मुंबई,
राज्य सरकारने जे. जे. रुग्णालयातील नेत्रशल्यचिकित्सा विभागातील मानद प्राध्यापक Dr. Tatya Rao Lahane डॉ. तात्याराव लहाने यांचा राजीनामा मंजूर केला आहे. त्या ठिकाणी तत्काळ नवीन नियुक्ती करण्याचे आदेशही देण्यात आले. याशिवाय नेत्रशल्यचिकित्सा विभागाच्या प्रमुख डॉ. रागिणी पारेख यांचा स्वेच्छानिवृत्ती अर्जाला मान्यता देण्यासह अन्य काही डॉक्टरांचे राजीनामेही मंजूर केले आहेत.
प्राप्त माहितीनुसार, Dr. Tatya Rao Lahane डॉ. तात्याराव लहाने यांची बदली करण्यासाठी जे. जे.मधील निवासी डॉक्टरांनी आंदोलन केले होते. यानंतर त्यांनी राजीनामा दिला होता. त्याच्या मंजुरीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. आपल्यावर करण्यात आलेल्या आरोपांवर मत न घेता निवासी डॉक्टरांच्या आरोपांच्या आधारे एकतर्फी अहवाल तयार करण्यात आला. निवासी डॉक्टरांनी केलेले आरोप खोटे आहेत. त्यामुळे आम्ही आठ डॉक्टरांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. निवृत्तीनंतरही सेवा करण्याची संधी मिळाली, याबद्दल मी आभारी आहे. राजीनामा दिल्यानंतर कोणत्याही राजकीय नेत्याशी किंवा सरकारमधील व्यक्तीशी चर्चा झालेली नाही, असेही डॉ. लहाने यांनी स्पष्ट केले.