तभा वृत्तसेवा
वर्धा/हिंगणघाट,
कोराना पुर्वी हिंगणघाट येथील रेल्वे स्थानाकावर (Hinganghat Railway Station) थांबत असलेल्या रेल्वे गाड्यांना पुन्हा थांबा देण्यात यावा अशी मागणी वारंवार करण्यात येत होती. या संदर्भात खा. रामदास तडस यांनी काही दिवसांपूर्वीच केंद्रीय रेल्वेमंत्र्यांना निवेदन दिले होते. आता हिंगणघाट रेल्वे स्थानकावर काही रेल्वे गाड्यांचे थांबे पुर्ववत होणार असल्याने राकाँचे वांदिले यांनी आपल्या मुळेच रेल्वे थांबा मिळत असल्याचा प्रतिदावा केला.
वर्धा लोकसभा क्षेत्रातील कोरोनापुर्वी मंजुर असलेले सर्व रेल्वे थांबे तात्काळ सुरू करावे मागणीसाठी खा. रामदास तडस यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली होती. त्या प्रयत्नाला यश मिळाले असुन हिंगणघाट रेल्वे स्थानकावर 16031/32 चेन्नई-श्री माता वैष्णो देवी कटरा अंदमान एक्स्प्रेस, 12967/68 चेन्नई-जयपूर एक्स्प्रेस आणि 12511/12 गोरखपूर-कोचुवेली राप्तीसागर एक्स्प्रेसच्या थांब्याला स्विकृती मिळाली असुन याबाबतचे पत्र ना. अश्विनी वैष्णव यांच्याकडून आपल्याला प्राप्त झाले असुन याबाबत मध्य रेल्वेने पत्रही काढले असल्याचे खा. तडस यांच्या जनसंपर्क कार्यालया मार्फत कळवण्यात आले आहे.
कोरोना काळात रेल्वे थांबे व रेल्वेसेवा प्रभावीत झाली होती. रेल्वे सेवा (Hinganghat Railway Station) पुर्ववत करण्याकरिता व लोकसभा क्षेत्रातील विविध विषयावर चर्चा करण्याकरिता रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन मागण्या त्यांच्यासमोर मांडल्या होत्या. हिंगणघाट येथे पुर्वी 17 गाड्यांना थांबे होते. परंतु, फक्त 4 गाड्यांना थांबे मंजूर असल्याचे आपण केंद्रीय रेल्वे मंत्र्यांना लक्षात आणुन दिले. पुढील काळात लोकसभा मतदरसंघांतील सर्व गाड्या पूर्ववत सुरू होतील असा विश्वास खा. तडस यांनी व्यक्त केला.
राकाँच्या रेल्वे रोको आंदोलनाच्या इशार्याला यश
कोरोना काळापासून हिंगणघाट शहरात बंद झालेले रेल्वे थांबे सुरू करण्याबाबत आप दिलेल्या रेल्वे रोको आंदोलनाच्या इशार्याला यश आले असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अतुल वांदीले यांनी कळवले आहे. हिंगणघाट रेल्वे स्थानकावरील अनेक सुपरफास्ट गाड्यांचे थांबे द्यावे अशी मागणी राकाँचे सरचिटणीस अतुल वांदिले यांनी रेल्वे प्रशासनाला निवेदन देऊन थांबे न दिल्यास रेल्वे पटरीवर उतरून रेल्वे थांबविण्याच्या आंदोलनाचा इशारा दिला होता. त्या इशार्यानेच तात्काळ थांबे देण्यात आल्याचा प्रतिदावा वांदिले यांनी केला. हिंगणघाट येथे स्मार्ट रेल्वे स्टेशन उभारण्यात यावे अशी मागणी अतुल वांदिले यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली. हिंगणघाट रेल्वे स्थानक अमृत भारत योजनेंतर्गत स्मार्ट (मॉडेल) रेल्वे स्टेशन होण्याच्या हालचालींना वेग आला असल्याचेही वांदिले यांनी कळवले आहे.