धारणी नगर पंचायतचा कारभार रामभरोसे

24 May 2023 21:21:54
तभा वृत्तसेवा 
धारणी, 
मागील तीन वर्षांपासून धारणी नगर पंचायतचा (Nagar Panchayat) प्रशासकीय कारभार म्हणजे अंधेरनगरी-चौपट राजा प्रमाणे सुरू आहे. सहा महिन्यापूर्वी लावलेले एलईडी लाईट 80 टक्के बंद पडलेले असून शहरातील मुख्य रस्त्यावर अंधार पडलेला आहे. बल्ब खरेदी व्यवहारात काळे-पिवळे असल्यानेच आतापर्यंत रिप्लेसमेंटची गॅरंटी असताना सुद्धा कंपनीकडून नवीन बल्ब देण्यात आले नाही. विद्युत साहित्य खरेदी, मेंटेनेंस आणि रिप्लेंसमेंट मध्ये वेताळ बत्तीसीची स्थिती झालेली आहे.
 
Nagar Panchayat
 
2015 वर्षात धारणी नगरपंचायत (Nagar Panchayat) स्थापित करण्यात आलेली होती. तीन वर्षांपासून निवडणुका झाल्या नाही म्हणून प्रशासनाच्या हातात कारभार आलेला आहे. शहरातील मुख्य रस्त्यांवर दुतर्फा एलईडी लाईट लावण्याचे काम नगर पंचायतने केले. मात्र, गॅरंटी आणि रिप्लेसमेंटची वेळ शिल्लक असताना सुद्धा बल्ब बदलून आणलेले नाहीत. धारणीच्या मुख्य रस्त्यावर 80 टक्के बल्ब बंद पडल्याने साहित्याची गुणवत्ता समोर आलेली आहे. अनेक खांब वाकलेले आहेत तर काही खांब मुळापासून उखडलेले आहेत. अनेक बल्ब दोन महिन्यापासून बंद असून रिप्लेसमेंट उपलब्ध असताना सुद्धा बदलण्यात आलेले नाही.
 
 
डिव्हायडरचा घोळ
मेन रोडवर डिव्हायडर झाल्यापासून मधोमध एलईडी बल्ब लावण्याची योजना होती तर दोन्ही बाजुला उपलब्ध जुन्या खांबांवर तडकाफडकी एलईडी बल्ब लावून घोळ करण्यात आला. आता ठरल्याप्रमाणे बल्ब बदलविण्यात न येता झालेला गैरव्यवहार दाबण्यात येत आहे. याप्रमाणे बेताल बत्तीसी कारभार नगर पंचायतमध्ये (Nagar Panchayat) सुरू आहे. विजेचा प्रभार असलेले अधिकारी धारणीत दिसतच नाही तर फोन लावले असता प्रतिसाद मिळत नाही. विद्युत व्यवहारात गैरप्रकारा प्रमाणेच रस्ता बांधकामात पण अंधेरगर्दी सुरू आहे. शहरातील जास्त वाहतूक किंवा गर्दी असणार्‍या मार्गाचे सिमेंटीकरण न करता गल्ली-बोळात बांधकामे करुन निधी खर्च करण्यात येत आहे. मुख्य रस्ते सोडून पायवाटांना सिमेंट रोड देण्यात येत आहे. नगर पंचायतीमध्ये प्रशासकीय गोंधळ माजलेला असून जनतेच्या निधीची बंदरबाट सुरू आहे.
 
Powered By Sangraha 9.0