शिर्डी,
साईभक्तांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. (Sai Baba Temple) साईबाबांच्या दर्शनासाठी भक्तांना आता आरती पास काऊंटरवर मिळणार आहे. ग्रामस्थ आणि साईमंदिर प्रशासनाचा बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. दर्शन पास व आरती पासचा काळाबाजार रोखण्यासोबतच साईभक्तांना होणार त्रास कमी करण्यासाठी शिर्डी ग्रामस्थांनी पुढाकार घेतला असून, साईबाबा संस्थानसोबत झालेल्या बैठकीत अनेक मागण्या मांडल्या आहेत. या बैठकीत भक्तांना शिफारसीने दिले जाणारे आरती पास आता थेट दिले जाणार असून, ग्रामस्थांना विशेष प्रवेशद्वाराने प्रवेश देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
शिर्डीच्या साईबाबांच्या (Sai Baba Temple) दर्शनासाठी दररोज हजारो तर, उत्सव काळात लाखो साईभक्त येतात. झटपट दर्शन आणि आरती पास काढून देण्याच्या नावाखाली शिर्डीत अनेकदा भक्तांच्या फसवणुकीचे प्रकार समोर आले आहेत. काही सुरक्षा रक्षकांना हाताशी धरून पैसे कमावण्याचा अनेकांनी धंदा सुरू केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. आरती पास घेण्यासाठी लागणार्या शिफारशीमुळे भक्तांची लूट होत असल्याचे देखील बैठकीत सांगण्यात आले.
बैठकीत झालेल्या चर्चेनुसार आता (Sai Baba Temple) साईभक्तांना दर्शन अधिक सुकर व सोपे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ग्रामस्थांना दर्शनासाठी वेगळे प्रवेशद्वार ठरविण्यात आले असून, या ठिकाणाहून फक्त ग्रामस्थांनाच नोंद करून प्रवेश दिला जाणार आहे.