वृत्तींवर विजय मिळविणारा योग !

20 Jun 2023 20:07:24
प्रासंगिक 
- वैद्य सुयोग दांडेकर
 
World Yoga Day दरवर्षी २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जातो. या निमित्ताने गेल्या काही वर्षांपासून भारतातील सुमारे पाच हजार वर्षांपूर्वीची ही समृद्ध परंपरा विश्वापर्यंत पोहोचत आहे. मानसिक, शारीरिक आणि आध्यात्मिक विचारांचा सुरेख संगम असणारी ही पद्धती पूर्वी लोकांच्या जीवनशैलीचा एक भाग होती. अन्य संस्कारांप्रमाणेच योगाभ्यासाचा विचारही मागील पिढीकडून नवीन पिढीपर्यंत आपसूक पोहोचत होता. World Yoga Day मात्र, काळ पुढे सरकला तशी जीवनशैलीही आमूलाग्र बदलली. कार्यशैलीमध्ये पराकोटीचा बदल झाला. माणसाच्या शारीरिक हालचालींवर मर्यादा आल्या, स्पर्धायुक्त वातावरणामुळे जीवनातील स्वास्थ्य आणि स्थैर्य हरपले. दाही दिशांनी घेरून आलेल्या या परिस्थितीमुळेच सध्याचा समाज हा अनेकानेक समस्यांचे भांडार होऊन राहिलेला आहे. त्यात अनेकांची घुसमट होत आहे. World Yoga Day तणाव हा शब्द परवलीचा झाला असून या शब्दाचा नेमका अर्थ न जाणणारे अल्पवयीनदेखील त्याच्या पाशवी विळख्यात अडकत आहेत. म्हणूनच आज नव्याने योगाभ्यास, प्राणायाम आणि पर्यायाने मन:शांती या सर्व मुद्यांचा परामर्श घेणे इष्ट ठरते.
 
 

Yog  
 
 
सध्या शारीरिक तंदुरुस्तीसाठी साह्यभूत ठरतील अशी नानाविध उपकरणे उपलब्ध आहेत. विविध प्रकारचे व्यायाम प्रकार शारीरिक तंदुरुस्ती मिळवून देऊ शकतात. World Yoga Day  मात्र, शरीर हा हाडामांसाचा गोळा नसून त्यात मन नावाच्या अरूप अवयवाचाही समावेश आहे; ज्यातील अस्थिरता आपल्या सर्व क्रियांना आणि क्षमतांना प्रभावित करू शकते. म्हणूनच शरीराप्रमाणे मनाला ताळ्यावर ठेवणारे, त्याचा विचार करणारे आणि व्यक्तीला शारीरिक, मानसिक, बौद्धिक, आध्यात्मिक उन्नत अवस्थेपर्यंत नेणारे शास्त्र म्हणून योगाभ्यासाचा विचार व्हायला हवा. आपण सर्वप्रथम योगाची व्याख्या लक्षात घेऊ या. ‘योग: चित्तवृत्ती निरोध:' मनाच्या सगळ्या वृत्तींचा निरोध करणं म्हणजेच योग. आपले मन अत्यंत चंचल असते. सतत विविध विचारांच्या जंजाळात अडकलेले असते. पूर्वीच्या मानाने आजची व्यस्तता आणि व्यग्रता वाढली आहे. World Yoga Day  या सगळ्या परिस्थितीत मन था-यावर ठेवण्यासाठी योगासनांची मोलाची मदत होते. योगासनांमुळे चयापचय क्रिया सुरळीत सुरू राहते. व्यायामशाळा अथवा जीममध्ये मस्क्युलर वर्कआऊटला प्राधान्य दिले जाते. आयुर्वेदात याला शाखा व्यायाम असे म्हटले आहे तर योगासनांना कोष्ठ व्यायाम म्हणून संबोधले आहे. स्नायूंना बळकटी देणारा व्यायाम तेवढ्यापुरताच मर्यादित राहतो आणि व्यायाम थांबवताच शरीर पुन्हा मूळ पदावर येते.
 
 
मात्र, योगासनांचे परिणाम शारीरिक आणि मानसिक या दोन्ही दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरतात आणि दीर्घकाळ टिकतात. म्हणूनच ते अधिक परिणामकारक असतात. मुख्य म्हणजे योगासने हा केवळ व्यायाम प्रकार नाही तर हा मनाचाही व्यायाम आहे. म्हणूनच त्यांचा दुहेरी फायदा मिळतो. World Yoga Day बदललेल्या कार्यशैलीत बैठ्या कामांचे प्राबल्य वाढले आहे; त्याचबरोबर तणावही वाढत आहेत. त्याचे नियोजन करायचे तर केवळ शारीरिक व्यायाम पुरेसे अथवा पर्याप्त नाहीत. त्यासाठी मनही संस्कारित, पोषित असायला हवे, त्याच्यावर तुमचे नियंत्रण प्रस्थापित व्हायला हवे. या अर्थाने योगासनांचा अत्यंत चांगला उपयोग होतो. आपण योगासने करीत असल्यामुळे चयापचय क्रिया सुरळीत होते. साहजिकच कोठा शांत होतो आणि आपण म्हणतो त्याप्रमाणे ‘पोट थंड तर डोकं थंडङ्क या तत्त्वाच्या आधारे संपूर्ण शरीर स्वस्थ राहण्यास मदत होते. World Yoga Day  सध्या हार्मोनल चेंजेस म्हणजे संप्रेरकांमधील बदल हा परवलीचा शब्द झाला आहे. योगासने हा या समस्येवरील रामबाण उपाय आहे. नियमितपणे सूर्यनमस्कार घातले तरी या समस्येपासून मुक्ती मिळू शकते. प्राणायामामुळे शरीराला ऑक्सिजनचा पर्याप्त पुरवठा होतो. महत्त्वाचे म्हणजे प्राणायामाने इंटर्नल क्लिनिंग म्हणजेच अंतर्गत स्वच्छतेची प्रक्रिया यशायोग्य घडून उत्तम परिणाम बघायला मिळतात.
 
 
World Yoga Day  लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांना योगासनांचे लाभ मिळतात. मुलांची आकलनशक्ती वाढणे, स्मरणशक्ती सुधारणे, एकाग्रता साधणे या हेतूने प्राणायाम आणि योगासनांचा अत्यंत चांगला उपयोग होतो. सूर्यनमस्काराला सर्वांगसुंदर व्यायाम म्हटले जाते. म्हणूनच दररोज सूर्यनमस्कार घातले तरी चांगले परिणाम बघायला मिळतात. यात बारा आसने आहेत आणि श्वास कधी घ्यायचा, कधी सोडायचा याचे नियम सांगितलेले आहेत. म्हणूनच सूर्यनमस्कार घालताना प्राणायामही होतो आणि योगासनांचे लाभही मिळतात. या अर्थाने सूर्यनमस्काराचे महत्त्व विशेषत्वाने अधोरेखित होते. योग्य आहार, योग्य विहार आणि योग्य विचार या माध्यमातून शिकवला जाणारा योग सर्व दु:खांवर उपाय सुचवतो, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. World Yoga Day  स्वामी विवेकानंद म्हणतात, मन, मनगट आणि मेंदू बलवान असेपर्यंत माणूस हा माणूस आहे. म्हणूनच स्वत:मधले दोष दूर करून बलवान व्हायचे असेल तर योगासनांना पर्याय नाही. यासाठी पौष्टिक, संतुलित आणि सात्त्विक आहारही अंगीकारायला हवा. अशा बलवान देहात आणि मनात विकार उत्पन्न होत नाहीत. असलेल्या विकारांची तीव्रता कमी होते आणि विनाऔषध व्याधिमुक्त होता येते.
 
 
सध्या प्रत्येकावर ताण आहे. पण खरे पाहता ताण मन:स्थितीत नव्हे तर परिस्थितीत निर्माण होतो. एखाद्यासाठी एखादे काम अवघड बनते आणि परिस्थितीतला हा तणाव नंतर मन:स्थितीत ताण उत्पन्न करतो. म्हणूनच आधी मन:स्थिती सुधारून या ताणाचा सामना करायला हवा. योगाभ्यासामुळे एकाग्रता वाढते. ग्रहण केलेले ज्ञान बुद्धीमध्ये परावर्तित होते आणि आवश्यकतेप्रमाणे त्याचा वापर होऊ शकतो. World Yoga Day  अस्थिर मनाचे संतुलन साधणे हे कामदेखील योगसाधनेमुळेच शक्य होते. या उद्देशानेच पतंजली ऋषींनी योगसूत्रे लिहिली. स्पर्धात्मक युगात एकाग्रता अभंग राहावी यासाठी आपणही या सूत्रांचा अवलंब करायला हवा. वयाच्या सहाव्या-सातव्या वर्षांपासून याची सुरुवात करायला हरकत नाही. योगसाधनेतून होणारे संस्कार या मनाला सक्षम करतात. म्हणूनच शालेय जीवनापासूनच योगाभ्यास व्हायला हवा.
 
 
समाज एकसंध राहावा, उत्तम अवस्थेत राहावा यासाठी एकत्र येऊन ध्यान, भजन, कीर्तन, प्रार्थना, प्राणायाम, सूर्यनमस्कार आदींचा उपयोग होतो. शंभर माणसे एका वेळी ओंकार म्हणतात तेव्हा होणारा परिणाम अद्भुत असतो. हे आत्म्यावर होणारे संस्कार असतात. यामुळे सहिष्णुता, बंधुभाव, परस्परांना मदत करण्याची वृत्ती आणि एखादी वस्तू वाटून घेण्याची भावना वाढीस लागते. जीवनामध्ये रस वाटण्यासाठी जीवनाबद्दल, स्वत:बद्दल आणि इतरांबद्दल प्रेम हवे. World Yoga Day  यश आणि अपयशाची पर्वा न करता जगण्याची हौस हवी, जगण्याचे साहस हवे. योगसाधनेमुळे हे सर्व साधते. म्हणजेच ही साधना स्वत:वर आणि विश्वावर प्रेम करण्याचा संदेश देणारी आहे. निसर्गापुढे लीन होण्याची, त्याच्याशी समरस होण्याची आणि तो आपल्यात उतरवून घेण्याची प्रक्रिया सोपी करणारी आहे. ती अंगीकारली तर आयुष्याचे नंदनवन फुलेल, यात शंका नाही.
Powered By Sangraha 9.0