चंद्रपुरात गोंडवाना विद्यापीठाच्या उपकेंद्र साकारणार

*मुनगंटीवारांच्या प्रयत्नांनी 8.53 एकर जागा मंजूर

    दिनांक :15-Jun-2023
Total Views |
तभा वृत्तसेवा
चंद्रपूर, 
गडचिरोली येथील (Gondwana University) गोंडवाना विद्यापीठाचे उपकेंद्र आता चंद्रपुरात साकारणार आहे. उपकेंद्राचा प्रस्ताव बर्‍याच वर्षांपासून प्रलंबित होता. आता मात्र त्यासाठी 8.53 एकर जागा मंजूर करण्यात आली आहे. या विद्यापीठाच्या उपकेंद्राकरिता शासनाकडून मान्यता प्राप्त झाली आहे. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले.
 
Gondwana University
 
नुकतेच श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी (एसएनडीटी) महिला विद्यापीठाचे ज्ञान संकुलाचे उद्घाटन झाले. बल्लारपूर-चंद्रपूर मार्गावर या विद्यापीठाचे उपकेंद्र तयार होत असतानाच, आता (Gondwana University) गोंडवाना विद्यापीठाचे उपकेंद्रही चंद्रपुरात होणार आहे. शिक्षणासोबतच कौशल्य विकासावर वन व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांचा भर आहे. त्यांच्याच पाठपुराव्यामुळे या दोन विद्यापीठांचे उपकेंद्र जिल्ह्याला मिळत आहे.
 
 
चंद्रपूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना (Gondwana University) गोंडवाना विद्यापीठाचे मुख्यालय भौगोलिक अंतरामुळे लांब पडत होते. या संदर्भात राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री मुनगंटीवार यांनी उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांना डिसेंबर 2022 मध्ये पत्र पाठवित गोंडवाना विद्यापीठाचे उपकेंद्र चंद्रपुरात स्थापन करण्याबाबत सूचना केली होती. मुनगंटीवार यांचे पत्र प्राप्त होताच उच्च व तंत्रशिक्षण विभाग, गोंडवाना विद्यापीठ प्रशासन कामाला लागले.
 
 
चंद्रपूर शहरातील बाबुपेठ मोहल्ला येथील खुली जागा गोंडवाना विद्यापीठाचे उपकेंद्र स्थापन करण्याच्या दृष्टीने उपलब्ध असल्याचे उपअधीक्षक, भुमी अभिलेख कार्यालय, चंद्रपूर यांनी नमूद केले आहे. त्यानुसार ही जागा गोंडवाना विद्यापीठाच्या चंद्रपूर उपकेंद्रासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात 15 तालुक्यांचा समावेश आहे. 133 कॉलेजेच गोंडवाना विद्यापीठाशी संलग्न आहेत. आता चंद्रपुरातच (Gondwana University) गोंडवाना विद्यापीठाचे केंद्र स्थापन होणार असल्याचे विद्यार्थ्यांना होणारा त्रास वाचणार आहे. स्थानिक पातळीवरच उपकेंद्र साकार होणार असल्यामुळे चंद्रपुर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी मुनगंटीवार यांचे आभार मानले आहे.