तभा वृत्तसेवा
अमरावती,
Ambadevi temple : मंदिरांचे पावित्र्य, मांगल्य, शिष्टाचार, संस्कृती जपण्यासाठी नागपूरनंतर आता अमरावती येथील श्री अंबोदवी मंदिरासह आठ मंदिरांनी वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढच्या दोन महिन्यात ही संख्या 25 होणार आहे. यापूर्वी जळगाव येथे 4 आणि 5 फेब्रुवारीला मंदिरे अन् धर्मपरंपरा यांच्या रक्षणार्थ झालेल्या राज्यस्तरीय ‘महाराष्ट्र मंदिर-न्यास परिषदे’त उपरोक्त ठराव संमत करण्यात आला होता तसेच अमरावती येथे झालेल्या प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनामध्ये याविषयी चर्चा आणि ठराव संमत झाला होता.
हिंदुत्वनिष्ठांच्या बैठकीमध्ये सुद्धा याविषयी निश्चय झाला. त्यानंतर महाराष्ट्र मंदिर महासंघाचे समन्वयक सुनील घनवट यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीनंतर श्री महाकाली शक्तीपीठ येथे मंगळवारी पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यामध्ये अमरावती येथील (Ambadevi temple) श्री अंबादेवी संस्थान, श्री महाकाली शक्तीपीठ, श्री. बालाजी मंदिर (जयस्तंभ चौक), श्री पिंगळादेवी देवस्थान (नेर पिंगळाई), श्री संतोषी माता मंदिर, श्री आशा-मनिषा देवी संस्थान (दर्यापूर), श्री लक्ष्मी-नारायण देवस्थान (देवळी, अचलपूर), श्री शैतुतबाग हनुमान मंदिर (परतवाडा), श्री दुर्गामाता मंदिर, वैष्णौधाम या मंदिरांमध्ये लवकरच तर जिल्ह्यातील अन्य 25 मंदिरांमध्ये येत्या 2 महिन्यांच्या कालावधीत वस्त्रसंहिता लागू करण्याचे घोषित करण्यात आले. ज्याप्रमाणे महाराष्ट्र शासनाने वर्ष 2020 मध्ये राज्यातील सर्व शासकीय कार्यालयात वस्त्रसंहिता लागू केली, तसेच देशातील अनेक मंदिरे, गुरुद्वारा, चर्च, मशिदी आणि अन्य प्रार्थनास्थळे, खाजगी अस्थापने, शाळा-महाविद्यालय, न्यायालय, पोलिस आदी सर्वच क्षेत्रांत वस्त्रसंहिता लागू आहे.
तसेच मंदिरांमध्ये सुद्धा वस्त्रसंहिता असावी, असे मत यावेळी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’चे समन्वयक सुनील घनवट यांनी व्यक्त केले. देशातल्या अनेक प्रसिद्ध मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू आहे. मद्रास उच्च न्यायालयानेही तेथील मंदिरात प्रवेश करण्यासाठी सात्त्विक वेशभूषा असली पाहिजे, हे मान्य करून 1 जानेवारी 2016 पासून वस्त्रसंहिता लागू केली. श्री महाकाली शक्तीपीठाचे शक्ती महाराज यांनीही आपली भूमिका मांडली. पत्र परिषदेला श्री अंबादेवी मंदिराचे विश्वस्त मीना पाठक, अॅड. राजेंद्र पांडे, श्री संतोषीमाता मंदिराचे अध्यक्ष जयेश राजा, श्री बालाजी मंदिराचे राजेश हेडा, श्री पिंगळादेवी संस्थान, नेर पिंगळाईचे अध्यक्ष विनीत पाखोडे, देवस्थान सेवा समितीचे सचिव अनुप जयस्वाल, श्री दुर्गामाता मंदिर, वैष्णौधामचे श्री नंदकिशोर दुबे, हिंदु जनजागृती समितीचे विदर्भ समन्वयक श्रीकांत पिसोळकर, हिंदु जनजागृती समितीचे जिल्हा समन्वयक नीलेश टवलारे उपस्थित होते. (Ambadevi temple)