वेबसीरिज प्रकरणी छोटा राजनला दिलासा नाही

02 Jun 2023 19:02:20
मुंबई, 
‘स्कूप’ या वेब सीरिजच्या विरोधात याचिका दाखल करणार्‍या तुरुंगात बंद गँगस्टर राजेंद्र निकाळजे ऊर्फ Chhota Rajan छोटा राजन याला मुंबई उच्च न्यायालयाने शुक‘वारी तत्काळ दिलासा देण्यास नकार दिला आहे. न्यायमूर्ती एस. जी. डिगे यांच्या सुट्टीतील खंडपीठाने हंसल मेहता आणि नेटफ्लिक्स एंटरटेनमेंट सर्व्हिसेस इंडियासह मालिकेचे निर्माते आणि निर्मात्यांना राजनच्या याचिकेला उत्तर म्हणून 7 जूनपर्यंत प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश दिले. छोटा राजनच्या म्हणण्यानुसार, त्याच्या पूर्वपरवानगीशिवाय वेबसीरिजमध्ये त्याच्या व्यक्तिमत्त्व वैशिष्ट्यांचा वापर किंवा गैरवापर हे मानहानी तसेच त्याच्या अधिकारांचे उल्लंघन आहे. यावरून तुरुंगात असलेल्या छोटा राजनने गुरुवारी वेबसीरिजच्या विरोधात न्यायालयात धाव घेतली होती.
 
 
chhota Rajan
 
Chhota Rajan छोटा राजनचे वकील मिहिर देसाई म्हणाले की, ही मालिका प्रदर्शित झाली आहे आणि सर्व सहा भाग उपलब्ध असल्याची माहिती न्यायालयाला देण्यात आली. तेव्हा निर्मात्यांना मालिकेतून त्याचे नाव आणि भूमिका काढून टाकण्याचे निर्देश दिले जाऊ शकतात. यावर न्या. डिगे यांनी राजनला दिलासा देणारा कोणताही आदेश देण्यास नकार दिला. मालिका आधीच प्रदर्शित झाली आहे. पुढच्या तारखेला बघू. सर्व प्रतिवादींना प्रतिज्ञापत्र दाखल करू द्या. 7 जून रोजी या प्रकरणाची यादी करा, असे न्यायालयाने सांगितले. खंडपीठाने राजनला मागितलेल्या सवलतींमध्ये बदल करण्यासाठी आणि बौद्धिक संपदा अधिकारांचा मुद्दा कसा आहे हे सिद्ध करण्यासाठी त्याच्या दाव्यात बदल करण्याची परवानगी दिली. नेटफ्लिक्सचे वकील रवी कदम यांनी न्यायालयाला सांगितले की, पत्रकार ज्योतिर्मय डे यांच्या हत्येप्रकरणी राजनला दोषी ठरवण्यात आले आहे आणि निकाल सार्वजनिक डोमेनवर उपलब्ध आहे. अशा परिस्थितीत कोणीही आपले नाव किंवा व्यक्तिमत्त्व वापरू शकतो.
Powered By Sangraha 9.0