केजीबीने सावध केले होते!

12 Jun 2023 06:00:04
दिल्ली दिनांक
 
- रवींद्र दाणी
 
‘‘सुवर्ण मंदिरातून- जूनच्या पहिल्या आठवड्यात (Jarnel Singh Bhindranwale) जर्नेलसिंग भिंद्रानवाले खलिस्तान स्थापनेची घोषणा करतील. पाकिस्तान त्याला मान्यता देईल आणि आपल्या फौैजा पंजाब सीमेतून भारतात घुसवेल’’, अशी स्पष्ट माहिती तत्कालीन सोवियत युनियनची गुप्तचर संस्था केजीबीने तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना दिली होती आणि या माहितीच्या आधारावर त्यांनी सुवर्ण मंदिरात तडकाफडकी लष्करी कारवाई करण्याचा निर्णय घेतला होता.
 
Jarnel Singh Bhindranwale
 
केवळ 36 तास!
अमेरिकेने ओसामा बिन लादेनला पकडण्यासाठी सहा महिने तयारी केली होती. ओसामाच्या घराची प्रतिकृती तयार करून, त्याचा सराव अमेरिकन कमांडोंनी केला होता. पण, सुवर्ण मंदिरात लष्करी कारवाईची तयारी करण्यासाठी लष्कराला फक्त 36 तासांचा अवधी देण्यात आला होता आणि प्रत्यक्ष कारवाईसाठी तर फक्त 8 तास!
 
 
लष्करी कारवाईचा निर्णय 31 मे रोजी घेण्यात आला. 2 जून रोजी लष्करी तुकड्या अमृतसरकडे कूच करू लागल्या. या तुकड्यांना अमृतसरला पोहोचण्यास दोन दिवस लागणार होते. 4 जूनला लष्कराने प्राथमिक तयारी केली आणि 5 जूनच्या रात्री प्रत्यक्ष कारवाई सुरू करण्यात आली. 6 जूनच्या सूर्योेदयापूर्वी कारवाई पूर्ण करा असा आदेश लष्कराला देण्यात आला होता.
 
 
माणेेकशांचा नकार
भारतीय लष्कराच्या इतिहासात लष्कराला (Jarnel Singh Bhindranwale)  प्रथमच एवढ्या तडकाफडकी कारवाई करावी लागली होती. 1971 च्या भारत- पाक युद्धात इंदिरा गांधी यांना एप्रिल महिन्यात लष्करी कारवाई हवी होती. त्यांची ती सूचना तत्कालीन लष्करप्रमुख जनरल माणेेकशा यांनी अमान्य केली होती. ‘‘एवढ्या कमी अवधीत मी युद्ध करू शकत नाही’’ असे सांगूून माणेकशांनी डिसेंबर महिन्यात युद्ध सुरू केले होते. पण, या ठिकाणी केवळ काही तासांच्या अवधीत लष्कराला कारवाई करावी लागली कारण भारत सरकारला केजीबीकडून देण्यात आलेली माहिती व सोबत देण्यात आलेला धोक्याचा इशारा!
 
 
1971 ची पुनरावृत्ती
1971 मध्ये भारताने बांगला देशात जे केले तेच 1984 मध्ये जूनच्या पहिल्या आठवड्यात पंजाबमध्ये करण्याची पाकिस्तानची योजना होती. पाकिस्तानचे शासक जनरल झिया उल हक यांनी पंजाबमध्ये लष्कर घुसविण्याची तयारी सुरू केली होती. 1971 मध्ये बांगला देशाचे नेते शेख मुजीबूर रहेमान यांनी स्वातंत्र्ययुद्ध पुकारले. भारताने लगेच नव्या बांगला देशाला मान्यता दिली आणि नव्या देशाच्या रक्षणासाठी भारताने आपले सैन्य तेव्हाच्या पूर्व पाकिस्तानात म्हणजे आजच्या बांगला देशात पाठवून पाकिस्तानचे दोन तुकडे केले. बांगला देश अस्तित्वात आला. पंजाबमध्ये अगदी अशीच व्यूहरचना राबविण्याचा निर्णय जनरल झिया उल हक यांनी घेतला होता. यासाठी जूनचा पहिला आठवडा निवडण्यात आला होता. (Jarnel Singh Bhindranwale)  जर्नेलसिंग भिंद्रानवाले खलिस्तानची घोषणा करतील. पाकिस्तान पंजाबमध्ये सैन्य घुसवेल. पंजाब पोलिस खलिस्तानवाद्यांना मदत करतील, असे केजीबीने इंदिरा गांधी यांना कळविले होते.
 
 
केजीबीने दिलेली ही माहिती गंभीर होती. मात्र, केजीबीजवळ नसणारी आणि एक गंभीर माहिती भारत सरकारजवळ होती. पंजाबच्या ग्रामीण भागात (Jarnel Singh Bhindranwale)  भिंद्रानवालेंना ‘संत’ मानले जाऊ लागले होते. खलिस्तानची घोषण झाल्यास त्या घोषणेला ग्रामीण पंजाबमध्ये प्रतिसाद मिळण्याची चिन्हे होती. या सार्‍या पृष्ठभूमीवर पाकिस्तानने पंजाबमध्ये सैन्य घुसविल्यास- 1947च्या स्थितीची पुनरावृत्ती होणार होती. 1947 च्या विभाजनात सर्वाधिक हिंसाचार पंजाबमध्ये झाला होता. याची पुनरावृत्ती झाल्यास पंजाबमधील हिंदू हरयाणा व दिल्लीकडे पलायन करणार होते, तर शीख पंजाबमध्ये जाणार होते. आणि ही स्थिती हाताळणार कोण? पंजाब पोलिसांचे मनोधैर्य पूर्ण खचलेले होते. मग ही स्थिती हाताळावयाची कशी? याच कारणासाठी अमृतसरमध्ये तैनात लष्कराला सुवर्ण मंदिरात कारवाई करण्यास सांगण्यात आले नाही. अमृतसरमध्ये तैनात लष्कराला पंजाबच्या भारत-पाक सीमेची माहिती होती. ही सीमा सुरक्षित-अभेद्द ठेवण्याची जबाबदारी लेफ्ट. जनरल गौरीशंकर यांना देण्यात आली. यासाठी अमृतसरमध्ये असलेले लष्कर भारत-पाक सीमेवर तैनात करण्यात आले. पंजाबची स्थिती हाताळण्याची जबाबदारी जालंधरमध्ये तैनात लष्करी पथकांना देण्यात आली होती तर सुवर्ण मंदिरातील कारवाईसाठी मेरठमध्ये तैनात डिव्हिजनची निवड करण्यात आली. वास्तविक मेरठ-अमृतसर हे अंतर 440 किलोमीटरचे. मेरठहून निघणार्‍या सैनिकांना अमृतसरला पोहोचण्यास 12 तास लागणार होते. या पथकांना सुवर्ण मंदिराची काहीही माहिती नव्हती. मात्र तरीही त्यांना लष्करी कारवाईसाठी वापरण्याची जोखीम पत्करण्याचा निर्णय घेण्यात आला.
 
 
टीका
सुवर्ण मंदिरात करण्यात आलेल्या लष्करी कारवाईच्या तयारीवर अनेकदा टीका करण्यात आली. कोणतीही तयारी न करता ही कारवाई करण्यात आली असे काही लष्करी अधिकार्‍यांना वाटत होते. पण, केजीबीने दिलेल्या माहितीनंतर इंदिरा गांधींचे हात एक प्रकारे बांधले गेले होते. त्यांनी वेळ न दवडता कारवाई करण्याचा निर्णय घेतला होता.
 
 
भिंद्रानवाले प्रकरण
ब्ल्यू स्टार कारवाईत (Jarnel Singh Bhindranwale)  भिंद्रानवाले मारला गेला. त्याच्या मृतदेहावर अंत्यसंकार करण्यात आला. पण, भिंद्रानवाले पाकिस्तानात पळून गेला आहे आणि 30 जून रोजी तो पाकिस्तानी टीव्हीवर प्रकट होणार आहे अशी अफवा पसरविण्यात आली. ही अफवा एवढी जबर होती की, पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आपले माहिती व प्रसारण मंत्री हरकिशनलाल भगत यांना लष्करी अधिकार्‍यांशी संपर्क करून वस्तुस्थिती जाणून घेण्यास सांगितले होते. त्यानुसार भगत यांनी मेजर जनरल बरार यांना दूरध्वनी केला. बरार यांनी त्यांना सांगितले, ‘‘मी स्वत: भिंद्रानवालेचा मृतदेह पाहिला आहे. तो ठार झाला आहे याबाबत कोणतीही शंका नाही.’’ पण, अफवा एवढी जबरदस्त होती की स्वत: जनरल बरार 30 जून रोजी भिंद्रानवाले खरोखरीच प्रकट होणार काय हे पाहण्यासाठी त्या दिवशी स्वत़: पाकिस्तानी टीव्ही लावून बसले होते.
 

अशी पसरली अफवा
भिंद्रानवाले जिवंत असल्याची अफवा का पसरली? लष्करी कारवाईनंतर दोन दिवसांनी एक गरुड पक्षी सुवर्ण मंदिर परिसरात असलेल्या एका झाडावर बसलेला आहे. हा पक्षी म्हणजेच भिंद्रानवाले आहे आणि तो आता 30 जून रोजी पाकिस्तानी टीव्हीवर दिसणार अशी ही अफवा होती. ऑपरेशन ब्ल्यू स्टारनंतर अनेक युवक सीमा ओलांडून पाकिस्तानात गेले. कशासाठी? संतजींना भेटण्यासाठी! संतजी म्हणजे जर्नेलसिंग भिंद्रानवाले.
 
 
नवा भिंद्रानवालेे!
बि‘टनमध्ये राजाचे निधन झाल्यावर म्हटले जाते, किंग इज डेड, लाँग लिव्ह द किंग! म्हणजे राजाचे निधन झाले आहे, नवा राजा चिरायू होवो. भिंद्रानवालेेचे असेच झाले आहे. ब्ल्यू स्टार कारवाईत भिंद्रानवालेे मारला गेला. पण, एक नव्या भिंद्रानवालेेचा जन्म झाला. भिंद्रानवालेेच्या निधनानंतर 39 वर्षांनी आजही दिल्ली, पंजाब, हरयाणा या भागात मोटारींवर हाती कृपाण घेतलेल्या, भेदक नजरेने रोखून पाहणार्‍या भिंद्रानवालेेचे छायाचित्र लावलेले दिसते. (Jarnel Singh Bhindranwale)  लंडनमधील गुरुद्वारा असो की न्यू यॉर्कचा टाईम स्क्वेअर- तेथे भिंद्रानवालेेचे मोठमोठे फोटो झळकत असतात. स्वत: भिंद्रानवालेेच्या आकारापेक्षा मोठे! ‘लार्जर दॅन लाईफ इमेज’ म्हणजे काय याचे उदाहरण म्हणजे 39 वर्षांपूर्वी भारतीय लष्कराकडून मारला गेलेला 36 वर्षांचा जर्नेलसिंग भिंद्रानवाले!
 
 
शेवटचे छायाचित्र
2 जूनच्या रात्री रघु राय नावाच्या पत्रकाराने (Jarnel Singh Bhindranwale)  भिंद्रानवालेचे शेवटचे छायाचित्र टिपले तेव्हा तो अकाल त‘तच्या वरच्या मजल्यावर एका बल्बच्या उजेडात एकटाच बसला होता. ते छायाचित्र पुरेसे बोलके होते. त्या छायाचित्रात दोन बाबी स्पष्ट दिसत होत्या- भिंद्रानवालेच्या डोक्यात दाटलेला संताप आणि डोळ्यात साचलेली भीती!
Powered By Sangraha 9.0