पुणे,
Pune Univercity : शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्याची ओळख आता ड्रग्ज हाऊस होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मागील काही दिवसांपासून पुण्यात करोडो रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला आहे. यात महत्त्वाची बाब म्हणजे, यात ताब्यात घेण्यात आलेले अनेक आरोपी महाविद्यालयात शिक्षण घेणारे आहेत. त्यामुळे आता शिक्षणाच्या माहेरघरात नेमके चालले काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
गडचिरोली जिल्ह्यातून गांजा विक्रीसाठी आलेल्या तीन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना पुणे गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने रविवारी पुणे-अहमदनगर रोड परिसरातून अटक केली. या विद्यार्थ्यांकडून 11 लाख 70 हजार रुपये किमतीचा 56 किलो गांजा जप्त करण्यात आला. राम राजेश बैस आणि निकेश पितांबर अनोले, गडचिरोली, आणि भंडारा जिल्ह्यातील ऋतिक कैलास टेंभुर्णे अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध चंदननगर पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाचे कर्मचारी खराडी परिसरात गस्तीवर होते. त्यावेळी पोलिस हवालदार चेतन गायकवाड आणि रवींद्र रोकडे यांना गडचिरोली येथील तिघेजण चंदननगर परिसरात गांजा विकण्यासाठी येत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिस पथकाने सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले. झडती घेतली असता त्यांच्याकडे गांजा सापडला. पोलिसांनी 55 किलो गांजा आणि मोबाईल जप्त केला आहे.
पुण्यातील तरुण ड्रग्जच्या आहारी?
काही दिवसांपूर्वी 1 कोटी 14 लाख रुपये किमतीच्या एलएसडी स्ट्रिप्स उच्चशिक्षित विद्यार्थ्यांकडून जप्त करण्यात आल्या होत्या. पार्टी आणि इतर शौक पूर्ण करण्यासाठी लागणार्या पैशासाठी थेट ड्रग्ज विक्रीचा व्यावसाय करीत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. अमली पदार्थ पोहोचविण्यासाठी चक्क फूड डिलिव्हरी अॅपचा वापर करीत असल्याचेही तपासात पुढे आले होते. याप्रकरणी पुणे पोलिसांनी पाच जणांना अटक केली होती. व्हॉटसअॅपद्वारे संपर्क साधल्यानंतर डिलिव्हरी देण्यासाठी ते फूड अॅपद्वारे ऑर्डर बुक करीत होते. समोरील व्यक्तीने ऑर्डर दिल्यानंतर ते डिलिव्हरी बॉयकडे पार्सल पॅक करून देत होते. या पार्सलमध्ये काय आहे, हे डिलिव्हरी बॉयला माहिती नसायचे, असे पोलिस तपासात पुढे आले होते.