करून वापरण्याचे सातत्याने प्रयत्न करीत राहतो. कारण त्या शिक्षकावरच्या श्रद्धेमुळे करीत असतो. म्हणून आपण पुन्हा नव्याने अभ्यासाला लागून मन:पूर्वक सराव करीत राहतो. असे केल्याने पुढे येणार्‍या परीक्षेला पहिल्यापेक्षा जास्त तयारीनिशी गेल्याने आता मात्र त्या परीक्षेत आपल्याला भरपूर गुण मिळाले असून आपण अव्वल नंबर कमाविल्यानंतर व पाहिजे त्या उच्च ठिकाणावर गेल्यानंतर आपल्याला पूर्ण खात्री होते की, खरोखर आपल्याला यशाच्या शिखरावर पोहोचविल्याचा महत्त्वाचा वाटा त्या शिक्षकाचा असल्याचे विश्वासपूर्वक वाटते. जिथं विश्वास तिथं श्रद्धा आपोआप निर्माण होते. एकदा का विश्वास निर्माण झाला की, त्याचप्रमाणे त्यांनी सांगितलेल्या टिप्स योग्य असल्याचा आपण प्रत्यक्ष अनुभव मिळविल्यानंतरच त्या शिक्षकावर आपला विश्वास कायम राहून जातो. त्याने दिलेल्याच टिप्स वारंवार उपयोगात आणून जीवन सुसह्य करण्याचा प्रयत्न करीत राहतो. दिलेल्या टिप्सचा फायदा झाल्यामुळे त्या शिक्षकाप्रती श्रद्धा निर्माण होते. केवळ अंधविश्वास न ठेवता त्यांनी सांगितलेली सत्यता पडताळली गेली पाहिजे. या सत्यातूनच त्यांच्याविषयीची श्रद्धा निर्माण होते. हीच अनुभूती आपण मग इतरांना आत्मविश्वासाने सांगत असतो. स्वराज्याची भावना मनात ठेवून छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेते सुख ते आपले सुख अशी शुद्ध भावना मनात ठेवून रयतेच्या सुखासाठी शत्रूशी दोन हात करून विजय संपादन केला. कारण त्यांनी ज्या हेतूने कार्याला सुरुवात केली तशीच शिकवण त्यांनी सैनिकांना दिली. त्यामुळेच स्वराज्य स्थापन करण्यास ते यशस्वी झाले. म्हणून आंतरिक भाव हा अत्यंत महत्त्वाचा असतो. दिसण्यापेक्षा असण्याला त्यामध्ये जास्त महत्त्व आहे.
 
 
अशाच स्वरूपाची निष्ठापूर्वक श्रद्धा जगद्गुरू Saint Tukaram Maharaj संत तुकाराम महाराजांची विठ्ठलावर होती. अविरत नामस्मरण केल्यास, सदासर्वकाळ जयघोष केल्यास विठ्ठलाचे दर्शन होईलच, अशी अतूट श्रद्धा पांडुरंगावर संत तुकाराम महाराजांची होती. आपल्या प्राणसख्या पांडुरंगाला भेटण्यासाठी त्यांच्या हृदयामध्ये आस लागली होती. विठ्ठल भेटीसाठी जीव डोळ्यामध्ये साठवून निष्ठापूर्वक भक्ती करीत होते. विठ्ठलाविषयीच्या असलेल्या उत्कट भावामुळेच त्यांच्या निष्ठापूर्वक भक्तीची पूर्तता होत होती. म्हणूनच त्यांना अवघे विश्व विठ्ठलमय झाल्याचे वाटत असताना त्याच्यापासून दुरावा होऊच नये, असे त्यांना नेहमी वाटत होते. म्हणूनच की काय विठ्ठलावरील उत्कट भाव व्यक्त करताना महाराज म्हणतात की,
 
सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती।
रखुमाईच्या पती सोयरिया॥
गोड तुझें रूप गोड तुझें नाम।
देइर्ं मज प्रेम सर्वकाळ॥
विठो माउलिये हाचि वर देई।
संचोरोनि राहीं हृदयामाजी॥
तुका म्हणे कांहीं न मागे आणिक।
तुझे पायीं सुख सर्व आहे॥ अ. क्र. 15
 
हे माझ्या प्राणसख्या, माझ्या सोयरिया रखुमाईच्या पती विठ्ठला माझ्या जीवनाचा अवघा शीन व भाग जाण्यासाठी सदोदित नित्यनेमाने केवळ माझ्या डोळ्यांसमोर फक्त तुझेच रूप राहू दे. तुझ्या असलेल्या मूर्तीवरून माझी नजर कोणत्याही क्षणाला हटू देऊ नको. कारण मी माझे संपूर्ण जीवन तुलाच समर्पित केलेले आहे. तुझ्या नामस्मरणातला गोडवा काय आहे, याचा मी आजवर अनुभव घेत आलेलो आहे. निर्गुण निराकार प्रसन्न भावमुद्रा असलेले तुझे गोड रूप मनाला भुरळ पाडत असून तुझे सदासर्वकाळ नामस्मरण केल्यामुळे श्रद्धापूर्वक भक्तीचे महत्त्व मी जाणले असून तुझ्या दर्शनाने माझे मन तृप्त झाले असून डोळे दिपविणारे असे सुंदर, गोजीरे, विलोभनीय रूप असून त्या रूपाकडे वारंवार मला पाहावेसे वाटणे साहजिकच आहे. असे मनमोहक रूप तुझे असल्यामुळे माझे सर्व लक्ष तुझ्याकडे वेधून घेतलेले आहे. याचाच परिणाम म्हणून मला सदासर्वकाळ सुखप्राप्ती होत आहे. माझ्याकरिता हेच सुखाचे आगर असल्याने तूच मला पे्रम देत आहे. असाच स्नेह तू माझ्यावर शेवटपर्यंत राहू दे. तुझे अखंडीत नामस्मरण, श्रद्धापूर्वक भक्ती करण्याचे सामर्थ्य देण्याचा वर दे. सोबतच तुझ्या नामस्मरण व श्रद्धापूर्वक भक्तीने माझ्या अंत:करणात कायमस्वरूपी केवळ तुझ्याच भावाचा वास राहू दे. यामध्येच माझे सर्व सुख दडलेलं असून तुझे रूप डोळ्यात साठवून ठेवले आहे. तुझे नामस्मरण व श्रद्धापूर्वक भक्ती याशिवाय दुसरे मला काहीही नको. शेवटपर्यंत तुझ्याच चरणावर माझे डोके राहू दे. कारण तुझ्या चरणापाशीच सर्व सुख आहे.
 
 
जीवनात खरे सुख प्राप्त करण्यासाठी संत आपल्याला योग्य-अयोग्यतेच्या जाणिवेबाबत आयुष्यभर मार्गदर्शन करताना दिसतात. त्या मार्गावर चालावं की नाही? हे आपण आपलं ठरवावयाचं असतं. त्यांनी सांगितलेल्या मार्गावर जर आपण चालण्याचा प्रयत्न केल्यास जीवनात पाहिजे तेवढे सुख आपण प्राप्त करू शकतो. फक्त एकच अट ती म्हणजे सत्याच्या मार्गावर चालण्याची! हा मार्ग खडतर जरी वाटत असला, तरी तो दीर्घायुषी सुखाचा ठरताना दिसतो. दु:खामुळे सुखाचे मूल्य काय ते नीट कळते. खरं तर संतांच्या अंत:करणात जनसामान्य लोकांविषयी आईच्या वात्सल्यासारखीच करुणा असते. प्रामाणिक भक्तीशिवाय काहीही श्रेष्ठ नाही. यामध्येच खरे सुख दडलेले आहे; जे तुमच्या आमच्या द़ृष्टीस पडत नाही. ईश्वरप्राप्तीकरिता अखंड नामस्मरणाची गरज आहे. कारण ईश्वराच्या नामस्मरणातच खूप मोठी ताकद आहे. अनेक गोष्टी असाध्य ते साध्य करण्याची शक्ती नामस्मरणात असल्याचे Saint Tukaram Maharaj महाराज सांगतात. एवढेच नव्हे, तर संत दु:खी माणसाला आपलेपणाची वागणूक देऊन त्याचे दु:ख निवारण्यासाठी मनापासून प्रयत्न करताना दिसतात. आपल्या कर्मानुसार आपल्या जीवनाचं मोल ठरतं! म्हणून कर्म चांगलं ठेवा. प्रामाणिकपणे कार्य करा. कुणावरही अन्याय, अत्याचार करू नका. केवळ संपत्ती कमाविण्याच्या मागे लागू नका. गरजेएवढीच कमवा. अतिरिक्त संपत्ती कमाविणे हे आपले साध्य नाही. संपत्तीपेक्षा संततीकडे लक्ष द्या. त्यांच्यावर चांगले संस्कार करा. आपलं सारं जीवन त्याच्या चरणावर समर्पण करा. आपोआप ईश्वर दर्शन घडल्याशिवाय राहणार नाही. माणसाचे जीवन सुखी व समाधानी करण्यासाठी काय करायला पाहिजे? आणि सुख नेमके कशामध्ये आहे, ही बाब समजावून सांगितली आहे. म्हणूनच Saint Tukaram Maharaj संत तुकाराम महाराज लाडक्या विठ्ठलाला विनम्रपणे विनवणी करतात की, हे विठ्ठला सदा सर्वकाळ तुझेच रूप माझ्या डोळ्यासमोर राहू दे. याशिवाय मी तुला दुसरे काही मागत नाही.
 
- प्रा. मधुकर वडोदे
- 9422200007
Powered By Sangraha 9.0