स्पर्धेत टिकण्यासाठी जिद्द, चिकाटी आवश्यक

- आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांचे प्रतिपादन
- युवाशक्ती करिअर शिबिराचे आयोजन

    दिनांक :11-Jun-2023
Total Views |
तभा वृत्तसेवा 
सडक अर्जुनी, 
Yuva Shakti Career Camp : विद्यार्थ्यांनी बदलत्या काळानुसार शिक्षण घेतले पाहिजे. शिक्षण घेत असताना लक्ष विचलित होऊ न देता त्याचा केंद्रबिंदू हा अभ्यास करून आपले करिअर घडविणे हा असला पाहिजे. शिक्षण हा जीवनाचा अविभाज्य अंग आहे. हे प्रत्यक्ष समजले तर विद्यार्थी जीवनात यशस्वी वाटचाल करून आयुष्यात सफल झाले असे म्हणता येईल.स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास आणि संघर्ष करण्याची तयारी असेल तर तो विद्यार्थी टिकून राहतो, असे प्रतिपादन आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी केले.
 
Yuva Shakti Career Camp
 
शासकीय व्यापार उद्योगिक प्रशिक्षण संस्था सडक अर्जुनी द्वारा आयोजित छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचा उद्घाटनाप्रसंगी ते उद्घाटक म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी गोंदियाचे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था अधिकारी हेमंत आवारे होते. प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार गणेश खताले, नगराध्यक्ष तेजराम मडावी, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी दिलीप खोटेले, शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी उमेश खराडे, नपंचे मुख्याधिकारी प्रणय तांबे, डुग्गीपार पोलिस ठाणेचे पोलिस निरीक्षक आर.के. सिंगनजुडे उपस्थित होते. पुढे बोलताना आमदार चंद्रिकापुरे म्हणाले, आयटीआय हा विभाग अत्यंत महत्त्वाचा विभाग असून करिअर घडविण्यासाठी उपयुक्त आहे. हे शिक्षण घेणार्‍या तरूणांमध्ये चांगले कौशल्य असते. मॅकेनिकल, इलेक्ट्रॉनिक अशा अनेक प्रकारचे शिक्षण घेणार्‍या तरुणाला मोठमोठ्या खासगी कंपनीमध्ये काम करण्याची संधी दिली जाते. अशा संधी मिळण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता या विभागाच्या हा उपक्रम असून असे शिबिर आयोजित केले जाते, असे मत व्यक्त केले. या शिबिरात आयटीआय प्रशिक्षण घेणारे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Yuva Shakti Career Camp)