अंजनगाव तालुका कृषी कार्यालय वार्‍यावर

- महत्त्वाची पदे रिक्त

    दिनांक :17-Jun-2023
Total Views |
तभा वृत्तसेवा 
अंजनगाव सुर्जी, 
तालुका कृषी कार्यालयात (Agriculture Office) गेल्या एक वर्षापासून कायमस्वरुपी तालुका कृषी अधिकारी नसल्याने कार्यालय वार्‍यावर असून प्रभारी कृषी अधिकारीही आठवड्यातून एक दिवसच कार्यालयाला देत असल्याने आठवडाभर उंटावरूनच शेळ्या हाकण्याचा प्रकार सध्या तालुक्यात सुरू आहे.
 
Agriculture Office
 
अंजनगाव सुर्जी तालुक्यात मोठ्या प्रमाणात बारमाही पिके घेतल्या जातात. तालुक्यात 44 हजार हेक्टर शेती पेरणी योग्य असून त्यातील 13 ते 14 हजार हेक्टर क्षेत्र हे ओलिताखाली आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी विविध योजनांसाठी कार्यालयात जातात. आता खरिपाची लगबग सुरू असून दररोज शेकडो शेतकरी तालुका कृषी कार्यालयाच्या चकरा मारतात; परंतु कार्यालयात तालुका कृषी अधिकारी, कार्यालयीन कृषी अधिकारी, मंडळ अधिकारी यांच्या जागाच रिक्त असल्याने शेतकर्‍यांना आल्या पावली परत जावे लागते. प्रभारी तालुका कृषी अधिकारी फक्त मंगळवारीच कार्यालयात येतात, मात्र इतर दिवशी ते कार्यालयात येत नसल्याने शेतकर्‍यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. (Agriculture Office) 
 
 
तालुका कृषी अधिकारीच उपलब्ध नसल्यामुळे कृषी कार्यालयातील (Agriculture Office) इतर कर्मचार्‍यांवर कोणाचाही वचक राहिला नाही. त्यामुळे कार्यालयातील इतर कर्मचारी कार्यालय सोडून साईडवर गेल्याचे सांगून कार्यालयातून गायब राहतात. त्यामुळे कृषी कार्यालयात येणार्‍या शेतकर्‍यांना तालुका कृषी अधिकारी तर मिळत नाहीच, इतरही कर्मचारीही आढळून येत नाहीत, त्यामुळे त्यांच्या खुर्च्या रिकाम्याच दिसतात, असे जवर्डी येथील शेतकरी राजेश ढोक यांनी सांगितले.
 
 
अंजनगावचा अतिरिक्त कार्यभार
माझ्याकडे दर्यापूर कार्यालयाचा (Agriculture Office) नियमित प्रभार असून अंजनगाव सुर्जी कार्यालयाचा अतिरिक्त कार्यभार आहे. दर्यापूर कार्यालयाचा कारभार आटोपून उर्वरित वेळेमध्ये अंजनगाव कार्यालयाचा कारभार पाहतो. सध्या खरीप हंगाम गृहनियंत्रणाचे काम फार मोठ्या प्रमाणात असल्यामुळे ते पाहून मी अंजनगाव सुर्जी येथील कारभार पाहतो.
- राजकुमार अडगोकार (तालुका कृषी अधिकारी)