तभा वृत्तसेवा
सिंदी रेल्वे,
Severe water shortage : येथील पाणीपुरवठा योजना नेहमी वादाच्या भोवर्यात सापडली असते. पंधरा दिवसांपासून जनता पाण्यासाठी कासावीस झाली आहे. पण, कोणाला त्याचे सुतक नाही. दुसरीकडे नियोजनाअभावी कांढळी मार्गावर प्रगती इंग्लिश स्कूलच्या प्रवेशद्वाराजवळ घाण पाण्याचे डबके जमा झाले आहे.
शहारातील 15 हजार नागरिकांना सध्या चवथ्या दिवशी कसेबसे पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात येते. परंतु, पाणी पुरवठा कधी व कोणत्या वार्डात होईल समजतच नाही. ज्यांना सकाळी सहाला पाणी मिळणार अशी अपेक्षा असते व सांगितले जाते त्यांना 18 तासांनी पाणी पुरविल्या जाते. मजूर घरी नसताना पाणी घेणार कोण? याचा पाणी पुरवठा विभाग किंवा काळजीवाहू मुख्याधिकार्यांनी विचार करायल नको का? असा सवाल महिलांनी उपस्थित केला आहे. (Severe water shortage)
शहराला 9 किमी अंतरवरील वाकसूर शिवारातून निरंतर पाणी मिळावे, अशी तरतूद तीन दशकांपूर्वी ना. गडकरी यांनी केली होती. वारंवार वीज पुरवठा खंडीत होत असल्याने एक्स्प्रेस फिडर उपलब्ध करून देण्यासाठी आ. प्रमोद शेंडे यांनी भरपूर निधी दिला होता. तरीही वीज नव्हती! ही लंगडी सबब पुढे केल्या जात आहे. नामांकित कंपनीच्या 30 अश्वशक्तीच्या मोटारी काढून तकलादू पंपसेट लावणारे व पाण्याचे मीटर जनतेच्या माथी मारणारे गप्प कसे? हा सिंदीकरांचा सवाल आहे. भर उन्हाळ्यात दरवर्षी ही समस्या उग्र रूप घेते, हे पालिका प्रशासनास कळत नाही का? अपुरे पाणी मिळत असताना जनतेला अतिरिक्त पाण्याचे पैसे मागताना प्रशासनास काहीच कसे वाटत नाही? शिवाय वारंवार तक्रार करूनही प्रगतीच्या पुढे असलेल्या त्या डबक्याचा सोक्षमोक्ष कधी लावता असा संतप्त प्रश्न शाळेचे संचालक लक्ष्मण डकरे व इतरांनी उपस्थित केला आहे.