तभा वृत्तसेवा
गोंदिया,
Graph of educational quality : इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेमध्ये गोंदिया जिल्हा नागपूर विभागांमध्ये अव्वल स्थानी राहिला आहे. त्याचप्रमाणे येणार्या सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये आपले विद्यार्थी उत्तम गुणांनी यशस्वी होतील यासाठी सर्व शाळांनी शाळेच्या पहिल्या दिवसापासून नियोजन करावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील यांनी केले आहे.
शिक्षणाधिकारी माध्यमिक व योजना कार्यालयाच्या वतीने जिल्ह्यातील प्राचार्य व मुख्याध्यापकांची सहविचार सभा पुंजीभाई पटेल शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. प्रसंगी पाटील यांनी शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये सर्व शाळांनी उत्तम प्रकारे नियोजन करून विद्यार्थी लाभांच्या सर्व योजना विद्यार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवाव्यात असे निर्देश दिले. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य राजेश रुद्रकार यांनी लोकसेवा हक्क अधिनियम याबाबत मुख्याध्यापक यांनी बजावयाची भूमिका याबाबत मार्गदर्शन केले. (Graph of educational quality)
शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी विषय पत्रिकेवरील सर्व विषयांबाबत चर्चा करून येणार्या शैक्षणिक वर्षांमध्ये जिल्हा गुणवत्तेसाठी अग्रस्थानी राहील यासाठी सर्व मुख्याध्यापकांनी भरीव योगदान द्यावे असे आवाहन केले. यावेळी उपस्थित सर्व मुख्याध्यापकांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. तसेच माहे एप्रिल आणि मे या महिन्यामध्ये सेवानिवृत्त झालेल्या मुख्याध्यापकांचा सेवानिवृत्तीनिमित्त सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपशिक्षणाधिकारी दिघोरे, विवेक रोकडे, सुरेश यांनी विशेष प्रयत्न केले. (Graph of educational quality)