तभा वृत्तसेवा
मुंबई,
पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी झालेल्या वारकर्यांना (Varkari Vima Suraksha Yojana) विमा संरक्षण देणारी विठ्ठल- रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना लागू करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी केली. यामुळे लाखो वारकर्यांना शासनाच्या खर्चाने विमा संरक्षण मिळणार आहे. वारीच्या 30 दिवसांसाठी हे विमा संरक्षण असणार आहे.
वारीच्या काळात एखाद्या वारकर्याचा मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबीयाला 5 लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येईल. दुर्घटनेत कायमचे अपंगत्व आल्यास 1 लाख रुपये देण्यात येतील. अंशत: अपंगत्व आल्यास 50 हजार रुपये तसेच वारीदरम्यान आजारी पडल्यास औषधोपचारासाठी 35 हजार रुपयापर्यंतचा खर्च मिळेल. याबाबत शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला असून, मदत व पुनर्वसन विभागामार्फत ही (Varkari Vima Suraksha Yojana) योजना राबविण्यात येणार आहे. वारीच्या काळात अपघात किंवा अन्य प्रकारच्या दुर्घटना होतात आणि त्यात वारकरी जखमी होतात किंवा त्यांचा मृत्यू होतो. यात त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळावी, या उद्देशाने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला आहे.