पाण्याच्या ‘पीएच’वर कृषी विभाग विज्ञाननिष्ठ

- शेतकरी प्रशिक्षणासाठी कृषी संचालकांचे निर्देश
- शेतकरी संघटनेचे मिलिंद दामले यांच्या लढ्याला यश

    दिनांक :18-Jun-2023
Total Views |
तभा वृत्तसेवा 
यवतमाळ, 
Water pH : शेतकर्‍याला उत्तम शेती करायची असेल तर त्याने विज्ञाननिष्ठ होणे अनिवार्य झाले आहे. माती आणि पाण्यातील रासायनिक तत्त्व ओळखण्याची गरज आता बळावली आहे. आजवर शेतकर्‍यांना पिकावर कीटकनाशकांची फवारणी करताना पाण्याचा सामू (पीएच) किती असावा, याचेच शास्त्रीय ज्ञान मिळाले नाही. त्यामुळे विपरित परिणाम झाले. त्यासाठी शेतकरी संघटनेच्या तंत्रज्ञान आणि कृषी विज्ञान आघाडीचे प्रदेशाध्यक्ष मिलिंद दामले यांनी कृषी विभागाकडे पाठपुरावा केला होता. त्यातूनच आता कृषी आयुक्तालयाने राज्यातील शेतकर्‍यांना कीटकनाशक फवारणीत पाण्याच्या ‘सामू’ संदर्भात प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. 
 
Water pH
 
शेतकरी कीटकनाशकांची फवारणी करतो, तेव्हा कीटकनाशकांचे मिश्रण बनविताना त्यात वापरल्या जाणार्‍या पाण्याचा सामू किती आहे, हेसुद्धा त्याला कळणे अनिवार्य आहे. मात्र, बहुसं‘य शेतकरी अल्पशिक्षित आहेत. त्यामुळे त्यांना मातीतील सिलिका, अ‍ॅल्युमिना, फॉस्फरस, कॅल्शियम, मॅग्नेशीयम आणि पाण्यातील नायट्रेट, अल्कलीज, टीडीएस, फ्लोराईड अशा रसायनांबाबत माहिती नसते. कीटकनाशकांच्या फवारणीत पाण्याचा सामू किती असावा याबाबत जाणीव जागृती नसल्याने मिलिंद दामले यांनी अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कृषी दैनंदिनीतील सामू संदर्भातील माहितीवर आक्षेप घेतला होता. त्यानंतर त्यांनी कीटकनाशकांवर स्पष्टपणे सामू नमूद करण्यासंदर्भातही आग‘ही मागणी केली होती. इतकेच नव्हे तर कृषी आयुक्तालयाकडेही पत्रव्यवहार केला होता. (Water pH) 
 
 
त्यातूनच पुणे येथील कृषी आयुक्तालयाच्या निविष्ठा व गुणनियंत्रण विभागाचे संचालक विकास पाटील यांनी राज्यातील सर्व जिल्हा कृषी अधिकार्‍यांना 29 मे 2023 रोजी एक पत्र पाठविले आहे. यामध्ये त्यांनी राज्यातील शेतकर्‍यांना कीटकनाशके फवारणीचे द्रावण बनविताना त्यातील पाण्याचा सामू किती असावा, याबाबत मार्गदर्शन करण्याचेही निर्देश दिले आहेत. यवतमाळ जिल्ह्यात कीटकनाशकाच्या फवारणीतून झालेल्या विषबाधेत 21 ते 22 शेतकरी, शेतमजुरांचा बळी गेला होता. मुळात त्यावेळी सुरक्षेसंदर्भात कुठलीही जागृती झाली नव्हती. निदान यंदाच्या हंगामामध्ये फवारणीतून त्यांचे आरोग्य व आर्थिक नुकसान होऊ नये, यासाठी जिल्हाधिकार्‍यांसह जिल्हा कृषी अधीक्षकांना निवेदन दिल्याचे मिलिंद दामले म्हणाले. (Water pH) 
नितीन गडकरींसह खा. गवळी आणि आ. येरावारांकडूनही पाठपुरावा
कीटकनाशक फवारणीत पाण्याचा सामू आणि कीटकनाशकांच्या मिश्रणाबाबत शेतकर्‍यांना मार्गदर्शन व्हावे, या संदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरींसह यवतमाळचे आमदार मदन येरावार आणि खासदार भावना गवळी यांनीही कृषी संचालकांना पत्र लिहिले आहे. त्यामध्ये शेतकर्‍यांना आगामी काळात सामू संदर्भात व विविध कीटकनाशकांचे मिश्रण करताना कोणती काळजी घ्यायची, याबाबत प्रशिक्षण कार्यक‘म राबवावेत, अशी सूचना केली आहे. (Water pH)