तभा वृत्तसेवा
गुरुकुंज आश्रम,
युगग्रंथ ग्रामगीता लिहिण्याची स्फूर्ती 1953 च्या आषाढी (Pandharpur Palkhi) एकादशीला पंढरपूर येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना झाली होती. त्याचा स्मृतीदिन म्हणून अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळाच्या प्रचार विभागाच्या वतीने गुरुकुंज आश्रमातून सालाबादा प्रमाणे प्रचार पालखी पदयात्रा याही वर्षी गुरुकुंज आश्रमातून रवाना झाली.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी पंढरपूरला अनेक लोकप्रबोधनात्मक कार्यक्रम केले. ‘चला हो पंढरी जाऊ, जिवाच्या जिवलगा पाहू । भीवरे स्नान करुनिया संत पद धूळ शिरी लावू ’असे प्रसिद्ध भजन महाराजांनी लिहिले. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या पालखीचे पंढरपूर करीता श्रीक्षेत्र गुरूकुंज आश्रम येथून अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे सर्वाधिकारी लक्ष्मण गमे, उपसर्वाधिकारी दामोदर पाटील यांच्याहस्ते पूजन होऊन (Pandharpur Palkhi) पालखीचे प्रस्थान झाले. यावेळी सरचिटणीस जनार्दनपंत बोथे,पालखी यात्रेचे संयोजक प्रकाश वाघ, प्रचार सचिव सुशील वनवे, लक्ष्मणदास काळे, कराळे, दास टेकडीचे अध्यक्ष विलास साबळे उपस्थित होते. अध्यात्म समिती प्रमुख डॉ. राजाराम बोथे यांनी सारथ्य केले. अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे पदाधिकारी, महिला मंडळाच्या अध्यक्ष द्वारका गोहत्रे यांच्यासह भाविक भक्त यावेळी उपस्थित होते.