अग्रलेख
जम्मू-काश्मीरला (Kashmir Amrit Kaal) त्याची जुनी ओळख आणि समृद्ध चेहरा मिळवून देण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रयत्न यशस्वी होताना दिसत आहे. या भूतलावरचे नंदनवन म्हणून ओळख असलेल्या या प्रदेशाला पुन्हा एकदा समृद्ध-संपन्न बनविण्यासाठी मोदींच्या नेतृत्वातील केंद्र सरकारकडून होत असलेले प्रयत्न प्रशंसनीय आहेत. पाकिस्तानी दहशतवादाचा बळी ठरलेले हे राज्य आणि या राज्यातील जनतेला आनंदात जगता यावे यादृष्टीने सरकारी पातळीवर जे प्रयत्न सुरू आहेत, ते लक्षात घेता जम्मू-काश्मीर लवकरच पूर्वपदावर येईल, अशी आशा करायला हरकत नाही. आधीच्या राज्यकर्त्यांना दोष देत बसण्यापेक्षा आणि त्यांनी केलेल्या चुकांची उजळणी करीत बसण्यापेक्षा प्रदेशातील जनतेच्या हितासाठी आता काय करता येईल, यावर मोदी सरकारचा भर राहिल्याने सुधारणा दिसू लागल्या आहेत. (Kashmir Amrit Kaal) कलम 370 हटविण्याचा अतिशय धाडसी निर्णय ऑगस्ट 2019 मध्ये घेतल्यानंतर खोर्यात परिस्थिती बदलताना दिसत आहे.
श्रीनगरच्या लाल चौकात भारताचा राष्ट्रध्वज तिरंगा फडकवायचा म्हणजे एक मोठे आव्हान असायचे. पण, आता कुणीही जाऊन तिरंगा फडकावून येऊ शकतो आणि हा बदल घडून आला तो केंद्र सरकारने घेतलेल्या सकारात्मक भूमिकेमुळेच! भारतीय भूमीत समाविष्ट असलेल्या या नंदनवनाला दहशतवादाने रक्तबंबाळ केले होते. (Kashmir Amrit Kaal) सुमारे तीन दशके दहशतवादाचे चटके सहन करणार्या काश्मीरला काश्मिरातीलच नेत्यांनी पोखरून टाकले होते. स्वत:ची मुलं लंडन आणि अन्यत्र शिकायला पाठवायची, सरकारी तिजोरी लुटून त्याच पैशांतून विदेशवार्या करायच्या आणि पाकिस्तानी दहशतवाद्यांना आर्थिक मदत करून आपल्याच लोकांचा मृत्यू घडवून आणायचा, हा काश्मिरी नेत्यांचा उद्योग तिथल्या गरीब लोकांना कधीच ओळखता आला नव्हता. मोदींनी तो लक्षात तर आणून दिलाच; कायमचा बंद पाडण्याच्या दृष्टीने ठोस उपायही केलेत. महाकवी, काश्मिरी पंडित, इतिहासकार कल्हन याने सुमारे हजार वर्षांपूर्वी ‘राजतरंगिणी’ची रचना केली. या रचनेत त्यांनी नमूद केलेल्या श्लोकाचा अर्थ असा होतो की, जे स्वर्गात दुर्लभ आहे, ते या काश्मीरच्या भूमीत सहजसुलभ आहे. अतिशय बोलके आणि खरे भाष्य आहे हे. पण, 1990 च्या दशकात या भूतलावरील हे नंदनवन दहशतवादाच्या चटक्यांनी होरपळून निघाले आणि कल्हनाने वर्णन केलेले ते हेच काश्मीर आहे, यावरचा विश्वासही उडाला. पण, मोदींच्या रूपाने देशाला आता कणखर राज्यकर्ता मिळाला आहे.
मोदींनी काश्मीरला पुन्हा जुने वैभव प्राप्त करून देण्याच्या दिशेने जी पावलं उचलली आहेत, तिचे सकारात्मक दृश्य परिणाम आता दिसायला लागले आहेत. कलम 370 हटविल्यानंतर गेल्या दोन वर्षांत जवळपास साडेतीन कोटी पर्यटकांनी नंदनवनाला भेट देणे हा काही चमत्कार नाही. खोर्यात प्रयत्नपूर्वक शांतता प्रस्थापित करून तिथे विकासाच्या प्रक्रियेला जी गती मोदी सरकारने दिली, त्याचा हा परिणाम आहे. (Kashmir Amrit Kaal) काही दिवसांपूर्वीच जम्मू-काश्मिरात जी-20 देशांच्या प्रतिनिधींची बैठक यशस्वीरीत्या पार पडली. ही काही साधारण बैठक नव्हती. जगातल्या 20 शक्तिशाली देशांमधून आलेल्या प्रतिनिधींची ही बैठक होती. जगभरात अशांत, अस्थिर अशी जाणीवपूर्वक बदनामी करण्यात आलेल्या काश्मिरात अशी बैठक होणे शक्यच नाही, याची खात्री पाकिस्तानला तर होतीच; ज्यांना कोणी आता कवडीचीही किंमत देत नाही, त्या काश्मीर खोर्यातील नेत्यांनाही खात्री होती. पण, वाईट नजर ठेवून असणार्या सगळ्यांचाच भ्रमनिरास झाला. कलम 370 रद्द केल्यापासून काश्मीरमधील जनतेच्या मनात विश्वास निर्माण करण्याची जी प्रकि‘या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने यशस्वीपणे राबविली, त्यामुळेच जी-20 परिषद यशस्वी झाली आणि खोर्यात जाणार्या पर्यटकांच्या संख्येतही लक्षणीय वाढ झाली, हे अमान्य करता येणार नाही.
जम्मू-काश्मीरमध्ये जी-20 देशांमधून आलेल्या (Kashmir Amrit Kaal) प्रतिनिधींची बैठक घेतली जाण्याला एक वेगळे महत्त्व होते. काश्मीरचे जे अप्रतिम सौंदर्य आहे, त्याची ‘याती पुन्हा एकदा विश्वपटलावर पोहोचावी, हा मोठा उद्देश जी-20 ने साध्य झाला आहे. जम्मू-काश्मीरमधील जनतेच्या चेहर्यावरील आनंद जागतिक समुदायाने बघितला, हे फार चांगले झाले. काश्मिरातील जनतेवर भारताकडून अत्याचार केले जात असल्याचा जो दुष्प्रचार पाकिस्तानकडून वारंवार केला जातो, त्यालाही चोख उत्तर मिळाले आहे. काश्मीरचे जे बदललेले परिदृश्य आहेे, ते स्वत:च्या डोळ्यांनी पाहणार्या विदेशातील प्रतिनिधींना आता याची खात्री पटली आहे की, मोदींच्या नेतृत्वात काश्मीर प्रदेश विकासाच्या वाटेवर आहे, तिथे शांतता प्रस्थापित होते आहे. आता जेव्हा पाकिस्तानकडून नौटंकी केली जाईल, काश्मीरचा राग आळवला जाईल, तेव्हा पाकिस्तानचे कपडे फाटल्याशिवाय राहणार नाहीत.
काही वर्षांपूर्वीचा काळ आठवा. (Kashmir Amrit Kaal) काश्मिरात कुठल्याही कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येताच संप पुकारला जायचा, बंदचे आवाहन केले जायचे. जे ऐकणार नाहीत, त्यांच्यावर अत्याचार केले जायचे. सगळीकडे नुसती दडपशाहीच होती. अतिरेक्यांकडून निष्पाप लोकांची हत्या केली जायची. यामुळे दहशत निर्माण होऊन लोक घराबाहेरच पडत नसत. जनजीवन पूर्णपणे ठप्प पडत असे. ती परिस्थिती आज निश्चितच बदलली आहे. ऑगस्ट 2019 मध्ये मोदी सरकारने कलम 370 रद्द करण्याचा निर्णय घेतला आणि परिस्थिती बदलू लागली. पंतप्रधान मोदी यांनी काश्मिरी समाजात स्वप्नांचे, साहसाचे, नव्या आकांक्षांचे जे बीज रोवले होते, ते आता फळास येताना दिसत आहे, ही आनंदाची बाब मानली पाहिजे. त्याचप्रमाणे मोदींनी शांतता आणि समृद्धीचा जो मार्ग तयार केला, त्या मार्गावर वाटचाल करताना संपूर्ण जम्मू-काश्मीरने जगापुढे एक उदाहरण प्रस्तुत केले आहे. मोदी सरकारकडून विकासाची आणि शांततेची प्रक्रिया राबविणे सुरू असताना शेजारच्या पाकिस्तानने मार्गात अडथळे आणले नाहीत, असे अजिबात नाही. पाकने जेवढा म्हणून उपद्रव करता येईल, तेवढा केला. पण, वर्षानुवर्षे विकासाची आस लावून बसलेल्या काश्मिरी जनतेने पाकिस्तानचे मनसुबे उधळून लावले.
जी-20 चे आयोजन म्हणजे आपल्यासाठी उत्सव असल्याचे मानत (Kashmir Amrit Kaal) काश्मिरी लोकांनी ते यशस्वी करून दाखवत अडथळे आणणार्या पाकच्या थोबाडीत मारली. समृद्ध समाजाचे सगळ्यात मोठे कोणते लक्षण मानले जात असेल तर ते आहे गतिशीलता. जम्मू-काश्मीरच्या लोकांमध्ये आजवर असमानतेची भावना घर करून होती. पण, मोदींच्या नेतृत्वात प्रशासनाने मोठ्या प्रमाणात नागरिकांना शक्ती आणि गती प्रदान केली, त्याचेही सकारात्मक परिणाम आज दिसू लागले आहेत. काही वर्षे आधी या प्रदेशात डिजिटल व्यवहारांची कल्पना करणे केवळ अशक्य मानले जात होते. पण, आज संपूर्ण प्रशासन डिजिटली काम करीत आहे. जवळपास 470 सार्वजनिक सेवा डिजिटली उपलब्ध आहेत. 370 हटविल्यानंतरची ही सगळ्यात मोठी उपलब्धी मानायला नको? हे जे परिवर्तन घडून आले आहे ना, ते नागरिकांना मोठी स्वप्ने पाहण्याची प्रेरणा देत आहे, यात शंका नाही. देश स्वतंत्र होऊन पाऊणशे वर्षे लोटली आहेत. जम्मू-काश्मीरमधील लोकांच्या आशा-आकांक्षा पूर्ण करण्यात पंतप्रधान मोदी यांना यश येते आहे, खर्या अर्थाने काश्मीरमधील लोक आज स्वातंत्र्याचा (Kashmir Amrit Kaal) ‘अमृत काळ’ अनुभवत आहेत. जे जे बोलले गेले, ते सगळे प्रत्यक्षात येत असल्याने जनतेचा मोदी सरकारवरील विश्वासही दृढ होत चालला आहे.